लक्झरी बस मधून अवैध माल वाहतूक थांबवावी..
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे मनसेची मागणी …
कारवाई न झाल्यास अतिरिक्त प्रवासी भाडेवाढीला कारणीभूत असणारी, अवैध मालवाहतूक रोखणार.
मुंबई गोवा महामार्गावरून येणाऱ्या व जाणाऱ्या खाजगी प्रवासी लक्झरी बस मधून मोठ्या प्रमाणात विना परवाना मालवाहतूक केली जात आहे. खाजगी बस मालक हे प्रवासी वाहतुकीचा परवाना असताना मोठ्या प्रमाणात मालवाहतूक करतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात आंबा पेटी वाहतूक, हार्डवेअर चे सामान जनावरांचे मास, औद्योगिक कंपन्याचा कच्चा माल , तयार झालेला माल इत्यादींचे समावेश असतो… याचा फटका सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथील गुड्स परमिट असलेल्या स्थानिक टेम्पो, ट्रक, व्यवसायिक बसतो. स्लिपर कोच, प्रवाशी सिट, कॅरिअर(टप) आणि डीकी मधुन अशी माल वाहतूक होते. आणि प्रवासी भाड्या पेक्षा अशा प्रकारचा विना बिलाचा आणि GST चुकविलेला माल याचे जास्त भाडे लक्झरी मालकाना मिळते. यामुळे अवाजवी प्रवाशी भाडे वाढ, प्रवाशांशी अरेरावी हे प्रकार होतात .यालाच आळा बसण्यासाठी यापूर्वी देखील मनसेचे वाहतूक सेना पदाधिकारी विजय जांभळे यांनी अनेक आंदोलने केली होती. परंतु किरकोळ कारवाई वगळता आरटीओ मार्फत ठोस अशी कोणतीच कारवाई अदयाप झालेली नाही. याबाबत मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी निवेदनाद्वारे परिवहन अधिकारी श्री काळे यांना खाजगी बस वाहतूकदार यांच्याकडून होणारी अतिरिक्त भाडे वाढ व विना परवाना मालवाहतूक यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा रस्त्यावर उतरून खाजगी लक्झरी मार्फत होणारी मालवाहतूक रोखण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनात आंदोलना दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आर टी ओ अधिकारी याला जबाबदार असतील असे देखील म्हटले आहे. याची प्रत पोलीस अधीक्षक यांना सुद्धा देवुन विषयाची चर्चा करण्यात आली आहे. यावेळी उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, उपतालुकाध्यक्ष गजानन राऊळ, वाहतूकसेना मनसे विजय जांभळे, माजी उ प तालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे, विभाग अध्यक्ष प्रथमेश धुरी, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष कुडाळ यतीन माजगावकर उपस्थित होते.