*साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक “भोवतालकार” साहित्यिक विनय सौदागर लिखित अप्रतिम लेख*
*काकल्याचे तर्कट-५*
*गाळी खावची संधी*
शिमग्याचे दिवस होते. त्याच काळात एके दिवशी काकल्या घरी आला. मला म्हणाला,”मगे, उद्या रोंबटात नाचाक येतय मा?” मी नाही म्हटलं. म्हणालो,”मी कुठे जातो रोंबटात?”
“तू नाय म्हणजे? केशरी रेशन कार्ड वाल्यानीच जावचा असा आसा काय?” काकल्या खवचट बोलला.
“अरे त्यात सगळा गोंधळ असतो, नको ते प्रकार असतात, म्हणून टाळतो; पण न चुकता होळीकडे जाऊन नमस्कार करून येतो मी. दरवर्षी होळीला नारळ ठेवतो, बरं मागतो .”काकल्याला मी समजावत म्हणालो.
त्याक्षणी काकल्या सरसावला,
“माका एक सांग, जिता झाड तोडतास, आणि त्येकाच परत उभ्या करतास आणि तो देव मानून त्येच्याकडे नवस बोलतास; ह्या कितपत बरोबर? दगड धोंड्याचे पण देवच केलेत आपून; तरीय देव बनवच्यासाठी जीवाक मारूकच होयो कित्या? तुकोबान झाडापेडाक सगेसोयरे म्हटलाहा. या भोवतालातच देव सोदूक होयो, त्येंका नायशे करून तो निर्माण करू नकास.”
“मग काय करायला हवं?” मी विचारलं.
काकल्या म्हणाला, “येक म्हणजे झाडा तोडताच कामा नये. जय होळी उभी करतास, त्या नेमात रिवाजात,परंपरेत बसणारा येक झाड लावचा… नारळाचा, फोपळीचा, आंब्याचा आणि मगे बाकी सगळा काय ता तेच्येभोवती करा मरे.”
“मग पुढच्या वर्षी काय करायचं?”
“फुढल्या वर्सा ता झाड काढून गावातल्या हुशार,गुणी पोरग्याक दिया. धावीत पैलो किंवा स्कॉलरशिपेतलो… कोणय गुणी पोरगो सोदा. एक वरास जगयलला झाड तेका मेळात. तेच्या घराकडे जावन देवस्थानान ता लावचा. न्याम खाली होतला, परत दुसरा झाड दुसरे वर्सा. कठीण हा, पण जमाचाच नाय असा नाय. देवाचा झाड म्हणान तो पोरगो ता झाड मायेन समाळतलो. अरे, काश्टेत्सून धोतरात आणि धोतरात्सून हाफ पँटीत तुमी इलास मां? तशी हुयय थोडी सुधारणा करा. काळानुसार आपल्या रिवाजांका आपूनच वेगळा रूप देवक् होया. झाड तोडणा सोडला, तर बाकी सगळा तुमी कराच मरे. हेच्यात देवाचे चड आशीर्वाद तुमका मेळतीत.”
मी काही बोललो नाही. त्याबरोबर “तर ह्या तू चार बऱ्या माणसांक सांग. त्यांका नाय पटला, तर रोंबाट हाच. खा चार गाळी.”
मला शिव्या खायची ऑफर देऊन काकल्या निघून गेला होता.
*विनय सौदागर*
आजगाव, सावंतवाडी
9403088802