You are currently viewing वाय फाय बालपण

वाय फाय बालपण

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी लेखक प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी लिखित अप्रतिम लेख*

 

*वाय फाय बालपण* 

 

पाव चीट्टी मिट्टी घोडा पुक डोळा झूल!!

 

एकलम खाजा, डुब्बी राजा तिराण भोजन चार चौकडे पंचलिंग पांडु सायमा गांडू सात कोतडे आष्टीक नल्ली नवी नवं किल्ली दस गुलाबा!!!

 

मंडळी काय आठवतंय का बघा!! नाही आठवत, बरं. अहो हीच तर आमची परिभाषा! हेच आमचे परवलीचे शब्द. होय हे शब्द आता कोणाला माहित पण नसणार. आमच्या बालपणीचा मोबाईल ग्रुप. आम्ही एका ठिकाणी कधीच शांत बसलो नाही. आमचा ग्रुप हा फिरता होता. अगदी पिंपळावरचा मुंजा! आता गल्लीतील खोताच्या कट्ट्यावर असलो तरी, एकदम डोक्यात काय शक्कल येईल, व सगळेच एकदम गप्प होतील सांगता येत नव्हतं.

त्यावेळी मोबाईलचं काय साधा फोन सुद्धा कुठेही नव्हता! फोन फक्त पोस्ट ऑफिस मध्येचं बघायला मिळणार.

आमची चांडाळ चौकडी ह्या गल्लीतून त्यागल्लीत तर कधी चावडीत, तर कधी कुणाच्याही मळ्यात धुडगूस घालणारी.

सुट्टीचे दिवस तर आम्हाला दिवाळी सारखे वाटायचे. शनिवारी दुपारी शाळा सुटली की, गल्लीतील चौकात यायचे, मग चिंन्नी दांडू पाव चीट्टी मिट्टी

— चालू व्हायचे.

ते अगदी घरातील कोणीतरी बोलवे पर्यंत. अरे ये पांड्या

तुला पोटाची काय खबर हाय की नाय असं डबाड्याची काशी वरडत यायची. झाले मग सगळी सावध व्हायची. डबाड्याची काशी म्हणजे, गल्लीतील आग, दिवसा ढवल्या तिच्या समोरून कोण जात नसे. उठ पांड्या तुझं मड मी बसवलं असं आरडत येणारी पांड्या ची आई काशीबाई! आली तुला पटकी आं, असं उद्धार करणारी पांड्याची आईच, भाकर तुकडा गिळ अन म्हसर सोड असं तीन म्हटलं की, सगळेच घरचा रस्ता धरायचे. पण सगळीच जेवण करून प्रत्येक जण आपापल्या घरातील म्हसर सोडून सगळीच जण मोती तळ्या कडे.

गल्लीतून नाही म्हटली तरी पंचवीस जनावर! सगळी जण चावडीला वळसा घालून वेशीत, वेशितून मारुतीच्या देवळा जवळून हम रस्ता. तेथून मिरज रोडवर

तीतून खालच्या अंगाला ओढा पार केलं की मग मोती तळ. मोती तळ तस

गावंधरीत असल्याल. मोती तळ्याच्या आजूबाजूला गायरान जमीन. तिथे सगळी म्हसर गेली की आम्ही परत रिकामेच.

म्हसर एकदा सोडली की झाले. परत आमची टोळ की, चिंचेच्या झाडाखाली हजर.

त्याला झाडाखाली आरामात बसलो की झाले. किरण्या खिश्यात पत्ते घेऊन यायचं. हळूच पत्ते काढले की, पक्क्या डोक्यावरचं खोळ करून आणलेलं पोत झटकून हांतरायचा. खोता चा सागऱ्या, पक्या, हणम्या, किरण्या, राज्या असे सगळेच मिळून पत्ते कुटण्यात गर्क. असा डाव रंगत आला असताना सिद्राम येऊन बोन्म्ब मारायचा.

सुकाळीच्यानों

म्हसर दुसऱ्यांच्या रानात सोडून पत्ते खेळता व्हय असं म्हटला की आम्ही काय ते समजायचो.

नक्कीच जवळच असलेल्या सिद्रामच्या शेतात म्हसर चर्याला गेलेत. म्हटल्यावं सगळी खडकन उभी ते धुमशान सिद्रामच्या मळ्यात दाखल .

बघतोय तर काय सगळ्या म्हशी

गाजरच्या मळ्यात आरामात चरत होत्या. तोपर्यंत सिद्रामची बायको बोंब मारत आलीचं . मड बशीवलं तुमचं, म्हशी आमच्या रानात सोडून, पत्ते कुटत बसता काय?

