You are currently viewing मनामनातून..

मनामनातून..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मनामनातून..*

 

मराठी मराठी दुधावर साय

मराठी आमुची आहे खरी माय

करूया जतन हृदयात ठेवू

अटकेपारच झेंडा तिचा नेऊ…

 

नको विस्मृतीत नका हो पराई

जमेल तितके होऊ उतराई

तिलाच भजूया तिलाच पुजूया

सदैव मनात तिला साठवू या…

 

ओठांवर ठेवू नेहमीच तिला

मराठी पुजू आमुच्या पाचविला

खूप खूप वाचू खूप खूप बोलू

“काट्याने लिहिली, तुरुंगात “कोलू”…

 

आपण वाढवू निश्चयाचे बळे

बघा मग कशी धावेल ती,फळे

स्वत:पासून करा सुरूवात

उजळेल तिचा आपोआप पोत…

 

नका सांगू कोणा स्वत:च लढू

माय मराठीचे पांग स्वत: फेडू

ध्वजा ती पताका घेऊ खांद्यावर

मनामनातून करेल ती “घर”….

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा