You are currently viewing सुजाण ग्राहक बना, गि-हाईक नको — प्रा. एस. एन. पाटील

सुजाण ग्राहक बना, गि-हाईक नको — प्रा. एस. एन. पाटील

*सुजाण ग्राहक बना, गि-हाईक नको — प्रा. एस. एन. पाटील*

वैभववाडी

वस्तू अगर सेवा याचा उपभोग घेणारी व्यक्ती ग्राहक असते. जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती ही ग्राहकच असते. परंतु सुजाण ग्राहक आणि गि-हाईक यामध्ये फरक आहे. वस्तू अगर सेवा खरेदी करताना जागरूकता बाळगतो तो सुजाण ग्राहक आणि आंधळेपणाने व्यवहार करतो तो गि-हाईक बनतो. आपण सुजाण ग्राहक बनावे गिर्‍हाईक नाही असे आवाहन वैभववाडी महाविद्यालयात आयोजित केलेल्या जागतिक ग्राहक दिन कार्यक्रमात ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष व राज्य सहसचिव व अशासकीय सदस्य प्रा. श्री. एस. एन. पाटील यांनी केले.
वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील कॉमर्स असोसिएशन आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्हा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ४३ वा जागतिक ग्राहक दिन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.एन.व्ही. गवळी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.श्री. एस. एन. पाटील बोलत होते.
दिनांक १५ मार्च १९६२ रोजी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ.केनेडी यांनी ग्राहकांच्या मुलभूत चार हक्कांची घोषणा केली. दि.१५ मार्च १९८३ रोजी पहिला जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाने ९ एप्रिल १९८५ रोजी ग्राहक हक्कांचे प्रमाणित स्वरूप जाहीर केले.
ग्राहक संरक्षण कायदा-१९८६ नुसार ग्राहकांना मिळालेले हक्क, अधिकार तसेच ग्राहकाची कर्तव्ये याबाबत जागरूकता असली पाहिजे.
वस्तू, सेवा खरेदी करताना घ्यावयाची काळजी, फसवणूक झाल्यास तक्रार कोठे करावी, त्रिस्तरीय ग्राहक न्यायालये व ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे कार्य व काही उदाहरणे देऊन प्रा.पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रबोधनपर मार्गदर्शन केले.
आजच्या ऑनलाईन जमान्यात प्रत्येकाने सजग राहिले पाहिजे. अन्यथा आपली फसवणूक अटळ आहे. आपली फसवणूक झाल्यास गप्प न बसता योग्य ठिकाणी तक्रार केली पाहिजे. अधिक माहितीसाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेशी संपर्क साधावा असे अध्यक्षीय भाषणात डॉ. एन.व्ही.गवळी यांनी आवाहन केले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कॉमर्स असोसिएशनचे प्रमुख प्रा.आर.बी.पाटील यांनी केले तर आभार उपप्राचार्य डॉ.एम.आय. कुंभार यांनी मांडले.

प्रतिक्रिया व्यक्त करा