*पाचवे विश्वस्तरीय वंजारी आँनलाईन साहित्य संमेलनाध्यक्षा डॉ.शैलजा करोडे यांचे अध्यक्षीय मनोगत*
————————————
*दीप उजळू कवितेचा*
आदरणीय स्वागताध्यक्ष , आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक “आ. अशोक गुट्टे सर , आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने , शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू ” असे शब्दप्रभू असलेले आदरणीय अनिल सांगळे सर व त्यांचे सहकारी , अनिल सांगळे सरांनी शब्दांचा , साहित्याचा हा यज्ञ सतत तेवत ठेवलाय , कारण संस्था तर स्थापन होऊन जाते पण त्यात सातत्य ठेवून ही ज्ञानज्योत प्रज्वलित ठेवण्याचे कार्य अनिलजी अगदी तन, मन,धनाने करतात . संमेलनासाठी जमलेले सर्व साहित्यिक , रसिक आणि श्रोत्यांनो सर्वांना माझा सस्नेह नमस्कार .
पांचव्या विश्वस्तरीय वंजारी साहित्य संमेलनाच्या या मंचावरून बोलतांना मला मनस्वी आनंद होतोय.आपणा सर्व सारस्वतांशी संवाद साधतांना , साहित्य सृजनाचा वसा वसतांना , साहित्य शारदेच्या चरणी ही सेवा रुजू करण्याची संधी मला लाभली हे माझे अहोभाग्य .
मनातील उत्कट भावनांचा शब्दरूप आविष्कार म्हणजे कविता .मनाचे हळवेपण , संवेदना , दुःख , आनंद , यांना मूर्तरूप देत कवितेचा जन्म होतो .आपण सारस्वतही काव्यदेवतेची पूजा करणारे , संवेदनशील मन असणारे , म्हणजेच आजचा उत्सव हा संवेदनेने संवेदकांशी संवेदनशीलतेने जोडलेले एक अतूट नाते आहे .जेव्हा हे संवेदनशील अतूट नाते मनाने मनाशी जोडले जाते , एका सूत्रात बांधले जाते तेव्हा ती कविता एक सुंदर कविता तर असतेच असते पण ती एक सुंदर गाणेही होऊन जाते .
शेतीची कामे तशी कष्टाची. येथे सुख-समाधान तसे कमीच. कष्ट मात्र कायमचेच. हे कष्ट करताना मनाला काही करमणूक व्हावी म्हणून स्वतःच एकांतात ही कष्टकरी मंडळी गुणगुणत राहतात. जात्यावरच्या ओव्या, शेतात काम करताना गायलेली भल्लरी. हे सगळं सृजन अतिशय सहज असतं. उदाहरण द्यायचं झालं तर बहिणाबाई चौधरींची कविता अतिशय सहज येते. स्वतःच्या बोलीतले शब्द, अनुभव, जगातील माणसे व त्या अनुभवातून जन्माला आलेले तत्त्वज्ञान; निसर्गाशी एकरूप होत त्यांनी गायले.
“पाहून इथले व्यवहार खोटेनाटे,
बोरी बाबळीच्या अंगाले आले काटे”
आमची खेडी, गावं अशी संस्कृती, परंपरा व सृजनतेनी समृद्ध.
जेथे पहाटच मधूर स्वरातील जिव्हाळा, प्रेम, विश्वास, आत्मीयता, आपूलकी, माया ममत्व, सारख्या अनेकविध भावतरंगांनी भरलेल्या ओव्यांनी होते. देवादिकांचे नामस्मरण जात्यावर दळण दळतांना, कर्म करतांना होते. ती भूमी अलौकिकच. कोंबड्याचे आरवणे, चिमण्यांचा चिवचिवाट, . घराघरातून जात्याच्या सुरात मिसळलेले ओव्यांचे सूर देवालयातून येणारी भूपाळी, आरतीचे मधुर स्वर, टाळ मृदंगाचा टणटणाट झांज-घंट्याचा निनाद, विहिरीवर पाणी शेंदतांना रहाटाचा होणारा करकर आवाज. यामुळे झोपलेल्या गावाला हलकेच जाग येते. सारा आळस , शीण निघून जातो. या सुरांमध्ये आणखी एक कर्ण मधुर सुर मिसळतो वासुदेवाचा. हातातील टाळ पायातील चाळ यांच्या निनादात राम नामाचा गजर करीत त्याचंच नावानं दान मागीत वासुदेव अवतीर्ण होतो.
“वासुदेव आला हो वासुदेव आला दान द्या याला हो दान द्या याला “
रसिक सारस्वतांनो
” हुंकार , मग तो मनाचा , अंतःकरणाचा , ह्रदयाचा , आणि काळजाचाही . हा हुंकार येतो मनोगाभ्यातून ,खोल अंतःकरणातून , ह्रदय कोषातून तर कधी काळीज कुपीतून .कवीची अभिव्यक्ती आणि रसिकांच्या प्रेरणा व आनंद या संयोगातूनच तर जन्म होतो कवितेचा .कवीची ही अभिव्यक्ती खोल मनाच्या अंतःकरणातून शब्दरूप घेते .आपले दुःख , वेदना यांना मूर्तरूप मिळते .या वेदना , दुःखे , काही आनंद लहरी ही कोठून मिळतात कवीला , त्याच्या सभोवतालातूनच .मग या वेदना , कधी आप्तस्वकियांनी दिलेल्या , कधी अति विश्वास ठेवला त्यानेच केलेला घात , कधी आपल्या चांगुलपणाचा घेतला गेलेला गैरफायदा ,जीवन वाटेवरचे खाचखळगे , संकटे , त्यांचा सामना करतांना झालेली दमछाक , जीवनात उठलेली वादळे ,त्या वादळांचा सामना करतांना उडालेली त्रेधा तिरपीट ,सर्वस्व पणाला लागावे असे कसोटीचे प्रसंग , तर कटु घोट पिऊन घेतली गेलेली माघार , जी ह्रदयावर न भरून येणारी देऊन गेलेली जखम , पेटून उठलेलं मन या सगळ्याला शब्दरूप मिळणं , मनातील आवाज कानात पोहोचणं , ओठातून बाहेर पडणं , हा त्या वेदनेला , अभिव्यक्तीला मिळालेला काळजातील हुंकारच म्हणावा लागेल .
आपण जे भोगतो , पाहतो , सहन करतो त्याचे प्रतिबिंब कवितेत येणारच , त्या त्या कोनातून ते साकारणारच , जसे नुकताच पाऊस येवून गेलेला ,व शेतातील सर्व पायवाटा मिटलेल्या , मग आपणच आपली निर्माण केलेली नवीन पायवाट , एक नवा प्रारंभ , एक नवा आशय , अशी फुललेली कविता ही नक्कीच ह्रदयाचा ठाव घेणारी , ह्रदयातून साकारलेली ,मनो गाभार्यातून शब्दरूप घेऊन आलेली असते.
शेती विषयावर लिहायचं म्हटलं तर शेतकर्याचं लवकर उठणं , बैलगाडी जुंपून शेतात जाणं , दुपारी घरधनीणीचं डोईवर भाकरी घेऊन जाणं अशी कल्पना कवी करतात , पण हे एवढं सहज शक्य आहे काय ? मूळात शेती व्यवसायात सुख आणि समाधान फार कमी वेळा मिळतं , कष्ट मात्र कायम ,सतत अवर्षण तर कधी अतिवृष्टी , दुष्काळाचं सावट , सावकारी पाश , कर्जाचे डोंगर , अशा अनेक समस्यांना सामोरं जातांना झालेली दमछाक , यातूनही काही मार्ग गवसला नाहीतर आत्महत्येसारखे घेतले गेलेले अप्रिय निर्णय , कुटुंबाची झालेली वाताहात , असे वाटते या मालिकेला अंतच नाही काय ?
मग याच दुःखाला शब्दरूप देऊन आशेचा किरण दाखवणं , नवनवीन शेतीचे प्रयोग , संशोधनात्मक अवजारांचा वापर , ठिबक सिंचन , अधिक उत्पन्न देणारे बि बियाणांचे नवनवीन वाणांचा वापर , शेतकर्यांना संजीवक ठरू शकतो . दुसर्याचं दुःख स्वतः जाणणं , स्वतः ते क्षण ह्रदयगाभ्यात जगणं आणि त्या जाणिवेला शब्दरूप देऊन साकारणं या दिव्यात तावून सुलाखून निघणं यातूनच जन्मते कविता काळजाच्या कुपीतून .
रोजचे अनुभव , जगातली माणसं ,अनुभवातून आलेलं तत्वज्ञान ,आपल्या बोलीभाषेतील साधे सरळ शब्दही हे या कवितेचे अलंकार ठरतात , अगदी सहज सृजन होते मग कवितेचे.
