शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची माहिती
मालवण :
कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त १६ मार्च रोजी टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग मैदानावर सायंकाळी ४ वाजता शिवायन या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. याचबरोबर निलेश राणे यांच्या वाढदिवस मतदार संघाबरोबर संपूर्ण जिल्ह्यात विविध उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. सध्या अधिवेशन सुरू असल्याने निलेश राणे यांचा वाढदिवस १७ मार्च एवजी १६ मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. यावेळी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार भैय्या सामंत यांच्यासह महायुतीचे सर्व नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
कुंभारमाठ येथील निवासस्थानी श्री सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बबन शिंदे, महेश कांदळगावकर, दीपक पाटकर, महेश राणे, संतोष सातवीलकर, बाळू नाटेकर, अशोक बागवे, आनंद खवणेकर, श्री तोडणकर, श्री खवणेकर, अरविंद साटम, निलेश बाईत, विनोद साटम, विनायक बाईत यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
श्री सामंत, म्हणाले सध्या अधिवेशन सुरू असल्याने निलेश राणे यांनी अधिवेशनाला उपस्थित राहणे आवश्यक असल्याने वाढदिवस १६ मार्च रोजी साजरा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने त्यांच्या वाढदिवस भव्य दिव्य स्वरूपात आगळ्यावेगळ्या उपक्रमांनी साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यात १६ मार्च रोजी टोपीवाला हायस्कूल बोर्डिंग मैदान छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित शिवायन या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. हे महानाट्य सर्वसामान्य शेतकरी महिला भगिनी यांनाही पाहता यावे यासाठी ग्रामीण भागातून त्यांना येथे आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मतदार संघातील ३५० ते ४०० जिल्हा परिषद शाळांमध्ये ज्या शाळांची पटसंख्या ५० व अधिक आहे अशा शैक्षणिक संस्थांना मेडिकल किट उपलब्ध करून दिले जाणार आहे, अशी माहिती श्री सामंत यांनी यावेळी दिली.
