You are currently viewing आज महिला दिन की दीन आहे?

आज महिला दिन की दीन आहे?

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री शीला टाकळकर लिखित अप्रतिम लेख*

 

*आज महिला दिन की दीन आहे?*

**************************

अन्याय होत असता लांबून पाहते मी

झाकून कान डोळे उच्चार टाळते मी

 

शीला

 

महिला दिनाच्या शुभेच्छा मिळाल्या धन्यवाद सर्वांना..

 

दरवर्षी देताच की या शुभेच्छा..पुढे काय झालं?

मला या ‘शुभेच्छांचा ‘ अर्थच कळला नाही.

“म्हणजे काय?”

या प्रश्नांची अनेक उत्तरे माझ्या मनाने सांगितली ती अशी..

 

1.आत्तापर्यंतच्या कठीण परीक्षा पार करून तू परीक्षेत प्राविण्य मिळवलेस आणि वरच्या वर्गात गेलीस, या पुढेही तुला आणखी वरच्या वर्गातल्या कठीण प्रश्नांना सामोरे जावे लागेल त्या बद्दल शुभेच्छा….आप लढो हम कपडे संभालते है.

 

2.निदान आजच्या दिवशी तरी आनंदी रहा.. नंतर आहेच आपलं पहिले पाढे पंचावन्न .

 

3.तिकडे दिल्ली, कलकत्त्याला,स्वारगेटला, मुंबईत जोगेश्वरीत , शवागारात बायकांच्या शवासोबत,काय घडले, शेजारी काय घडत आहे,वगैरे उगीच.. नको त्या ठिकाणी डोकं नका लावत बसू..ते तिकडे आपल्या घरापासून दूर, किंवा भिंती पल्याड बंद दाराच्या आड कुठेतरी झाले असेल,तो विषय आज आत्ता नको.. आज कसं पाॅझीटिव्ह बोला..त्या तिकडे बघणारे बघतील काय ते..

तुम्ही तर सुरक्षित आहात नं मग करा की महिला दिन साजरा…

 

नंतर त्या निर्भयांसाठी काढूत की आपण मेणबत्यांचा मोर्चा..

एकेक मेणबत्ती विझत चालली की लगेच दुसरी पेटवूत… तुम्ही नका लक्ष देऊ तिकडे.. निदान आज आनंदाच्या दिवशी तरी..

 

तुमची स्वतःची झाली आहे नं प्रगती..मग करा उत्सव साजरा…नव्या साड्या नेसा,मेकप करा..आणि ज्या बायकांनी इतिहास रचला त्यांचे गोडवे गा..त्या किती महान होत्या.. वगैरे..जिजाऊ ने

शिवाजी महाराज घडवले..

सिंधुताई ने कसा अन्याय सहन केला आणि नंतर त्या महान झाल्या..

झाशीची राणी लक्ष्मीबाई..यांच्यावर झालेल्या अन्याय…

सावित्रीबाई फुले नी शेणाचे गोळे झेलले…त्या किती महान होत्या ..

पण इतिहासात हे कुठेही लिहिले नाही की, सिंधुताईंचा छळ होत असताना शेजारी महिलांनी त्यांना मदत केली की नाही,आणि छळणाऱ्या लोकांना नंतर शिक्षा झाली की नाही, तसेच सावित्रीबाई वर शेणाचे गोळे फेकणाऱ्यांना काय शिक्षा झाली ..

 

आणि हो कार्यक्रम संपला की या, वेळेत घरी.. आपल्याला तेवढीच कामे नाहीत..

 

आपल्या मुलीवर मात्र लक्ष असू द्या..तिला एकटीला कुठे शक्यतो पाठवत जाऊ नका..

तिला कराटेच्या क्लास लावला पाहिजे..वेळ पडली तर नुसती बघ्यांची गर्दी वाढते कुणी मदतीला येत नाही..

 

मुलांनी कसं वागावं,परस्त्रीचा कसा आदर करावा..हे सांगायची गरज नाही..ते कसेही वागले तरी काही बिघडत नाही.

 

आज पार्टी आहे बायकांची. ..मग घरच्या लोकांची काय सोय???.

जास्त उशीरापर्यंत बसू नका…

सातच्या आत घरात या..

 

मला कुणी “महिला दिनाच्या शुभेच्छा” दिल्या की येवढा आणि असाच अर्थ

लागतो.

 

आज 8 मार्च 2025, आहे असे वाटतच नाही.. असं वाटतय की आजही आपण 1857 चाच 8 मार्च

साजरा करत आहोत..

1857,साला पासून हेच चालत आले आहे..बदल कुठे झालाय?

 

चाटण स्त्री स्वातंत्र्याचं

ँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँ्ँँ

“मी सहन केल,

आता तू सहन करु नकोस

तू आता विरोध कर

पेटुन उठ,

स्त्री स्वातंत्र्य हवं

म्हणजे हवच”

 

अशी,

माझी पनजी

माझ्या आजीसाठी

म्हणत होती.

 

माझी आजी

माझ्या आई साठी.

 

आई ..

माझ्या साठी.

मी ..

माझ्या मुलीसाठी….

 

आणि..

माझी नात जेव्हा

रडते,…मीही

माझ्या मुलीला…

म्हणते…

स्त्रिस्वातंत्र्याच चाटण

दे तिला………….

तू लहान असताना

मीही तुला तेच देत होते…..

आणि माझी नात..

थोड्या वेळापुरते

रडायचं थांबते.

…(चाटणाची अम्मल असेपर्यंत)…

 

स्त्री स्वातंत्र्याचं चाटण म्हणजे, स्री पुरुष समान हक्काची, आणि माणूस म्हणून जगण्याची तिला जाणीव करून देणे..

 

पण ती सुरक्षीतच नसेल, तर आपल्या हक्कासाठी ती कशी लढेल?

 

स्त्रीयांच्या सुरक्षितेचा प्रश्न दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.

आजची महिला, बिनधास्त वावरू शकत नाही..यात छोट्या मुली पासून म्हताऱ्या बाई पर्यंत सगळ्याss आल्या . अगदी शवागारातल्या महिलांचे शव सुद्धा..(ती दुसऱ्यांदा मेली असावी)…

 

म्हणे स्त्रीयांनी स्वतः ची स्वतः सुरक्षा करावी..बिच्चारी ती शाळकरी मुलगी आणि शवागारातले महिलेचे प्रेत..

यांना कुणी देईल का स्व संरक्षणाचे धडे??

 

हक्का पेक्षा आज सुरक्षा महत्वाची ठरतेय. नराधमांची इतकी हिंमत वाढतेच कशी..की महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सुद्धा महिलांची विटंबना होते आहे?

कायदा कमी पडतोय की संवेदना मेल्यात? का संस्कार फक्त मुलींवरच झालेत,मुलांवर नाही?

 

त्यामुळे सख्यांनो आपल्या जिवाची सुरक्षा हाच प्राथमिक मुद्दा आजच्या दिवशी आपण उचलून धरूया… बाकीच्या गोष्टी नंतर बोलूयात .

आणि नंतर देऊयात एकमेकींना “शुभेच्छा महिला दिनाच्या”..

 

शीला टाकळकर, पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा