*मनस्पर्शी साहित्य परिवार सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा गर्जे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*शब्द भारी अनमोल…*
बोललेले शब्द शब्द
सुटलेला एक बाण
येईनात परतुनी
मना तू रे जरा जाण
दुखावल्या जाई कुणी
आघातच मनावरी
चिरतसे शब्द शब्द
ह्रदयास तो अंतरी
खोल जखम ती उरी
दिसे ना ती कुणा जरी
निघे जेव्हा खपली नि
नवा घाव मनावरी
किती समजावू मना
अरे! विसर शब्दांना
हटवादी तेही किती
कुरवाळी जखमांना
बोलतांना शब्द शब्द
तोलूनच बोलायचा
पुन्हा पुन्हा का रे नवा
शत्रू उभा करायचा
शब्द भारी लवचिक
शब्द भारी अनमोल
वाणीवर द्यावा ताबा
करू नये मातीमोल
असा शब्द एक एक
अमृताने नहालेला
जपलेला जिवापाड
वाढवेल तो जिव्हाळा
@अरुणा गर्जे