You are currently viewing गाबीत समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत विशेष बैठक घेणार

गाबीत समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत विशेष बैठक घेणार

मत्स्य व बंदर विकास मंत्री ना.नितेश राणे यांचे आश्वासन

मुंबई :

राज्यातील गाबीत समाजातील विविध सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी आणि विशेषत: “गाबीत समाज आर्थिक विकास महामंडळ” स्थापन करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडे विशेष बैठक आयोजित करून आवश्यकते निर्णय शासनस्तरावरून घेण्यात येतील असे आश्वासन राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री ना.नितेश राणे यांनी “गाबीत समाज महाराष्ट्र” संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

गाबीत समाज महाराष्ट्र संस्थेचे अध्यक्ष श्री. सुजय धुरत, सरचिटणीस श्री.बाळ मणचेकर, खजिनदार श्री प्रवीण सरवणकर श्री.भाई चिंदरकर, श्री.अजय मणचेकर यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच मत्स्य व बंदर विकास मंत्री मां.नितेश राणे यांची भेट घेऊन गाबीत समाजातील संपूर्ण किनारपट्टीमध्ये राहणाऱ्या मत्स्यव्यवसायिकांचे प्रश्न,आनंदवाडी बंदर विकास प्रकल्प, गाबीत समाजातील जातीच्या दाखल्यांचे प्रश्न,मच्छीमारांच्या घरांच्या जागांचे प्रश्न आणि गाबीत समाजाच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी “गाबीत समाज आर्थिक विकास महामंडळ”स्थापन करण्याविषयी मां.राणे यांचेशी चर्चा केली. त्यावेळी मंत्री महोदयांनी समाजकल्याण विभाग व सामाजिक न्याय मंत्र्यांशी बोलून या संदर्भात लवकरच विशेष बैठक आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

देवगड आनंदवाडी येथील मत्स्य प्रकल्पाचे काम जोमाने व लवकर पूर्ण होण्यासाठी जास्तीचा निधी मिळावा अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यामुळे गाबीत समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा