राज्य उत्पादनाची कारवाई; इनोव्हा कारसह १३ लाखाचा मुद्देमाल जप्त..
बांदा :
बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी गुहागर येथील एकाला राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३ लाख २५ हजारच्या दारू सह इनोव्हा कार असा मिळून १३ लाख २५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई काल बांदा येथे करण्यात आली. प्रथमेश दीपक भाटकर (वय २९, रा. गुहागर) असे संशयिताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहीती अशी की, बांदा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वाहनांची तपासणी करीत असताना संशयिताच्या इनोव्हा गाडीच्या मागील सीटवर ४२ बॉक्स अवैध मद्यसाठा आढळून आला. यावेळी त्याच्याकडून ३ लाख २५ हजार २०० रुपयांची बनावटी दारू आणि १० लाखाची इनोव्हा कार मिळून तब्बल १३ लाख २५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी संशयिताला ताब्यात घेऊन त्याच्यावर बांदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई निरीक्षक भानुदास खडके, दुय्यम निरीक्षक प्रदीप रास्कर, दुय्यम निरीक्षक, विवेक कदम, दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे, जवान रणजीत शिंदे, दिपक वायदंडे, सागर सुर्यवंशी, अभिषेक खत्री यांनी केली. या प्रकरणी पुढील तपास दुय्यम निरीक्षक प्रदीप रासकर हे करत आहेत.