You are currently viewing आजच्या युगातील दुर्गा

आजच्या युगातील दुर्गा

*लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासिका लेखिका कवयित्री पल्लवी उमरे (शब्दवैभवी) लिखित अप्रतिम लेख*

*आजच्या युगातील दुर्गा*

*सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते*
या देवी सर्वभूतेषु शक्तीरूपेन संस्थिता
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमा:*

महिषासूर नामक राक्षसाच्या जाचाला सर्व देवाधिदेव त्रासलेले होते. यावर तोडगा काढण्यासाठी सगळे देव ब्रम्हा विष्णू महेशला शरण गेले, आणि या जाचातून सोडवण्यासाठी प्रार्थना केली. ब्रम्हा विष्णू महेशानी देवीला पाचारण केले आणि आपली शक्तीशाली आयुधे देऊन देवीला महिषासुराचा वध करण्यास सांगितले.

देव आणि दानव यांच्यामधे नऊ दिवस तुंबळ युद्ध चालले शक्तीस्वरूपा देवीने महिषासुराचा वध केला. तो दिवस अश्विन शुद्ध प्रतिपदेचा होता म्हणून
आश्विन शुद्ध प्रतिपदेला आदिमाया आदिशक्ती, शक्तीस्वरूप जगत्जननी नारायणीचे थाटामाटात नवरात्र पूजन केले जाते. घरोघरी मातीचे घट पूजले जातात. मातीवर जव पेरून अंकुरले जाते. हा अंकुर
म्हणजे सृजन. सृजनाचे घट घरोघरी विस्थापित केले जाऊन, आदिशक्तीची पूजा बांधून तिचे विविध प्रांतात विविध रूपात पूजन केले जाते. नवरात्रोत्सवात देवीच्या नऊ रूपाची पूजा बांधून भक्तीची रोज एक माळ अर्पण केली जाते. शैलपुत्री, ब्रम्हचारीणी, कुष्मांडा कात्यायनी, स्कंदमाता चंद्रघंटा कालरात्री, सिद्धीदात्री महागौरी या आदिमाया महाकाली सरस्वती, लक्ष्मी, वाराही, मधुकैटभनाशीनी अशा विविध रूपांची पूजा बांधली जाते.तुझे आगमन शुभंकर आहे, फलदायी आहे.

असुरी शक्तीचा विनाश करून सत्याचा असत्यावर विजय मिळविणारी जगतजननी आदिमाया महिषासूर मर्दिनीचा जयकार केल्या जातो. धूप दीप पूजा अर्चना रास, गरबा इ. रूपाने प्रत्येक प्रांतानुसार नवरात्र साजरे केले जाते. चैतन्य जाणवणारा नऊ दिवसाचा उत्सव एक सोहळा होऊन जातो. नारी हे सृजनाचे प्रतिक शक्तीचे प्रतिक, खरतर सृजनाचे मूळ ही नारीच,तीच खरी महाशक्ती , म्हणून प्रत्येक रूपात ती पूजनीय. शक्ती आणि भक्तीचा जागर नवरात्रात केला जातो.
भारत हे धर्मनिरपेक्ष राज्य असले तरी हिंदू समाजात प्रामुख्याने पूर्व, पश्चिम, उत्तर दक्षिणेकडे विविध रूपात देवीच्या विविध रूपांची पूजा होते.
हे नारायणी तुझे येणे म्हणजे जगण्याचा उत्सव करणारे, उर्जा देणारे असते,तुझ्या तेजाची किरणे घेऊनच सूर्यदेव पृथ्वीला उजळण्यासाठी अवतरतो ,हवेतल्या मोहक गारव्याची झुळूक तुझ्या येण्याची चाहुल देऊन जाते. वातावरण सुगंधीत होऊन पान कळ्या फुले हवा भारावून गेलेली.. आल्हाददायक वारे, किंचितसा मोहक गारवा… तुझ्या स्वागताला दवबिंदू नी सडासंमार्जन करून प्राजक्ताने धवलकेसरी पायघड्या घातलेल्या,हिरवाईने नटलेले सृष्टी
झेंडू, शेवंती भल्यापहाटे सुगंधीत होऊन फुललेली.. तवचरणी निर्माल्य होण्यास आतूर झालेली, झेंडूच्या माळांनी वेदी सजलेली… धूप दिप अत्तरशिंपणाने घमघमाट नुसता.. हे मयूरवाहिणी, हे वागेश्वरी तुझ्या कुठल्या रूपाची पूजा बांधावी.. प्रत्येक रूप तुझ गोजिरवाणं अन् लोभस,तुझ्या एका कटाक्षाने आकाशगंगा उजळून निघावी …नऊ रसाप्रमाणे नऊ रंगा प्रमाणे चराचरात तुझा वास, अवघे ब्रम्हांड व्यापून उरलेली उमा महेश्वरी, विंध्यवासिनी, हिंगलाज भवानी, रेणुका सर्वत्र तुझाच भास आणि वास… डोंगरदऱ्या नदी प्रपाती वाहणारे खळखळतं चैतन्य तू, कायम सुखाचा धबधबा… कळ्या फुलात पानापानात, सुगंधित होऊन भरून पावलेली सुंदरीबाला तू.. दिव्यांची ज्योती तू, ब्रम्हांडाची व्याप्ती तू दहा दिशांची ख्याती तू… चराचराची व्याप्ती तू.. माझ्या प्रत्येक श्वासागणिक तुझ्या येण्याचे चैतन्य मयी आभास, निरंतर जीवाला तुझाच ध्यास अणूरेणूत भरून राहिलेली चामूंडा, शेरा वाली महाकाली, वैष्णवी तू, …

किती गोडवे गाऊ तुझ्या रूपाचे
आले शरण मी होऊदे सार्थक जगण्याचे*

बालिका रूप तुझे अतिशय लोभसवाणे.
तितकेच ब्रम्हचारीणी रूप सोज्वळ, हाती कमंडलू व श्वेत वस्त्र धारण करून सर्वस्व त्यागून निघालेली तपस्वीनी जणू…
काली दुर्गा रूपात तर तू अतिशय उग्र दिसतेस, हे भयंकर रूप विनाशकारी आहे.
कुष्मांडा रूपाच तेज काय वर्णू… हंस वाहिनी बगुलामाता रूपाचं मांगल्य , दिव्य तेज, तुझ्या दिप्तीने दाही दिशा प्रकाशमान व्हाव्यात अन अंधाऱ्या गुहेतही चिरप्रकाश
उजळावा , हे त्रिपूरसुंदरी, भल्याभल्यांना तुझ्या मोहक रूपाची भूल पडावी, तुझ्या दर्शनाने पापांच क्षालन व्हावे.. गंगा, यमुना गोदावरी सरस्वती कावेरी पंचगंगा, जगतकल्याणासाठी तुझ्या एका कटाक्षाने भूवर अवतराव्यात… हे हिमालयपुत्री त्री शक्तीने परिपूर्ण अशी तू जगदंबा दैत्याच्या विनाशाचे कारण बनली हेच तुझे रूप, हीच तुझी युद्धात पावन झालेली, त्या घनघोर युद्धात तुझे अवशेषांनी बनलेली एक्कावन्न शक्तीपीठे हीच या जगाची उर्जास्रोत आहेत. ब्रम्हा, विष्णू महेश या त्रीशक्तींची आयुधे हाती घेऊन जगाची तारणहार, विश्वरूपा, शक्तीस्वरूपा झाली आहेस आणि हेच सत्य शाश्वत आहे. तुझ्या शिवाय शिवही अपुर्णच.. म्हणूनच तू विश्वकल्याणी ठरलीस … दैत्याचा विनाश करून महिषासुरमर्दिनी बनलीस,हे सिध्दीदात्री मधुकैटभप्रमुदीनी ,अमृतघटाचे कुंभ तुझे ठायी ठायी…प्रत्येक स्री रूपात तूच दिसावी…तुझ्या दिव्य शक्तीचे तेज सर्व स्त्रीयांना बहाल कर,आज खरी गरज आहे या शक्तीची…प्रत्येक स्त्रीला तुझ्यासारखे शक्तीशाली रूप प्रदान कर..असूरी शक्तींचा विनाश करण्याचे बळ दे…तिला परिपूर्ण स्वयंसिद्धा बनव, हेच या नवरात्रोत्सवाच्या पूजेचे फल असेल.

*कोमल है कमजोर नही तू..
*शक्तीका नामही नारी है
*जगको जीवन देणे वाली
*मौत भी तुझसे हारी है*
अवकाशात भरारी तर तिने कधीची घेतलीय
तिच्या स्वप्नांना साकार करण्याचं बळ दे*

पृथ्वीतलावर जोवर मनुष्य प्राणी जिवीत आहेत तोवर तुझी युगेयुगे पूजा होत राहिल.
नारीरूपात स्त्री कायम पूजली जावी.
भूत भविष्य, वर्तमान, चंद्र सूर्य तारे सारे तुझ्या अधिन असेल. कारण जगाच्या विनाशाचे आणि उत्पत्तीचे कारणही तूच आहेस आदिशक्ती ,आणि हेच त्रिकालाबाधित अंतिम सत्य आहे.

शब्दवैभवी पल्लवी उमरे

प्रतिक्रिया व्यक्त करा