You are currently viewing नवीन तंत्रज्ञान आत्मसात करा, आकाशही ठेंगणे आहे – डॉ. रूपेश राऊत

नवीन तंत्रज्ञान आत्मसात करा, आकाशही ठेंगणे आहे – डॉ. रूपेश राऊत

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

‘‘स्पर्धात्मक युगात यशस्वी होण्यासाठी सतत शिकणे आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता समजून घेत तंत्रज्ञानाशी जुळवून घेतल्यास तुमचा विकास अनंत शक्यता उघडेल. महाविद्यालयीन शिक्षणानंतरही विद्यार्थी म्हणून टिकून राहा. तंत्रज्ञान हे केवळ साधन आहे, त्याचा उपयोग कसा करावा हे महत्त्वाचे आहे,’’ असे प्रतिपादन उच्चशिक्षण मुंबई विभागाचे सहसंचालक डॉ. रूपेश राऊत यांनी केले.

सेवा मंडळ सोसायटी संचालित श्रीमती मणिबेन एम. पी. शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालयाचा चौथा दिक्षांत समारंभ शनिवार, १५ मार्च २०२५ रोजी उत्साहात पार पडला. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. दिलीप त्रिवेदी यांनी प्रमुख अतिथींसह उपस्थितांचे स्वागत केले.

महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अर्चना पत्की यांनी २०२३-२४ वार्षिक अहवाल सादर केला. प्रमुख अतिथी डॉ. रूपेश राऊत यांचा परिचय परीक्षा विभाग प्रमुख डॉ. दर्शना बूच यांनी करून दिला. नंतर महाविद्यालयाच्या विश्वस्त मंडळींनी डॉ. राऊत यांना सन्मानित केले.

यानंतर कला आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थिनींना पदवी बहाल करण्यात आली. चार विद्यार्थिनींना सुवर्णपदक, तर गुणवत्ताधारक २४ विद्यार्थिनींना त्यांच्या पालकांसह सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शुभांगी कुलकर्णी यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. सरिता कासलकर यांनी मानले. या दिक्षांत समारंभाला महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा