You are currently viewing एक शिवछावा आणि शिवशाही “छावा” चित्रपटाचे महत्त्व

एक शिवछावा आणि शिवशाही “छावा” चित्रपटाचे महत्त्व

 

ख्यातनाम लेखक शिवाजी सावंत यांच्या “छाया” या कादंबरी साहित्य कलाकृतीवर आधारित “छावा” हा हिंदी चित्रपट सद्या बॉलीवूड मध्ये गाजतो आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उटेकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. विक्की कौशल, रश्मिका मंदना, अक्षय खन्ना, दिव्या दत्ता या सर्व कलाकारांनी ह्या चित्रपटात आपला कलात्मक अभिनय साकारला. “छावा” हा चित्रपट ऐतिहासिक विषयावर असल्यामुळे तो लोकांना फार आवडत आहे. यामुळे भारतीय चित्रपट रसिकांमध्ये नवचैतन्य उसळले आहे. त्यातून देशभक्तीचे नवे वातावरण निर्माण झाले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले चिरंजीव स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा हा पहिला एकमेव हिंदी चित्रपट आहे. या आधी कधीही संभाजी महाराजांवर अशा प्रकारची हिंदी चित्रपट कलाकृती कुणीही निर्माण केली नव्हती परंतु कै. नितीन चंद्रकांत देसाई आणि मा. खासदार अमोल कोल्हे या दोन्ही मराठी माणसांनी छोट्या पडद्यावर “राजा शिवछत्रपती” आणि “स्वराज्यरक्षक संभाजी” या दोन मालिका निर्माण केल्यानंतर सर्व दिग्दर्शक, निर्मात्यांनी मराठ्यांच्या इतिहासावर चित्रपट कलाकृती साकारल्या. त्या सर्व चित्रपट कलाकृती मराठी भाषेतल्या होत्या पण आता हिंदी चित्रपट सृष्टीतही अशा ऐतिहासिक चित्रपट कलाकृती निर्माण होऊ लागल्या आहेत.. त्यात छत्रपती संभाजी महाराजांवर अशी कलाकृती निर्माण होणे. हे आश्चर्यकारक आहे आणि कौतुकास्पद आहे.

कारण इतिहासातले संभाजी महाराज हे व्यक्तीचरित्र अनेक गोष्टींनी चुकीच्या विचारातून वाचकांन समोर मांडले गेले होते. त्यात संभाजी महाराजांच्या संघर्षाला पराभूत मानसिकतेचे ग्रहण लागले होते. त्यामुळे मराठी भाषेतही त्यांच्यावर चित्रपट येत नव्हते. जे जुने चित्रपट संभाजी महाराजांवर आले होते. त्यात छत्रपती संभाजी हे व्यक्तीचरित्र अत्यंत वाईट स्वरूपाने दाखवले गेले होते परंतु इतिहास अभ्यासक लेखक विश्वास पाटील यांनी पहिल्यांदा छत्रपती संभाजी महाराजांचे वास्तववादी व्यक्तीचरित्र वाचकांसमोर आणले. त्यामुळे खासदार अमोल कोल्हे यांनी “स्वराज्यरक्षक संभाजी” ही मालिका काढण्याचे फार मोठे धाडस केले. अनेक नकार पत्करून अमोल कोल्हे यांनी अखेर ही मालिका निर्माण केली. नितीन चंद्रकांत देसाई यांच्या “राजा शिवछत्रपती” मालिकेतही संभाजी महाराज हे व्यक्तिचरित्र सकारात्मकतेने दाखवले गेले होते. त्यामुळे दिग्दर्शक लक्ष्मण उटेकर यांनी हे हिंदी चित्रपट करण्याचे शिवधनुष्य धाडसाने उचलले. याकरता लक्ष्मण उटेकर यांचे आभार व कौतुक सर्व मराठी प्रेक्षकांनी करावे. दिग्दर्शक लक्ष्मण उटेकर यांच्यामुळेच आज आपला शिवछावा भारतभर दुमदुमत आहे.

मुघल बादशहा औरंगजेबाने मध्ययुगातील भारतीय जनतेवर अनांमित अत्याचार केले. तो माणूस म्हणून फार मोठा धर्मांध राक्षस होता. त्याने हिंदू धर्मियांना कायम काफीर समजले. म्हणून त्याने तशा प्रकारचे अत्याचार संभाजी महाराजांवर केले. कारण तो शिवशाही संपवण्यासाठी या महाराष्ट्राच्या मातीत आला होता पण या स्वाभिमानाच्या मातीत संभाजीने स्वतःचे धर्मांतर करून घेतले नाही. म्हणून औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचे हालहाल केले. असे जरी असले तरी ही शिवशाहीच्या मराठ्यांनी त्यावेळी सुद्धा मजबूत संघर्ष केला. त्यांचा शंभुराजा तेव्हा दानवी औरंगजेबाच्या ताब्यात होता. अशा परिस्थितीत देखील मराठी मावळ्यांनी फुटभर जमीनही औरंगजेबाला दिली नव्हती. म्हणून औरंगजेबाने संतापून संभाजी महाराजांना हालहाल करुन जीवे मारले. मग त्यांच्या देहाचे तुकडे तुकडे केले. असे झाले तरी स्वराज्याच्या रयतेने ते तुकडे एकत्र करून त्यावर अंतिम संस्कार केले. त्या गोष्टीमुळे स्वराज्यात नवप्रेरणा निर्माण झाली. अठरा पगड जाती-जमातींचा मराठी माणूस पेटून उठला. त्या पेटलेल्या आगीत मुघल सत्ता लढून लढून खचली. त्या होळीत औरंगजेब नावाचा राक्षस मनात तडफडून तडफडून मरण पावला आणि त्याला मराठ्यांनी याच मातीत गाडला.

अफगाणिस्तानपासून बंगालपर्यंत ज्या बादशहाचे साम्राज्य पसरले होते. त्या बादशहाला दख्खंचा संपूर्ण मुलुख जिंकता आला नाही. शिवशाहीचे स्वराज्य संपवता आले नाही. त्याचे अपयश, दुःख, वेदना मनात ठेवून औरंगजेब कुडत कुडत अतृप्त आत्मा म्हणून खणून-खणून मरण पावला. त्याला कदाचित जन्नत सुद्धा प्राप्त झाली नसेल. इतका भयंकर अंत त्याने स्वतः करून घेतला. हा संभाजी राजांचा आणि मराठ्यांचा मोठा विजय आहे. तो विजय दाखवण्याचा प्रयत्न लक्ष्मण उटेकर या दिग्दर्शकाने केला आहे. या चित्रपटामुळे पूर्ण भारतीय समाज जागृत झाला आहे. जगातल्या कोणत्याही मानवतावादी संस्कृतीत औरंगजेबाचे हे कृत्य राक्षसी म्हणूनच गणले जाणार हे निश्चित. त्यामुळे भारतातील सर्वधर्मांनी औरंगजेबाचा निषेध करावा आणि त्याचे नाव रस्त्याला, गावाला, शहराला, वास्तूला दिले जाऊ नये, दिलेले नावही काढून टाकावे. हाच सर्वात मोठा औरंगजेबाचा निषेध असू शकतो. स्वराज्याच्या मराठ्यांनी अशाप्रकारचा अजिंक्यमय लढा शंभूराजांच्या बलिदानानंतर दिला. पुढे पेशव्यांनी मुघल सत्तेला नामधारी करून सव्वाशे वर्ष दिल्लीत एक हाती सत्ता चालवली. हा शिवशाहीचा आणि मराठ्यांचा इतिहास आहे.

अॅड रुपेश पवार

इतिहास प्रबोधक : 9930852165

प्रतिक्रिया व्यक्त करा