शिंपले काढण्यासाठी गलेल्या मच्छिमाराचा तारामुंबरी खाडीपात्रात बुडून मृत्यू
देवगड
तारामुंबरी मुरमणेवाडा येथील संतोष तुकाराम सारंग (४५) या मच्छिमाराचा तारामुंबरी खाडीपात्रात बुडून मृत्यू झाला. त्याचा मृतदेह मिठमुंबरी बागवाडी येथील नस्ताच्या ठिकाणी पाण्यात तरंगताना आढळून आला. ही घटना रविवारी सायंकाळी 5 वा. च्या सुमारास उघडकीस आली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष सारंग हे रविवारी दुपारी २. ३० वा. च्या सुमारास शिंपले (मुळे) काढण्यासाठी तारामुंबरी खाडीपात्राकडे गेले होते. यावेळी तेथे ते बुडाले. त्यांचा मृतदेह सायंकाळी ,५ वा. च्या सुमारास मिठमुंबरी बागवाडी येथील नस्तातील पाण्यात तरंगताना तेथील ग्रामस्थांना निदर्शनास आला. याची माहिती ग्रामस्थांनी देवगड पोलिसांनी दिली. त्यानंतर देवगड पोलीस उपनिरीक्षक महेश देसाई, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजन जाधव, हवालदार गणपती गावडे, पोलीस नाईक स्वप्नील ठोंबरे, संतोष नाटेकर यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण तारी, देविदास परब, धर्मराज जोशी, अमोल जोशी आदी ग्रामस्थ उपस्थित होते. मयत संतोष सारंग याला फिट येण्याचा आजार होता. त्यांच्यावर औषधोपचारही सुरु होते. शवविच्छेदनासाठी मृतदेह देवगड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. हा घटनेची फिर्याद मयत संतोष सारंग याचा भाऊ ज्ञानेश्वर तुकाराम सारंग यांनी देवगड पोलिसांना दिली. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली देवगड पोलीस करत आहेत.
दरम्यान, संतोष सारंग याच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे. मासेमारी व्यवसायावरचं सारंग कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरु होता. घरातील कर्त्या पुरुषाच्या आकस्मिक निधनामुळे सारंग कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.