*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*
—- *रंगपंचमी* —
भारतात विविध राज्यांत होलिकोत्सव आपापल्या ढंगाने साजरा केला जातो. होळी हा सण आपल्या जीवनात आनंद आणि उत्साह घेऊन येतो… होळी दहनाबरोबरच रंगाची उधळण करणारा हा सण चैतन्याची उधळण करून वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो… पण या सोहळ्याशी निसर्ग, इतिहास पुराण-नृत्य-चित्र-संगीतादी सर्व कला
इतकंच नाही तर मानसशास्त्र नि सामाजिक घटितंही किती सुरेख गुंफली गेली आहेत नाही..! अग्नी जल-पृथ्वी या तिन्ही महाभूतांचा ही सहभाग एकाच वेळी या उत्सवाला उष्णता, शैत्य नि रंग-गंध प्रदान करतो…!
फाल्गुन पंचमी म्हणजेच रंगपंचमी पण निसर्गात रंगीबेरंगी फुलांची ही रंगपंचमी केंव्हाच सुरु झाली… निसर्गदेवतेने लाल, गुलाबी, पिवळा, हिरवा, निळा अशा विविध रंगांचे घटच्या घट या फुलांवर रीते केले.. फक्त नजर पाहिजे ती या सौंदर्याला टिपणारी..!
ऋतूंच्या कोष्टकात तर वसंत ऋतूला चैत्र-वैशाखाशी जोडलं असलं तरी माघ महिना निम्म्यावर आला की वसंताची चाहूल लागतेच की..! चैत्रापर्यंत डाळ-पन्ह्याकरता वापरण्याजोग्या कैर्या तयार होतात नी अक्षय तृतीयेच्या नैवेद्याला पहिला आंबा…! खरं तर हे निसर्गाचं चक्र..!
माघात मोहरलेल्या झाडांच्या पानापानातून घुमणार्या कोकिळेच्या लकेरी, लालभडक फुलांनी बहरलेला पळस अन् मोगरा-चमेलीचे धुंदावणारे गंध ..! वसंत ऋतूचं स्वागत निसर्गच असं रंग-गंध-स्वर यांनी भरभरून करतो आणि या उत्सवात आपणही सहभागी व्हावं अशा ऊर्मी माझ्या मनात न दाटली तरच नवलच…!
मिसळले रंगात रंग
त्यामागील आपापले ढंग
जाहले उत्सवात दंग
सा-यांचा एक अजोड रंग
सरत्या थंडीची आठवण देणारी संध्याकाळची सुखद हवा नि त्यात होळीची ऊब हवीहवीशी वाटत असते
विविध नावांनी, विविध रूपांत साजरी होणारी ही रंगपंचमी..
निसर्गातल्या बदलत्या रूपाचं या उत्सवाशी असलेलं नातं उमगायला लागलं… तशीच आपल्यालाही वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर ती अधिक उमगत जाते आणि हलके हलके तिचे एकेक रंग मनावर चढत जातात…!
तरुण वयात जगण्याचं भान येऊ लागत असताना होळीचे वेगवेगळे संदर्भ लक्षात येऊ लागतात आणि या
वयातच भेटतात ती होळीची असंख्य गीतं..! ” आज न छोडेंगे बस,
“हमजोली” ’पासून “‘रंग बरसे’” नी “‘बलम पिचकारी’” पर्यंत आणि “‘आज गोकुळात रंग खेळतो हरी” पासून ‘”सख्या चला बागामंदी रंग खेळू चला’” पर्यंत अनेक गाणी कानात रंग उधळतात नी पाय थिरकायला लावतात आणि मग कधीतरी शास्त्रीय संगीताची वाट सापडते अन तिथे मनाला भिजवणारी खरीखरी ‘होरी’ ऐकायला मिळते…!
रंगात रंगून होळीच्या
हर्ष उधळत राहू
इंद्रधनुष्यातील सप्तरंग आपल्या आयुष्यात असतात आणि रंगपंचमीमुळे ते आपण मनासोक्त उधळतो. प्रेमाचे प्रतीक म्हणून नी प्रेम वाढावे म्हणून…!
रंगपंचमी साजरी होते ती त्यातील माणसांच्या उत्साही सहभागामुळे विविध रंगांच्या उधळणीमुळे…! आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळी माणसे आपल्याला सामील होतात… भेटतात व आपल्या आयुष्याला बहरायला, फुलायला, रंगीबेरंगी करायला ही माणसेच हातभार लावतात…पण प्रत्येकाचे रंग निरनिराळे.. . मग हे रंग कधी शहाणपणाचे असतात, कधी वेडेपणाचे, कधी उत्साहाचे; तर कधी नैराश्याचे… वपुंची त्यांच्या आयुष्यातल्या छोट्या-छोट्या प्रसंगांनी सजलेली ही ‘रंगपंचमी’ कुठेतरी आपल्याही आयुष्यात असं घडलं होतं बरं का ?’ ..असं म्हणायला लावते… हसवते… खिन्नता आणते आणि विचारही करायला लावते…!!
लेखिका/ कवयित्री
संगीता कुलकर्णी— ठाणे@
9870451020