*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि. ग. सातपुते यांच्या काव्याचे लेखक विनय पारखी यांनी केलेले रसग्रहण*
*राऊळीची दीपमाळ*
भेटलीस गं तू मज नदीकिनारी जेंव्हा ।
संथ मंजुळमंजुळ सरिता नादत होती ।
तीरावरच्या त्या रम्य राऊळ गाभारी ।
निरांजनी मंदमंद फुलवात उजळत होती ।।१।।
पारावरी त्या झुळझुळला होता पिंपळ ।
वाळवंटी त्या सांजवेळ थबकली होती ।
लेवुनी अलगदी गडदकेशरी रंगली संध्या ।
उपसत वाळु झऱ्यातुनि तू कुंभ भरित होती ।।२।।
तव नाजुक कटीवरुनी झरझरता तो कुंभ ।
पाहता तुज मन तृप्त अधीर पापणी बंद ।
छुमछुम छंनछंन छुमछुम घुमता पैंजण ।
त्या नादात घुंगरांच्या प्रीत गुंतली होती ।।३।।
नकळत हळुच वळुनी सहजच पाहिलेस तूं ।
झाले धुंद श्वास अन स्पर्श भास अनामिक ।
झणी, अवचित भावली, तव गालीची खळी ।
साक्षी लोचनी दीपमाळ राऊळीची होती ।।४।।
…….भेटलीस गं तू मज …..
भावकवी विगसा
भावकवी विगसा सरांच्या या कवितेचं रसग्रहण त्याचे परम मित्र आणि जेष्ठ साहित्यिक श्री. श्रीकांत दिवशीकर सरांनी अतिशय छान शब्दात केलं आहे. ,ते म्हणतात .. “खूप काही अपेक्षा करावी आणि सत्यात काहीतरी वेगळंच असावे, असे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात नेहमी येतात. कोणतीही अपेक्षा न करता मिळणारी गोष्ट जे सुख देऊन जाते त्याला तोड नसते. पण स्वप्नात सुद्धा न पाहिलेले सत्य समोर उभे ठाकते तेव्हा त्याचा स्वीकार करताना मनाची घालमेल होते आणि हेच ह्या कवितेचं सौन्दर्य आहे.”
खरंच ‘राऊळीची दीपमाळ’ कविता इतकी सुरेख, गेय आणि थेट काळजाला भिडणारी झाली असल्याने आणि जेष्ठ साहित्यिक श्री. श्रीकांत दिवशीकर सरांनी त्याचे योग्य असे रसग्रहण केल्यामुळे मलाही त्या कवितेचे रसग्रहण करण्याचा मोह आवरता आला नाही म्हणून मी लिहिता झालो आहे.
मराठी साहित्यक्षेत्रातील आद्यकवी केशवसुत यांच्या काळापासून प्रेम कवितांचा प्रवाह मुक्तपणे वाहत आला आहे. त्याचाच प्रत्यय ही कविता गुणगुणताना येतो. प्रत्येक व्यक्तीने त्याच्या आयुष्यात कोणा ना कोणावरती, कधी ना कधी तरी प्रेम हे केलेलंच असतं. मानवी आयुष्यात प्रेम हे फार महत्वाची भूमिका बजावते. प्रेम म्हणजे एखाद्याविषयी मनामध्ये निर्माण होणारी आपुलकी, जिव्हाळा. एकदा का एखाद्या गोष्टीवर प्रेम जडलं तर मग ती गोष्ट हवीहवीशी वाटायला लागते, त्या गोष्टीचा सहवास हवाहवासा वाटायला लागतो. हेच असतं खरं प्रेम.
