You are currently viewing गुंतवणूक….

गुंतवणूक….

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*गुंतवणूक ….*

 

अवघ्या १८/१९ साव्या वर्षी लग्न. कुणी सांगितले नाही की विचारले नाही, तुझे लग्न

आहे. पद्धतच नव्हती हो. दोष कुणाचाच नाही.

खरे तर माझे वडील अतिशय पुरोगामी. पूर्वी

घरी जमीनजुमला बघून मुलगी देत असत. माझ्या वडिलांना शिक्षणाचे महत्व कळत होते.

त्यांनी पाहिले, १९६८ साली मुलगा एम एस सी

फिजिक्स आहे.( मी मुलगा पाहिला नव्हता व मला कुणी दाखवलाही नाही). त्या काळी बीए बीकॅाम ह्या पदव्याही फार होत्या.तिथे एम एस सी, तेही फिजिक्स. हे फार होते किंवा ही बुद्धीची फार मोठी गुंतवणूक होती म्हटले तरी चालेल.जमीनजुमला कितीही मोठा राहिला असता तरी आम्ही काही कसायला शेतावर गेलो

नसतो.मुळात शेती हा विषयच इतका किचकट

आहे की मी लहानपणापासून माझ्या वडिलांची

ससेहोलपट पहात वाढत होते. अपार कष्ट करून मोठ्या बॅाल एवढे कांदे पिकवूनही दैवाने नि देवानेही कधी त्यांना हात दिला नाही. तरी बिचारे

आशेवर कांदे लावत राहिले. ती गुंतवणूक पैशांची व कष्टांचीही कधीच फळाला आली नाही. असो….

 

तर, एम एस सी मुलगा जावई म्हणून ठरवणे ही

फार मोठी बौद्धिक गुंतवणूक होती. ती यशस्वी

झाली हे तुम्ही बघताच आहात. मी फक्त एस वाय बीए होते. लहान बाळ होते, नाशिकला आलो तेव्हा. दोन वर्षे थांबले फक्त. बाहेरून बीए चा फॅार्म भरला. दोन वर्ष गॅप होता. कॅान्फिडन्स गायब.

नवऱ्याने स्पेसवरील बर्ट्रांड रसेलच्या पुस्तकाच्या

शॅार्ट नोट् स काढून दिल्या. बाळाची आंघोळ

घातली की( आजच्या सारखे बायकांचे चोचले

व पैसे ही नव्हते) बाळ झोळीत टाकायचे की एका हातात दोरी घेऊन झोळी जवळ अभ्यास

करायचा. (१९९८ साली पण मी नातवासाठी इंग्लंडमध्ये झोळी बांधली होती. त्यांना फार नवल वाटायचे.)असा बाहेरून अभ्यास करून

बीए ची परीक्षा दिली नि नशिब क्लास मिळाला.

ही होती माझी, मला अक्कल नसतांना मी केलेली वेळेची गुंतवणूक! ती जर तेव्हा मी योग्य

वेळी केली नसती तर.. ? नवरा, नणंद, बाळ नि

नो गायडन्स, नो मनी…जिथे तिथे फक्त पाय नि

पायच चालायचे. दळण मी, किराणा मी.. नो कामवाली.. सबकुछ मी…! लेखक, डायरेक्टर, ॲक्टर..! म्हणून इथवर आले ना? नवरा प्रोफेसर

होता, मला झगडण्याची गरज काय होती? कोणती अशी शक्ती होती जी मला सतत पुढे

जा सांगत होती, माहित नाही, माझे तर वयही

फारसे नव्हते.

 

मंडळी, मला एम ए व्हायचे होते पण बाहेरून

शिकल्यामुळे एक वर्ष गॅप हवा होता. मी कसली

स्वस्थ बसते. चला, बी एड करून घेऊ. पैसे? नन्ना होता. ॲडमिशन कशी घ्यायची? वडिलांनी

साहेबांना लग्नानंतर एक अंगठी केली होती. ओळखीच्या दुकानदाराला म्हटले, “अंगठी गहाण

ठेव, मला पैसे दे.” नाही म्हणाला, तशीच सराफ

बाजारात गेले, ११४/- रूपयात अंगठी मोडली.

१००/- रूपये ॲडमिशन घेतली. ( १४ रूपये खिशात). क्लार्क म्हणाला, “मॅडम, डोनेशन?” म्हणाले, “देऊ ना,

जरा थांबा”. मंडळी, आश्चर्य म्हणजे,बीए ला चांगले मार्क्स असल्यामुळे बीएडचे पूर्ण वर्ष मला १९७२/७३ साली महिना रूपये ४०/- असे

स्टायपेंड मिळाले. मी अंगठी मोडून ११४ नव्हे

१००/- ची गुंतवणूक केली नसती तर? माझे

बीएड झाले नसते व पुढे मी ज्युनियर कॅालेजला

क्वॅालिफाय झाले नसते. त्या १००/- रूपयांनी मला पुढे हजारो रूपये दिले, दरमहा तीस वर्षे व

अजून पेन्शन मिळते दरमहा ती वेगळीच!

