देवगड :
देवगड तालुक्यातील गाबीत समाज बांधवांना त्यांच्या दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.देवेन्द्रजी फडणवीस यांना मा.तहसीलदार,देवगड यांच्या मार्फत सादर करण्यात आले. यावेळी गाबीत समाज देवगड या नोंदणीकृत संस्थेचे अध्यक्ष श्री.संजय पराडकर, सचिव श्री.लक्ष्मण तारी, कार्यालय प्रमुख श्री.सुहास पराडकर, सदस्य श्री.रमेश तारी, श्री.अजित टाककर, श्री.महादेव मुणगेकर, श्रीमती.अश्विनी धुरी, संकेत जुवाटकर, सतीश जोशी, चंद्रकांत हरम वगैरे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
देवगड येथील गाबीत समाजातील लोक किनारपट्टीच्या भागात मच्छीमारीवर अवलंबून आहेत. ग्रामीण भागातील अनेक स्त्रिया आपले कुटुंब कालवे काढणे, शिनाने काढणे, मुळे(शिंपले) काढणे, खेकडे पकडणे, मासे सुकविणे, वगैरे मच्छीमारी व्यवसाय करून आपला दैनंदिन चरितार्थ चालवित असतात. त्यांना राज्य शासनाने स्वतंत्र अनुदान योजना जाहिर करावी तसेच विक्री व्यवस्था निर्माण करून द्यावी.
संपूर्ण जिल्ह्यात मालवण, कणकवली, सावंतवाडी, वेंगुर्ले येथे केंद्रीय मत्स्यविकास खात्यामार्फत नगरपंचायतीना निधी देऊन मच्छीमार्केट ची व्यवस्था शासनाने निर्माण करून दिली. त्याच धर्तीवर देवगड हा मच्छीमारी तालुका असूनही अद्याप देवगड शहरात मच्छीमार्केची उभारणी करण्यात आलेली नाही.असे भव्य मच्छीमार्केट नगरपंचायती मार्फत उभारण्यासाठी निधी देण्यात यावा.
देवगड मधील ग्रामीण भागातून देवगड शहरात ये – जा करण्यासाठी नियमित एस. टी.बसेस नाहीत.त्याकरिता मोर्वे, तांबळडेग, मिठमुंबरी, तारामुंबरी, मळई, आडबंदर, तर वाडी, वाडातर, विरवाडी, मोंड, वानिवडे, गिर्ये बांदा, विजयदुर्ग, आंबेरी, मणचे, तळवडे, टेंबवली, कालवी, जामसंडे कट्टा या मार्गांवर मिनी बससेवा सुरू करण्यात यावी.
गेली 15 वर्षे आनंदवाडी बंदर प्रकल्पाचे काम निधी अभावी रखडत चालले आहे ते लवकरात लवकर पूर्ण करून आनंदवाडी बंदर सुरू करण्यात यावे.
तसेच महाराष्ट्रात दर्यावर्दी तथा आरमारी असलेल्या गाबीत समाजाच्या स्वतः च्या जागेत गाबीत समाज देवगड तर्फे उभारण्यात येणाऱ्या “गाबीत समाज भवनासाठी” संस्थेच्या मागणी प्रमाणे 100% अनुदान मुख्यमंत्री सहाय्य योजनेतून मंजूर करण्यात यावे. इत्यादी मागण्यांचे निवेदन देवगड तहसिलदार यांचे मार्फत देण्यात आले असून मा.तहसिलदार यांनी सकारात्मक दृष्टिकोन व्यक्त केला आहे.