विगसा सरांच्याच भाषेत सांगायचे झाल्यास… “प्रत्येक मानवी जीवाच्या संवेदनांची आत्मिक परिभाषा ही सारखी असते, तसेच त्यांच्या मनांच्या कंगोऱ्यांची स्पंदने, त्यांची उलघाल ही सारखीच असते. विवेकी संयमावर त्याची तीव्रता अवलंबून असते. अंत:करणाला मृदुल स्पर्श करणारे अर्थपूर्ण प्रबोधनात्मक शब्दभावबंध हेच उत्तम साहित्याचे महत्वाचे निकष असतात .या संवेदना व्यक्त करताना अंतरमनातून जेंव्हा वैचारिक शब्दभावनाक्षरातून त्या जेंव्हा व्यक्त होतात तेंव्हा त्या कल्लोळी मनभावनांचा आशयघन आणी काळजाला छेदून जाणारे मुक्त वास्तव विवेचन असते तेच खरे वांगमयीन लेखन, काव्य रचना अक्षरबद्ध होते तेच साहित्य असते.” याचाच प्रत्यय त्यांची ‘राऊळीची दीपमाळ’ कविता वाचताना येतो.
काही कविता नुसत्या वाचल्या तरी त्या कवितेतील शब्द, कवीने कवितेत केलेली निसर्ग निर्मिती, कवितेची सुमधुर काव्यरचना मनाला भुरळ घालतात, त्यांच्यापैकीच एक ही सरांची काव्यरचना. सरांनी या कवितेत केलेली प्रेममय वातावरण निर्मिती वाचकांना प्रतिभेचा उतुंग साक्षात्कार देऊन जाते. झुळझुळ अशा मंजुळ स्वरांनी वाहणाऱ्या संथ नदीकिनारी असलेल्या मंदिरात देव दर्शनासाठी आलेला प्रियकर मंदिराच्या गाभाऱ्यात ज्यावेळी देवा समोर नतमस्तक होऊन निरांजनात फुलवात लावत असताना अचानक त्याचं लक्ष बाहेर नदीकिनारी पाणी भरायला आलेल्या सुंदर ललनेकडे जातं आणि तिच्या विषयी त्याच्या मनांत उत्पन्न होत असलेली प्रेमभावना कवी विगसा सरांनी अतिशय छान शब्दात व्यक्त केली आहे. ते म्हणतात….
भेटलीस गं तू मज नदीकिनारी जेंव्हा ।
संथ मंजुळमंजुळ सरिता नादत होती ।
तीरावरच्या त्या रम्य राऊळ गाभारी ।
निरांजनी मंदमंद फुलवात उजळत होती
परंतु विगसा सर त्यावेळी नुसतीच त्या प्रियकराच्या मनातील प्रेम भावना व्यक्त करत नाहीत तर त्यावेळेचे संपूर्ण निसर्गचित्रच वाचकांच्या डोळ्यापुढे उभे करतात. ते निसर्गचित्र रंगवताना ते लिहितात..
पारावरी त्या झुळझुळला होता पिंपळ ।
वाळवंटी त्या सांजवेळ थबकली होती ।
लेवुनी अलगदी गडदकेशरी रंगली संध्या ।
उपसत वाळु झऱ्यातुनि तू कुंभ भरित होती
तव नाजुक कटीवरुनी झरझरता तो कुंभ ।
पाहता तुज मन तृप्त अधीर पापणी बंद ।
छुमछुम छंनछंन छुमछुम घुमता पैंजण ।
त्या नादात घुंगरांच्या प्रीत गुंतली होती
विगसा सरांची आकर्षक शब्दरचना व प्रेमाचे केलेले यतार्थ वर्णन वाचकांना कविता वाचताना त्यात खिळवून ठेवतात. वाचकांच्या डोळ्यापुढे ते काव्य चित्र हुबेहूब उमटत जाते हीच भावकवी विगसा सरांची प्रेमकविता लिहिण्याची खासियत आहे. या कवितेला एक लय आहे. तिला पाहताच मनात अचानकपणे उमटलेली अबोल भावना आणि प्रियकराला ध्यानीमनी नसताना अचानक झालेला प्रेमाचा साक्षात्कार या कवितेत आहे. मंदिरात जाताना प्रियकराच्या मनाची झालेली द्विधा अवस्था व प्रेममय वातावरण निर्मिती तसेच हुबेहूब निर्माण केलेले निसर्गचित्र हा सरांच्या प्रतिभेचा उतुंग साक्षात्कार या कवितेत वाचकांना दिसून येतो.
प्रेम कवितेत नुसते शब्द महत्वाचे नसतात तर त्यात महत्वाचं असतं ते आठवणींच्या भावनांच्या अनुभूतीच प्रतिबिंब. जगण्याच्या धावपळीत दिवस कसाही निघून जातो पण दिवेलागणीची वेळ झाली की मनात आठवणी दाटून येतात. सरांची कविता जिवंत होऊन अलगदपणे वाचकांच्या गाभ्यात उतरते हा त्यांच्या उत्कट आणि प्रामाणिक जगण्याचा शब्दविस्तार आहे. वास्तविक पाहता दिवेलागणीची वेळ म्हणजे सूर्य मावळतीला उतरत असतानाची वेळ. यावेळी वातावरणातील प्रकाश, उजेड, ऊर्जा कमी कमी होत जात असते आणि त्या प्रकाशाची ऊर्जेची कमतरता भरून काढण्यासाठीच दिवे लावले जातात. त्याचवेळी नाजूकशा पावलांनी लक्ष्मीचे आगमन होते. हे वास्तव सरांनी अत्यंत खुबीने या कवितेत रेखाटले आहे. प्रेमकविता लिहितानाही वास्तव व अध्यात्म याचा सादर केलेला सुंदर मिलाफ येथे आपल्याला सुखावून जातो. हीच सरांच्या शब्द सामर्थ्याची खरी खासियत आहे.
नकळत हळुच वळुनी सहजच पाहिलेस तूं ।
झाले धुंद श्वास अन स्पर्श भास अनामिक ।
झणी, अवचित भावली, तव गालीची खळी ।
साक्षी लोचनी दीपमाळ राऊळीची होती
तिने नकळत वळून बघताना तिचा मिळालेला होकार अतृप्त मनाला प्रसन्नतेचा स्पर्श करून जातो. त्या मिळालेल्या अनुभूतीने श्वास धुंद होतात, स्पर्श अनामिक होतात, मनातल्या मंदिराच्या गाभाऱ्यात पडलेला प्रकाश त्या अनुभूतीने सात्विक समाधान देऊन जातो. इथे ‘राऊळीचा गाभारा’ म्हणजे मनातल्या या मंदिरात आणि ‘दीपमाळ’ म्हणजे निसर्गदेवतेच्या पवित्र वास्तू सानिध्यात मनातल्या या देवळात दीपमाळेमुळे पडणारा लख्ख प्रकाश त्या निसर्ग सौन्दर्यात अजूनच भर घालत असतो असा अर्थ. हीच असते खरी पूजा, हाच असतो आत्मसंवाद, हेच असतं सात्विक समाधान. आता मनाच्या अवकाशात फक्त सगळा निसर्ग व्यापून उरतो मनाचा मनाशीच सुसंवाद चालू होतो. मनात आनंदलहरी उमटतात. समोरच्या निसर्गाने मनाला आलिंगन दिलेले असते आपण त्या अथांग गडद केशरी संध्येलाच कवेत घेण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या छोट्याश्या डोळ्यांनी ते दृश्य टिपून घेत असतो. अशा वेळी मनामध्ये उत्पन्न होणारी प्रेमभावना सरांनी खूप छान प्रकारे व्यक्त केली आहे. भावकवी असेलल्या विगसा सरांच्याच भाषेत सांगायचे झाल्यास ‘अगदी मुक्तमोकळं कुणालाही न दुखवता जीवनात व्यक्त होत जगत रहावं..! हा निर्मोही संस्कार आहे तिथेच तर देवत्व, संतत्व प्रत्ययास येत असतं.
*(c) विनय पारखी*