*मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ कवयित्री अरुणा गर्जे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*निराशेच्या वेलीवर…*
निराशेच्या वेलीवर
कशी फुलावित फुलं
नाही तेज नाही रंग
उगा वाऱ्यासंगे डुलं
निराशाच जिथेतिथे
कशी फुलावी ती बाग
कळी ती हिरमुसली
जेव्हा तिला आली जाग
आले तेव्हा वेलीवर
एक ते फुलपाखरू
हलकेच हसे कळी
आणि गप्पा झाल्या सुरू
झुळूकही ती हवेची
झाली गप्पात सामिल
असे राहून निराश
काय होणार हशील
जादू झाली अशी काही
फुलू लागलीत फुले
वेलीचेही ते नैराश्य
तेव्हा गायब झाले
सुरू झाली सळसळ
मग हिरव्या पानांची
घाई झाली फुलांनाही
वाऱ्यासवे खेळण्याची
असे हवे कुणीतरी
जादूगिरी जाणणारे
निराशेच्या वेलीलाही
हळूवार जपणारे
येती असे आयुष्यात
जादूगार कुणीतरी
फुले फुलतात तेव्हा
निराशेच्या वेलीवरी
@अरुणा गर्जे