मित्रांनो, साहित्य समाजमनाचा आरसा असतो म्हणतात. तसेच साहित्य निर्माण करणारा साहित्यिक ही त्याच समाजाचा एक भाग असतो. आपला भोवताल, जे जे आपण पाहतो, साहतो , आपल्या आजूबाजूला जे घडतं तेच आपण लिहित असतो. कल्पनेला वास्तवाची जोड देऊन लिहिलेलं साहित्य मनाचा वेध घेतं. म्हणूनच म्हटलं जातं की कुठल्याही संस्कृतीचं मूल्यमापन करताना त्या त्या वेळेचं साहित्य पाहिले जातं कारण त्या साहित्यात त्या समाजाचं, त्या संस्कृतीचं, प्रतिबिंब असतं. युद्धाच्या काळात वीर रसयुक्त साहित्याची निर्मिती होते. तर आपल्या स्वातंत्र्याच्या काळात गुलामगिरीविरुद्ध देशप्रेमाने ओतप्रोत, जनजागृती निर्माण करणारं साहित्य निर्माण झालं. तर भारत-पाकिस्तान फाळणीतील रक्तरंजित घटनांवर आधारित साहित्य लेखन झालं. फार काय आताच अलीकडच्या काळातील शेतकरी आत्महत्या व स्त्रीभ्रूणहत्या यावर विविध साहित्यनिर्मिती झाली कारण या साहित्यातूनच नव समाज निर्मितीस हातभार लागत असतो.
स्त्रीभ्रूण हत्येविरोधात सर्वांनी आवाज उठविला, कायदे कडक करणात आले. पण आमच्या साहित्यिकांनीही मग ती कथा, कविता, नाटक, पथनाट्य, विविध माध्यमातून समाजमन बदलण्याचा प्रयत्न केला. त्यातून निर्माण होणारे धोके , त्यायोगे समाजातील ढासळणारी नैतिक मूल्ये याविषयी जागृती केली आणि आज त्याचे परिणाम हळूहळू दिसत आहेत. घरात दोघी मुली असल्या तरी पप्पांना चालतं, कुटुंबाला चालतं, मुलगाच हवा हा अट्टाहास मागे पडत चाललाय.
सारस्वतांनो आज माय मराठी अभिजात भाषा झाली आहे . आता ती बहुज्ञात होणे , तिचे संवर्धन होणे खूप गरजेचे . यासाठी आम्हां सगळ्यांनाच प्रयत्न करायचे आहे .काय करता येईल आपणास .
१)मराठी भाषा प्रत्यक्ष व्यवहारात वापरणे,
२)मराठीविषयी सुलभ ज्ञान देणे,
३) मराठी भाषेला वैश्विक स्वरुप देणे.
४)समाजाला तिची उपयोगिता पटवून देणे
५)तसेच विविध मराठी साहित्य प्रकार लोकांपर्यंत पोहोचवणे
अशा अनेक गोष्टींनी भाषा टिकून राहते. इतकेच नही तर तिची प्रगती होते. त्यासाठी आपण मात्र प्रयत्नशील असावे.
मराठी भाषेच्या संवर्धनात वाचन संस्कृतीही टिकून राहिली पाहिजे . आजच्या डिजिटल युगात पुस्तक वाचणे कमी झालेय . या धावपळीच्या युगात वाचनालयात जावून वाचन करणे , ग्रंथालये चालवणे खरंच दुरापास्त झालंय. पण या डिजिटल युगाचा , इलेक्ट्राॅनिक माध्यमांचा बराच फायदाही झालाय ,वाॅटस् अँप , फेसबुक , इंस्टाग्राम , ब्लाॅग लेखनमुळे आपली विचारधारा लेख , कविता , कथा या माध्यमातून व्यक्त करू शकतो व क्षणात ते गाव , जिल्हा , प्रांत , देश एवढेच नव्हेतर संपूर्ण जगाच्या कानाकोपर्यात जाऊन पोहोचते व ती व्यक्ती रसिकांच्या पसंतीस उतरू शकते . ई बुक , ई लायब्ररी , ई शब्दकोष आमची खूप मदत करीत आहेत.
मित्रांनो कवितेची , साहित्याची ताकद अशी अफाट असते . अनिलजी व तुमचे समस्त सहकारी , आपण मला बोलावलंत , अध्यक्षपदाचा मान
दिला व पाचव्या विश्व वंजारी साहित्य संमेलनाचा एक भाग मला होता आलं हे माझं भाग्य. ऋणी आहे मी आपली.
जयहिंद
जय महाराष्ट्र
जय मराठी
———————————————————————^
कवयित्री—शैलजा करोडे
संमेलनाध्यक्षा
पांचवे विश्वस्तरीय साहित्य संमेलन
दि.26 & 27 फेब्रुवारी2025