You are currently viewing 20 ते 23 मार्च कालावधीत सिंधुदुर्ग ॲडव्होकेट प्रीमियर लीग 2025 चे आयोजन

20 ते 23 मार्च कालावधीत सिंधुदुर्ग ॲडव्होकेट प्रीमियर लीग 2025 चे आयोजन

कुडाळ :

सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटना व बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा सदस्य ॲड संग्राम देसाई यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच “सिंधुदुर्ग ॲडव्होकेट प्रीमियर लीग” 2025 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन 20 ते 23 मार्च कालावधीत सावंतवाडी व मालवण येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील सहा व गोव्यातील दोन जिल्ह्यातील वकील खेळाडू सहभागी झाले आहे. आठ संघात 109 खेळाडूंचा समावेश आहे. या स्पर्धेचा शुभारंभ कुडाळ एमआयडीसी येथील बॅ नाथ पै शिक्षण संस्थेच्या मैदानावर 19 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार नीलेश राणे यांच्या हस्ते चषकाचे अनावरण करून करण्यात येणार आहे,अशी माहिती बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य अँड संग्राम देसाई यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत येथे दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच सिंधुदुर्ग ॲडव्होकेट प्रीमियर लीग स्पर्धा होत आहे. याबाबत आज येथील हॉटेल लाईम लाईटच्या सभागृहात पत्रकार परिषदेत ॲड देसाई बोलत होते. जिल्हा वकील संघटना उपाध्यक्ष ॲड विवेक मांडकुलकर ,सेक्रेटरी ॲड यतीश खानोलकर , कार्यकारिणी सदस्य ॲड अमोल सामंत तसेच ॲड अविनाश परब, ॲड मिहिर भणगे, ॲडमहेश शिंपूकडे, अँड आनंद गवंडे अँड प्रथमेश नाईक उपस्थित होते ॲड. देसाई म्हणाले.

या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी तर गोव्यातील उत्तर गोवा व दक्षिण गोवा अशा एकूण आठ जिल्ह्यातील जवळपास 140 वकिलांनी स्पर्धेच्या लिलाव प्रक्रियेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेची लिलाव प्रक्रिया 5 मार्च 2025 रोजी झाली. या प्रक्रियेतून या स्पर्धेसाठी 109 खेळाडूंची निवड करण्यात आली,असे त्यांनी सांगितले.

सदर स्पर्धेत एकूण आठ संघ मालकांनी संघ घेतले आहेत. त्यापैकी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ॲड अनिल निरवडेकर व ॲड नीलिमा गावडे , कोल्हापूर जिल्ह्यातून रवींद्र जानकर व अमित सिंग, सांगली जिल्ह्यातून ॲड प्रशांत जाधव, सातारा जिल्ह्यातूनॲड श्रीकांत पन्हाळे, गोव्यातून ॲड अनुप कुडतरकर ,तर सोलापूर जिल्ह्यातून ॲड श्रीकांत फटाते असे आठ संघ मालक आहेत.

सदर स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 55 हजार 555 रू., द्वितीय 33 हजार 333 रु., तृतीय व चौथा प्रत्येकी 11 हजार 111 रु. तसेच प्रत्येकी आकर्षक चषक देण्यात येणार आहे. 20 व 21 मार्च रोजी वरील आठ संघांमध्ये साखळी सामने सावंतवाडी येथील जिमखाना मैदान व मालवण येथील बोर्डिंग ग्राउंड येथे होतील. तर 22 मार्च रोजी उपांत्य सामने व 23 मार्च रोजी अंतिम सामन्याचे आयोजन मालवण येथील बोर्डिंग ग्राउंडवर करण्यात आले आहे. लीग पद्धतीचे सामने 15 षटकाचे राहतील उपांत्य फेरी व अंतिम फेरीचे सामने 20 षटकांचे असणार आहेत,असे अँड देसाई यांनी सांगून सर्वांनी या वकिलांच्या आगळ्या – वेगळ्या क्रिकेट स्पर्धेचा आस्वाद घ्यावा व स्पर्धेला उपस्थिती दर्शवावी, आवाहन त्यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा