विसाव्या शतकातील सत्तरच्या दशकापासून अव्याहतपणे पत्रकारितेच्या माध्यमातून आपल्या निर्भय, घणाघाती व चौफेर शब्दाने आणि वाणीने युवकांच्या मनात आपले वेगळे आगळे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या जैमिनी शारदा कडू उर्फ प्राध्यापक जैमिनी कडू यांचा जन्म व मृत्यू एकाच दिनांकास म्हणजे दिनांक 17 मार्च रोजी झाला. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील तुळजापूर गढी (तालुका मोर्शी) या गावचे ते रहिवासी असले तरी जैमिनी कडू यांचा जन्म मात्र छत्तीसगडच्या किर्र जंगलातील एका आदिवासी महिलेच्या झोपडीत रात्री अकरा बाराच्या सुमारास झाला. शिक्षक वडील भाऊसाहेब कडू यांना 1942 च्या एका आंदोलनात गुन्हा नोंदविण्यात आला होता. पोलीसांकडून अटक होऊ नयेत म्हणून ते छत्तीसगड (म.प्र) राज्यातील रायगढ गावाजवळील जंगलात भूमिगत झाले होते. त्यांना भेटायला जैमिनीची माय शारदा पायी जात असतांनाच रात्री 11-12 वा पोटात प्रसववेदना सुरू झाल्या व तेथेच थांबून एका आदिवासी महिलेच्या झोपडीत त्यांचा जन्म झाला. जन्मापासूनच निसर्गाच्या सोबतीने वाढलेला जैमिनी नावाचा मुलगा पुढे पत्रकार म्हणून प्रसिद्ध झाला. तत्कालीन लोकमत मधील ‘युवास्पंदन’ नावाच्या स्तंभ लेखनाने त्यांनी त्यावेळी युवकांच्या मनावर अधिराज्य केले होते.
मूळचे अमरावती जिल्ह्यातील तुळजापूर (गढी) येथील रहिवासी असलेले जैमिनी कडू यांनी आपले अमरावती येथील महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर नागपूर ला गेल्यानंतर त्यांना आपल्या पत्रकारितेच्या जीवनाची सुरुवात कवीवर्य सुरेश भट संपादित ‘बहुमत’ च्या संपादकीय विभागातून करण्याचे भाग्य जमिनींना लाभले. त्यांचे वडील शिक्षक असले तरी आर्थिक हालाकीच्या परिस्थितीत व साहित्याच्या ओढीमुळे ते नागपूरला गेले होते व पत्रकार म्हणून कामास सुरुवात केले आणि योगायोगाने नागपूर येथील मॉरिश कॉलेजमध्ये मराठीत डबल एम ए करण्यासाठी साठी त्यांनी प्रवेश घेतला. शब्दावर प्रचंड पकड असलेल्या जैमिनीच्या वक्तृत्व शैलीने तत्कालीन मॉरिश कॉलेज आताचे वसंतराव नाईक कला विज्ञान संस्था नागपूर येथे ते कमालीचे प्रसिद्ध झाले. त्यानंतर संपूर्ण विदर्भात आणि महाराष्ट्रात महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा च्या निमित्ताने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा परिचय झाला. महाविद्यालयीन जीवनात मॉरिश कॉलेजचे प्राचार्य प्राध्यापक मधुकर आष्टीकर, प्राध्यापक शरदचंद्र मुक्तीबोध, प्राध्यापक माणिक गोडघाटे उर्फ कवी ग्रेस, प्राध्यापक डॉक्टर मालती पाटील यांच्या मार्गदर्शनात जैमिनीचा विकास होत गेला आणि जैमिनी या नावाला वलय प्राप्त झाले.
पुढे लोकमत मध्ये उपसंपादक म्हणून काम करतांनी ‘उमलत्या पिढीची स्पंदने’ व ‘युवा स्पंदन’ या स्तंभ लेखनाने तर ते युवक विद्यार्थी व साहित्यिक वर्गात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचले. एवढेच काय जैमिनी या नावामुळे तो पुरुष की स्त्री यासाठी तरूण व तरुणीमध्ये शंका उपस्थित होत असल्याने त्यांना पाहण्यासाठी लोकमत मध्ये तरूण तरुणींच्या रांगा लागत होत्या. पुढे त्यांनी विदर्भ साहित्य संघाचे निवडणूक लढविल्यानंतर व प्रचंड मताने निवडून आल्यानंतर ते बहुजन असल्यामुळे त्यांना अस्पृश्यासारखी वागणूक मिळाल्यामुळे केवळ नामधारी सदस्य म्हणून राहणे पसंत नव्हते. त्यामुळे जैमिनीने विदर्भ साहित्य संघाचे जिल्हा साहित्य संमेलन नावाची साहित्य चळवळ सुरू केली होती. त्या काळात विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्राध्यापक राम शेवाळकर हे होते. लोकमत मध्ये काम करीत असताना आपल्या शोध पत्रकारितेच्या शैलीमुळे राजकारणी व भ्रष्टाचारी अधिकारी लोकांमध्ये त्यांचा बद्दल भीती निर्माण झाली होती.
1970 ते 80 हे दशकच संपूर्ण भारतात चळवळीचे दशक म्हणून प्रसिद्ध झाले होते लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण क्रांती आंदोलन व अन्य छोट्या-मोठ्या चळवळी भारतामध्ये आकार घेत होत्या जैमिनीचे मन संवेदनशील असल्याने या चळवळीत ही ते अग्रस्थानी होते. महाविद्यालयात असतांनाच वक्तृत्वशैली व अभ्यासामुळे ते प्रसिद्ध झाले होते. पत्रकारितेमध्ये असताना त्यांनी अन्याय अत्याचार विरोधात आपली लेखणी प्रभावी शस्त्रासारखी राबविली. पुढे जैमिनी कडू यांना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा ‘श्रमिक पत्रकार पुरस्कार’ मिळाला. परंतु नागपूर मधील पत्रकारांना ते पचनी पडले नव्हते. त्यांना नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे कधीच पदाधिकारी होता आले नव्हते. मात्र महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष पद त्यांना योगायोगाने मिळाले. या काळात बिहार प्रेस बिल विरोधी आंदोलनाचे त्यांनी नेतृत्व केले होते. त्यांनी ऑल इंडिया रिपोर्टर जर्न्यालिस्ट एन्ड नाॅन-जर्न्यालिस्ट युनियनच्या अध्यक्ष पदाची निवडणूक ही यशस्वीपणे लढविली होती. परंतु पत्रकारितेच्या काळात ब्राह्मण्य ही प्रवृत्ती किती विषारी आहेत असते याचा त्यांना अनुभव आला. तसेच ब्राह्मण या प्रवृत्तीचे गुलाम असलेल्या बहुजन सहकाऱ्यांच्या गुलामीचाही अनुभव त्यांना या काळात आला.
1972 ते 1989 हा काळ पत्रकारितेत घालविल्यानंतर नंतर त्यांच्या चाहत्या वाचक वर्गासोबत हितशत्रूंची संख्या ही वाढत होती. पुढे लोकमतचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी अर्धवेळ प्राध्यापक म्हणून शिक्षकी पेशात प्रवेश घेतला. पुर्वी पासूनच त्यांनी दलित पॅंथरची चळवळ, वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली बामसेफ व पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मराठा सेवा संघाच्या कार्यात मोलाचा हातभार लावला. बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा या संघटनेच्या अधिवेशनासाठी तर ते भारतभर फिरले. एक प्रभावी व्यक्ती म्हणून पुरोगामी चळवळीत परिवर्तनवादी म्हणून त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली होती. जैमिनी कडू यांनी परिवर्तनाचा विचार केवळ फॅशन म्हणून स्वीकारला नाही तर प्रत्यक्ष जीवनातही अंमलात आणला. त्यांनी हुंडा विरोधी चळवळ राबविली आणि स्वतः हुंडा न घेता विवाह केला. तसेच जाती छोडो आंदोलनात सहभाग घेतल्यानंतर त्यांनी शिला भांडारकर पाटील या तरुणीशी आंतरजातीय विवाह केला. जीवनसाथी शीला भांडारकर-पाटील उर्फ शैल जैमिनी यांच्या व्यक्तिमत्व विकासापासून वैचारिक विकासापर्यंत तिला पूर्ण साथ दिली. जगाच्या पाठीवर केवळ हिंदू धर्मातच स्त्रियांच्या कपाळावर कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, नाकात नथ, पायात जोडवे, हातात बांगड्या आहेत या सर्व स्री दास्यत्वाच्या खुणा आहेत. त्यामुळे शैल जैमिनी हिने या स्त्री दास्यत्वाची चिन्हे फेकून दिली. परंतु यामुळे शैलला “तुझा नवरा मेला का?” अशी बोलणी त्या काळात ऐकावी लागली होती. त्यावर शैल व जैमिनी दोघेही “होय, माझा परंपरावादी नवरा मेला आहे आणि परिवर्तनवादी नवरा जिवंत आहे” अशी उत्तरे दिल्यानंतर लोकांची तोंडे बंद होत असत.
जैमिनीच्या परिवर्तनवादी व स्पष्ट विचारामुळे त्यांना त्यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात प्राप्त झाला होता. त्यातूनच पुढे त्यांनी डॉक्टर राम कोल्हे, डॉक्टर दीपक केदार, सतिश पावडे, डॉक्टर दिनकर येवलेकर, विलास अवतारे, अशोक चोपडे, प्रभाकर पावडे, सी.एम.लोणारे, बळवंत भोयर, कांतीलाल वाघमारे, नरेश मित्र, रवी माडेवार, अश्रफ सैयद, आशू सक्सेना, संध्या राजूरकर, नुतन माळवी, मंजुषा शिंगरू, अर्चना अलोणी, जयश्री खवासे, मिनल येवले, विजय व छाया इमाने, विठ्ठल घोडे, चोपडा-नाशिक चे अनिल पालीवाल, मुंबई चे पारा. मनोहर, मनमाड प्रदीप गुजराथी, यांच्या सहकार्यातून ‘युवा साहित्य समाज’ (युसास) नावाची युवक विद्यार्थ्यांची साहित्य संघटना निर्माण केली. ‘युसास’ च्या नावाखाली त्यावेळी (1985-1992) या काळात विद्यार्थी युवकांचे पाच मराठी साहित्य संमेलन ही भरविण्यात आली. प्रस्तुत लेखक युसासच्या निर्मितीमुळे जैमिनीसोबत वैचारिक रित्या जुळले होते.
जैमिनी कडू च्या वैचारिक प्रभावाने त्याकाळी युवा वर्गात सळसळीचे चैतन्य निर्माण झाले होते. नागपूर च्या रस्त्याच्या परिस्थितीवर पहिल्यांदाच प्रखर लेखन करणाऱ्या जैमिनींना दुर्दैवाने नागपुर येथील रस्ता अपघातात त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. त्यातच दिनांक 17 मार्च 2018 रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांची जन्मतारीख 17 मार्च व मृत्यूचा दिनांक 17 मार्च हा एकच आहे.
जन्म तारखेच्या दिवशीच मृत्यू होणाऱ्या या आगळ्या- वेगळ्या अवलिया ने मृत्यूच्या पूर्वी ‘बौद्ध धर्म’ स्वीकारला होता. परंतु अनेकांना ते माहित नसावे. मृत्यूनंतर त्यांचे देहदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या अंत्यदर्शनास अलोट गर्दी झाली होती. त्यावेळी अनेक धर्माच्या प्रार्थना घेण्यात आल्यानंतर त्याच वेळी एक बौद्ध भन्ते तेथे उपस्थित होते. त्यांनी भितभितच बौद्ध धर्माची प्रार्थना म्हणण्याची परवानगी मागितली आणि जैमिनीच्या बौद्ध धर्म स्वीकारण्याच्या योगायोगाने सर्वात शेवटी बौद्ध धर्माची प्रार्थना म्हटल्यानंतर त्यांचा देह वैद्यकीय महाविद्यालयाच्या हवाली करण्यात आला. या घटनेचे सुद्धा प्रस्तुत लेखक साक्षीदार आहेत. जन्माने अमरावती जिल्ह्यातील जैमीनी कडू यांची कर्मभूमी नागपूर असली तरी प्रबोधनाच्या कार्यक्रमासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र व भारतभर भ्रमंती केली होती. अमरावतीच्या मातीने सुरेश भट व जैमिनी कडू सारखे पत्रकार, साहित्यिक दिल्यामुळे जैमिनी कडू यांचे स्मारक अमरावती या ठिकाणी होणे न आवश्यक आहे.
15/3/2025
*-डॉ. दीपक केदार*
निवृत्त सहसंचालक, लेखा व कोषागारे, अमरावती
9860 778 227