*”त्यांनी मला खासदार केलं आणि मग ते आमदार झाले”… आमदार डॉ.निलेश राणेंची आमदार केसरकरांसोबत जोरदार बॅटिंग*
*डॉ.निलेश राणेंच्या बाऊंसरवर सचिन झाला स्वयंचित*
*आमदार डॉ. निलेश राणे वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा*
आमदार डॉ.निलेश राणे यांचा वाढदिवस संजू परब मित्र मंडळाच्यावतीने सावंतवाडी येथे आमदार दीपक केसरकर आणि सहकाऱ्यांच्या सोबतीने दणक्यात साजरा करण्यात आला. दरवर्षी नित्यनेमे संजू परब आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त काहीना काही कार्यक्रम घेतच असतात. यावेळी वाढदिवसाच्या कार्यक्रमात आमदार निलेश राणे यांच्याबद्दल बोलताना शिवसेनेचे वेंगुर्ला येथील लोकप्रतिनिधी सचिन वालावलकर यांनी केलेली काही विधाने वातावरण काहीसं बदलून गेली. त्यामुळे आमदार निलेश राणे यावर कोणती प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
आमदार निलेश राणे यांनी डावातील पहिल्याच बाऊन्सर चेंडूवर सचिन यांना चकवा देत हिट विकेट होण्यास भाग पाडले आणि आमदार केसरकरांच्या सोबत धुंवाधार बल्लेबाजी करत पुन्हा एकदा वातावरणात आनंद लहरी खुलविल्या. पुढे बोलताना ते म्हणाले “केसरकरांच्या अनेक गोष्टी मी माझ्यात घेतो परंतु मला भीती त्यांचा परिणाम माझ्यात होण्यापेक्षा माझा परिणाम त्यांच्यात होऊ नये आणि त्याची सुद्धा मी काळजी करतो. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत निलेश राणे अवघ्या २६/२७ व्या वर्षी खासदारकीचे उमेदवार होते. त्यावेळी दीपक केसरकर आमदार सुद्धा नव्हते परंतु, केसरकरांनी निलेश राणे यांच्या खासदारकीच्या प्रचारात आघाडी घेत विजयात सिंहाचा वाटा उचलला होता. त्यामुळे केसरकरांवर स्तुतीसुमने उधळताना आमदार निलेश राणे म्हणाले, “जेव्हा जेव्हा केसरकर माझ्यासोबत होते तेव्हा तेव्हा मी जिंकलो आहे. मला खासदार केल्यानंतर ते आमदार झाले. या त्यांच्या वक्तव्याने आमदार केसरकर यांची आमदार नसताना सुद्धा जिल्ह्यात किती ताकद होती याचा प्रत्यय येतो. “लागची होकाल कुरडी” या म्हणीप्रमाणे मतदार संघातील किंबहुना सावंतवाडीतील काही केसरकर द्वेषी त्यांच्यावर टीका करत असताना जिल्ह्यात आणि राज्यात केसरकरांची ताकद काय आहे हे निलेश राणे यांनी बोलून दाखवले.
सचिन वालावलकर यांच्यावर बाउन्सर फेकण्यापूर्वी रनअप घेताना आमदार निलेश राणे यांनी राज्याच्या विधानसभा सभागृहाची रचना, २८८ सभासद ज्या सभागृहात असतात तिथे आपलं बोलणं अध्यक्षांच्या समोर ठेवायचं आणि आपल्या मागण्या सुद्धा पूर्ण करून घ्यायच्या असतात. तो सगळा प्रयत्न आम्ही आमदार म्हणून करत असतो असे सांगत विधानसभा सभागृहाच्या मर्यादा आणि नियम याची माहिती करून दिली. आपण पाच वर्षे लोकसभेच्या सभागृहात होतो परंतु, गेली दहा-बारा वर्षे गॅलरीत बसून सर्व कामकाज पहात असायचो. कुठल्याही सभागृहात काम करणे हे सर्व सोपं नाही, ते एक मोठं कोर्ट आहे. जिल्ह्यात बसून आपणास वाटतं तसं ते नसतं, ते फार वेगळे आहे. त्यामुळे तिथे जे जे करावे लागतं त्यासाठी मी माझा स्वभाव बदल केला परंतु, माझा स्वभाव तुम्हाला वाटत होता तसा कधीही नव्हता. मी वयाच्या २६/२७ व्या वर्षी खासदार झालो त्यामुळे त्यावेळी बोलायची एक वेगळी पद्धत होती. म्हणून, आता मला तुम्ही २६/२७ वर्षाचे असताना कसे होता हे एकदा बघायचे आहे… असे म्हणत आमदार निलेश राणे यांनी सचिन वालावलकर यांना बॅकफूटवर जाण्यास भाग पाडले. आपल्या स्वभावावर बोलताना त्यांनी पुढे सांगितले की, “स्व.बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलंय, ज्याला जशी भाषा समजते तसंच त्याच्याशी बोलायचं. मग ते कोणाला आवडू दे अथवा न आवडू दे.. कारण, कोणाचा तरी आवाज दबलेला असतो, त्याचा आवाज तू झालास तर ती खरी समाजसेवा.. जी तुला समाजासाठी समाजात करायची आहे.
राणेंच्या घराण्याचा संघर्ष सांगताना निलेश राणे यांनी मध्यंतरी त्यांचे घर पाडण्याचे प्रयत्न झाल्याचे आणि त्यावेळी संयमी राहिल्याची आठवण करून दिली. अनेक किल्ले ढासळत असतानाही राणेंचा किल्ला ढासळला नाही. एवढे संघर्ष होऊनही तिन्ही राणे निवडून येणे ही सोपी गोष्ट नाही, हे सुद्धा आवर्जून सांगितले. केसरकरांसोबत धुवाधार बॅटिंग करताना त्यांनी मनापासून आपण केसरकरांचा ऋणी आहे असे सांगितले. कारण, त्यांना केसरकर यांची कुडाळ मालवण मध्ये लढतीत फार मदत झाली असे सांगताना ज्यांना आपण माजी आमदार केलं त्यांच्याविरुद्ध गनिमी काव्याने लढताना आम्ही जनतेला सांगायचो की, “बघा तिकडे केसरकर किती पैसा मतदार संघात देतात, जसे की पैशांचे धबधबे पडत आहेत आणि आपल्याकडे एक थेंब सुद्धा पडत नाही.” रत्न सिंधू योजनेमधून आणलेला पैसा बाजूलाच ठेवा परंतु, केसरकर यांनी मतदार संघात मंत्री म्हणून जेवढा पैसा आणला त्यावर खरंतर पत्रकारांनी एक वेगळी डॉक्युमेंटरी केली पाहिजे होती. जवळपास ३० मिनिटांची डॉक्युमेंटरी त्यावर नक्कीच झाली असती, असे सांगून केसरकर यांनी मतदार संघासाठी आणलेल्या निधीची सत्यता जनतेसमोर मांडली आणि केसरकरांवर तोंडसुख घेणाऱ्यांचे दात घशात घातले.
एवढे बोलून आमदार निलेश राणे थांबले नाहीत तर पत्रकारांना उद्देशून ते म्हणाले, “एवढा मोठा माणूस आपला आमदार म्हणून आहे, त्यांचे काम आपण लोकांसमोर आणण्याची गरज आहे, त्यांना साथ देण्याची गरज आहे. आमदार केसरकर यांनी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात शालेय शिक्षण तथा मराठी भाषा मंत्री म्हणून काम करताना आपल्या मतदारसंघासाठी गावागावातील सुधारणांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणल्याची माहिती आमदार निलेश राणे यांनी आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात पत्रकारांच्या समक्ष सर्वांना दिली. आमदार निलेश राणे यांना स्वतःच्या प्रसिद्धीची कधीही गरज भासली नाही परंतु मित्रत्वाचे नाते निभावून जेव्हा जेव्हा त्यांना गरज भासली तेव्हा तेव्हा त्यांच्या सोबत राहिलेल्यांचे ऋण व्यक्त करण्यात ते कधीही मागे राहत नाहीत. आमदार केसरकर यांनी त्यांच्या विजयासाठी केलेले प्रयत्न, घेतलेले कष्ट ते आजही विसरले नाहीत त्यामुळे स्वतःच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात इतरांकडून आपले गोड कौतुक करून घेण्यापेक्षा आपल्याला साथ दिलेल्यांचे कौतुक सोहळे करण्यात त्यांनी धन्यता मानली. यातच आमदार निलेश राणे यांच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो.
गेली कित्येक वर्ष संजू परब नेहमीच आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा करतात, त्यासाठी संजू परब यांना आपला भाऊ असे संबोधून त्यांचेही आभार व्यक्त केले.