त्याच नोकरीमुळे दोन्ही मुले हायली क्वॅालिफाईड डॅाक्टर झाले. ती शंभर रूपयांची

गुंतवणूक किती महान होती हो.. ! ती जर त्यावेळी मी केली नसती तर? कल्पनाही करवत

नाही. बीएड झाले व लगेच एम ए पार्ट १ चा फॅार्म भरला. सोबत हायस्कूल मध्ये पार्ट टाईम

नोकरी. तरी क्लास सहित, घरी बसून, पास झाले. सेकंड पार्टला शाळावाले, शिकू नका

म्हणाले. राजिनामा दिला. घरीच अभ्यास, काढ

नोट् स, काढ नोट् स.. अभ्यासाला वेळच मिळाला नाही. नवऱ्याने मराठीच्या दोन पेपर्सच्या (त्यांचा विषय फिजिक्स) नोट् स

काढल्या.खोटेच वाटावे कुणालाही! पण सत्य

आहे.आठव्या महिन्यात परीक्षा देऊन सहा वर्षाच्या मुलाला नाशिकला ठेवून( माझा पाय

निघेना घरातून) धुळ्याला भावाकडे गेले व वीस

दिवसांच्या बाळाला बसने घेऊन परत आले. फार कष्टमय दिवस हो! केवढा संघर्ष! तो केला

नसता तर? ही होती कष्टांची गुंतवणूक.. जी बाजारात मिळत नाही. स्वत:लाच करावी लागते.

मी अगदीच बावळट होते, तरी कसे सुचले इतके? कोणती प्रेरणा होती ती? अहो, सारी कामे पायीच करावी लागत. मुलाला शाळेत सोडा, आणा.. शाळा लांब अंतरावर.. पण लढलो आणि इथपर्यंत आलो.नंतरही संघर्ष सुरूच राहिला. ११ ते साडेपाच कॅालेज, घरी

आल्या आल्या गॅसला भिडायचे. डायनिंग टेबलवर एकिकडे मुलांचा अभ्यास सुरू. सहा

वर्षाच्या माझ्या मुलाचे अठरावेळा रामायण वाचून झाले होते हे कुणाला खरे वाटेल? जो

आता इंग्लंडमध्ये मानसरोग तज्ञ आहे. लहान

रेडिॲालॅाजिस्ट आहे. DNB. भारतातली सगळ्यात कठिण परीक्षा फर्स्ट अटेंम्ट मध्ये पास

होणारा. ४/५ /. टक्के फक्त या परीक्षेचा रिझल्ट

असतो. २००२ मध्ये मी थेट बनारसला परीक्षेसाठी गेले होते, ढीगभर पुस्तके घेऊन, हमालही हरले होते.या कष्टांनी खूपच यश,

भरभराट, मानसन्मानही दिले. मान सतत वर

ठेवली. धाकटाही दोन्ही वर्षे मेडिकलची(बीजे)

गोल्ड मेडॅलिस्ट आहे. नाशिकमध्ये नं १ आहे.( डायग्नोसिस मध्ये हो ) कठीण केसेस शोधून

काढतो.

 

तर मंडळी, फुशारकी साठी नाही हो.. जे जे

घडले ते थोडक्यातच मांडले. संघर्ष बराच मोठा होता. तावूनसुलाखून निघालो. काहीच सोपे नव्हते. तरी छान निभावले. सासरी माहेरी कुठेही हात पसरले नाही. मानाने राहिलो. आजही मान ताठच आहे. कुठेच भ्भिकारपणा केला नाही. नेकी हाच रस्ता होता तो इथपर्यंत घेऊन आला.

 

आता, तुम्ही सारे प्रेम करणारे सोबत आहात. अधिक श्रीमंत झाले आहे मी. लायकी आहे की नाही, माहित नाही, किती डोक्यावर धरता तुम्ही! आणखी

काय लागते हो जगायला? अतृप्तता अशी नाहीच. हं, अधूनमधून जेवणात खडे लागतात,

ते आपले प्रारब्ध समजायचे नि चालू ठेवायचे.

चांगलेच देण्याचा वसा आहे. सारेच निभावतो

आहोत. आता काही इच्छा बाकी नाही. सन्मान,

पुरस्कारांनी घर भरले आहे.एकूण अशी आहे तर

गुंतवणूक.. सारीच आहे…

 

आपलीच,

प्रा. सौ. सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा