*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री नंदिनी चांदवले लिखित अप्रतिम काव्यरचना*
*बिनधास्त*
घरी जाऊन दिवसभर काय काय झाले हे सांगायचे होते आईला …..
लाडक्या बहिणीची चेष्टा करत करायचे होते जेवण….
अशी नेहमीचीच स्वप्न घेऊन ती उभी होती बस स्टँडवर… अचानक काळ पुरुषांने घाला घातला.
होत्याचे नव्हते झाले
अंगाचा थरकाप उडाला
मन विछिन्न झाले… आता कोणत्या तोंडाने घरी जाणार….?
डोळ्याला अश्रूंच्या धारा….. असा कसा आजचा दिवस उगवला ..
काही केल्या तो अक्राळ विक्राळ वासनांध चेहरा डोळ्यापुढून जाईना
सारं आठवलं तरी पोटात भीतीचा गोळा …..
रस्त्यावर साssरे असूनही भकास ….
आपल्याकडेच बोट दाखवून दात काढून सभोवती विचित्र चेहऱ्याची माणसे हसताहेत…
खिन्न , भयभीत मनाने ती घरी आली
मनाचा बांध सुटला….
घरी हलकल्लोळ माजला ! पण थोड्याच वेळात आईने धरलेला हळुवार हात, पाठ थोपटणारा बाबांचा विश्वास आणि पोलीस स्टेशन कडे जाणारी वाट ..,..
आईने समजावले….. फिनिक्स पक्षाची गोष्ट सांगितली
आणि भीतीने थरथरणाऱ्या गर्भगळीत झालेल्या तिने आकाशात पाहिले
फिनिक्स पंख पसरून उडत होता बिनधास्त!
नंदिनी चांदवले
