You are currently viewing काकल्याचे तर्कट : ४

काकल्याचे तर्कट : ४

*साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक साहित्यिक विनय सौदागर लिखित लेख*

 

*काकल्याचे तर्कट : ४*

 

*मराठीचो गौरव*

 

नुकताच मराठी भाषा गौरव दिन पार पडला होता. मी गावामध्ये एका कार्यक्रमाला उपस्थित राहून त्या ठिकाणी भाषण दिलं होतं. अर्थात हे काकल्याच्या कानावर जाणार आणि तो मला काहीतरी विचारणार, हे मी गृहीतच धरलं होतं. तसा काकल्या आलाच. आल्या-आल्या मला म्हणाला,”काय मगे, मराठीचो बर्थडे साजरो केलास मां?”

मी म्हणालो,”काकल्या, काय ही तुझी भाषा? अरे बर्थडे काय ,गौरव दिन आहे तो.”

“म्हायत हा.” काकल्याने बुड टेकले अन् सरसावत म्हणाला,”तुमी फकस्त उत्साव करतास, म्हणान मी बर्थडे हुतलय इतक्याच. कोणाकच काय्येक करूचा नाय आसा.”

“तुला असं म्हणायचं आहे का की,”मराठी भाषेबद्दल कोणालाच प्रेम नाही?” मी विचारलं.

“नाय, प्रेम आसा, पण ह्या जा काय तुमी करतास, ता पुरेसा नाय. हेच्यात्सून मराठी भाषा वाचाची नाय.”काकल्याने आपला निषेध नोंदवला.

“मग काय करायला हवं?”

“अरे सगळ्यानी मराठीतच बोलाक होया, (हे तो मालवणीत सांगत होता) मराठी पुस्तका वाचूक होयी, मराठी शाळेत आपल्या पोरांक धाडूक होयी. तू भाषण देतंस ‘मराठी वाचवचा’ आणि तुजी पोरा शिकली इंग्लिश शाळेत. असा कसा चलात? मराठी शाळा वाचतले कशे?”

काकल्या उपदेशाच्या भूमिकेत पूर्ण बुडला होता.

“ह्या बग, गावच्या शाळेत वर्ग सात, पोरा ३५ आणि मास्तर तीन. पोरांक मास्तर वाट्याक कसो येतलो. ते शिवाय कामगिरी, मिटींगी, संमेलना, सुटये,पर्धा… हेच्यात शिकवणा खय सांडला ता तरी बगा.”

“अरे पण जादा शिक्षक देणं शासनाला परवडत नाही.” मी काहीतरी तडजोडीचे बोलत होतो, पण तो ऐकत नव्हता.

“गावांत जास्त पटाची एक शाळा आसूची असा सरकारचा धोरण होता मा? ता तुमका नको. आसपासची पोरा येवन् येक शंभर पटाची शाळा झाली, तर पुरेशे मास्तर मेळले असते. पूर्वी पाच दहा किलोमीटर चलत मुला येयतच मा शाळेत? आता तर सगळ्यांकडे गाडयेय आसत; सरकार पण सोय करूक तयार हा; पण तुमका दोन पोरांसाठी वाडये-वाडेतय शाळे होये. असल्यान सगळाच बंद पडतला. अरे योग्य उपाय योजना नाय झाली तर बर्थडे सोडा मराठीचा श्राद्ध घालूची पाळी येतली ”

माझ्याकडे न बघताच काकल्या चालू लागला. पिंडाला कावळ्याने टोच मारावी, तसा तो मला बोचकारून निघून गेला होता.

 

विनय सौदागर

आजगाव सावंतवाडी

9403088802

प्रतिक्रिया व्यक्त करा