You are currently viewing तरुणांच्या गळ्यातील ताईत आमदार डॉ. निलेश राणे वाढदिवस अभिष्टचिंतन..!

तरुणांच्या गळ्यातील ताईत आमदार डॉ. निलेश राणे वाढदिवस अभिष्टचिंतन..!

 

आमदार निलेश राणे यांचा आज वाढदिवस. आजच्या या मंगलदिनी संवाद मिडिया कडून आमदार डॉ.निलेश राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण खासदार म्हणून देशाची संसद गाजवलेले आणि आपल्या बुद्धिचातुर्याने अनेक प्रश्नांना वाचा फोडणारे म्हणून डॉ. निलेश राणे यांची ओळख आहे. कुडाळ मालवण मतदारसंघातून प्रचंड मतांनी निवडून येत वडील खासदार नारायण राणे यांच्या पराभवाचा बदला घेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणेंचाच आवाज असल्याचे दाखवून दिले. तरुणांच्या पाठीशी मोठ्या भावासारखे उभे राहणारे आमदार डॉ.निलेश राणे म्हणजे तरुणाईच्या गळ्यातील ताईत..! आपल्या बेधडक वक्तव्यामुळे डॉ.निलेश राणे नेहमीच चर्चेत असतात. आम्ही राणे कडक आहोत पण ज्यांना जी भाषा समजते त्यांच्याशी त्याच भाषेत बोलतो..सर्वांशी नाही असे सांगणारे डॉ.निलेश राणे जे चुकतात त्यांचा कुठलाही मुलाहिजा न ठेवता तात्काळ त्यावर योग्य ती कारवाई करताना पाहिले की, नेता असावा तर असा..! असे प्रत्येकाला वाटते.

कोकणातील प्रश्नांची उत्तम जाण असलेले निलेश राणे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावागावात पोचले आहेत. गावागावातील कार्यकर्त्यांशी त्यांचा दांडगा संपर्क आहे, त्यामुळे निलेश राणे दौऱ्यावर आले की त्यांच्या भोवती तरुण कार्यकर्त्यांचा सर्वात जास्त गोतावळा असतो. ज्याच्याशी मैत्री करतात त्याला कायम जिवाभावाचा म्हणून जपतात. आपल्यावर प्रेम करणाऱ्या नेत्यांच्याच नव्हे तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मदतीला देखील दिवसारात्री कधीही धावून जाण्याची निलेश राणे यांची वृत्ती.. त्यामुळे त्यांच्यावर कार्यकर्त्यांचा विश्वास देखील तेवढाच जास्त. कोकणच्या विकासासाठी नेहमीच ते अग्रेसर असतात. संसदेत अभ्यासू भाषण करत कोकणातील सर्वात जास्त प्रश्न संसदेत मांडण्यात ते आघाडीवर होते. वडील खासदार नारायण राणे यांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात तर ते यशस्वी झालेतच परंतु समाजकारणातही ते पुढे असतात.

डॉ.निलेश राणे यांच्या जनसंपर्क दांडगा आहे, तसेच पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर देखील त्यांना मान आहे त्यामुळे जिल्ह्यातील कोणतेही काम वरिष्ठ पातळीवरून करून घेण्याची त्यांची ताकद आहे. मध्यंतरीच्या काळात राजकीय उलथापालथ झाली त्यात त्यांना भले हार पत्करावी लागली तरी समाजकार्यात ते कधीही मागे राहिले नाहीत. जनतेने आजवर दिलेल्या प्रेमाखातर ते सदैव जनतेसाठी लढायला तयार असतात. भाजपा मधून शिवसेना (शिंदे गट) पक्षात दाखल झाल्यावर त्यांनी शिवसेना पक्ष बांधणी आणि पक्ष वाढीसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले असून जे स्वेच्छेने आपल्या पक्षात येतील त्यांना सामावून घेऊन पक्ष वाढविण्यास सुरुवात केली आहे. माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील त्यांच्यावर विश्वास असल्याने कोणतेही काम करताना ते बेधडक करतात. त्यांच्या याच कार्यशैलीवर भाळून जिल्ह्यातील अनेक युवक त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. त्यामुळे त्यांना मागील विधानसभा निवडणुकीत यशाची पताका फडकविता आली.

आई भवानीचा, रामेश्वराचा आशीर्वाद नेहमीच त्यांच्या पाठीशी राहो आणि जनतेच्या प्रेमाची शिदोरी दिसतात सोबत असो याच आजच्या वाढदिनी त्यांना शुभेच्छा..!

प्रतिक्रिया व्यक्त करा