सरळ गावात जाते अन तुमच्या घरात जाऊन सांगते. असं म्हटल्यावर सगळीच

तिच्या पाया पडू लागली गया वया करू लागली. काकू आमची चूक झाली, परत असं होणारच नाही. त्यावर ती त्रागा करत म्हणे, ह्या पिकाचे नुकसान तुमचा बाप भरून देणार काय ? असं सगळं रंगात येत असताना पक्या पुढ झाला अन गचकन तीच पाय धरु लागला. कारण ती पक्याची चुलत मावशी लागतं होती. मग सगळं वातावरण थंड झाल्यावर, म्हसरांना सरळ मोती तळ्यात सोडल आणि सुटका करून घेतली. आता म्हशी आणि पाणी ह्यांचं जूनं नातं. एकदा का म्हैस पाण्यात गेली की दोन तास गच्चन्ति. बिनघोर होऊन सगळी परत झाडाखाली आले. पत्ते गोळा करून ठेवले.

राज्या हणम्या दोघेही चिंचच्या झाडावर चढली आणि खाली पिकलेल्या चिंचा खाली टाकू लागले

तस आम्ही गोळा करत बसलो. एव्हाना संध्याकाळ झालेली. म्हसरांना पाण्यातून कसबस बाहेर काढून घरी परतत, रविवारी सकाळची खेळण्याची अखणी

पण झालेली.

आणलेल्या चिंचेत मीठ लसूण गूळ घालून त्याला उखळात चेचलं आणि जोंधळ्या च्या धाटवर त्याला बांधून सगळ्यांना वाटलं. तशी सगळी परत संध्याकाळी तोंडात घणं घट धरून लॉलीपॉप सारख चोखु लागली. खोताच्या दगडी कट्ट्यावर गप्पा चालू झाल्या.

परत दबड्याची काशी आली आणि बोंब मारायला सुरवात केली. तस सगळीजण घरात पसार झाली. रविवार सुट्टी सकाळ उठून धपाधुपी खेळायचं ठरले. चेंडू कुणाकडं नव्हताच. मीच शेवटी घरात आलो. घरात केळीच्या पानांचे द्रोण होते, त्यावर केळीच्या पानांचा चेंडू होता तो घेतला. त्यावर कपडाच्या चिंद्या गुंडाळून बॉल तयार केला अन धपाधुपी चालू झाली. बऱ्याच वेळा तो चेंडू गटारीत पण पडला तसाच उचलला. आणि कापडं रंगीत व्हायला लागली. चेंडू किरण्याच्या हातात लागला. त्याने समोर असलेल्या हणम्या वर नेम धरला व मारला. नेमक हन्म्याने वार चुकवला तो खाली बसला अन समोरच्या पडवीत पोथी वाचत बसलेल्या मोरे काकांच्या तोंडाला लागला ते गटारीच्या

शिक्क्या सकट! ते बघून सगळी पोर घरात पसार झाली. तस शिंदडीच्यानों करत मोरे काका काळ तोंड घेऊन बाहेर आले. बघतात तर कोणच नाही. रागात शिव्या देऊन न्हणी घरात तोंड धुवायला गेले.

मुलं पण घरात जाऊन शिळी भाकरी दही चटणी खाऊन परत चावडीत जमा झालेली. चावडीच्या

पटांगणात चिरर घोडा खेळायचं ठरले. त्यात दोन पार्ट्या करायला पाहिजे होत्या. दोन कॅप्टन झाले बाकीचे जरा लांब जाऊन एकमेकांना संगणमत करून कॅप्टन जवळ जोड्यानी जवळ आले. आला आला घोडा काय काय फोडा असा त्यांचा वाय फाय शब्द होता. एक जोडी आली म्हणाली

तुम्हाला राम पाहिजे की कृष्ण, एकानी राम घेतला दुसऱ्या नी कृष्ण अश्या विविध नावानी जोड्यांचे वरगीकरण झाले व ग्रुप तयार झाला. आता दोन्ही कॅप्टननी टॉस करायचा होता. पण पैसे कुणाकडंच नव्हते. मग नेहमी प्रमाणे पातळ दगड घेतला, त्यावर एका बाजूला थुंकी लावली. त्याचाच टॉस तयार केला. पाऊस पाहिजे का उन्ह! पाऊस म्हणजेच थुंकी लावलेलीली बाजू.

त्याच्या विरुद्ध उन्ह

टॉस झाला राज्या वर डाव आला तस त्याच्या टीम मंडळीनी चावडीच्या कट्ट्यावर हात ठेवून वाकली, त्यांचा घोडा झाला. जिंकलेल्या टीम मंडळी ने घोड्यावर जाऊन बसली.

इकडे राजा आणि पक्क्याने डाव सुरु केला. हातात दांडू घेऊन चिंन्नी ठेवली व उंच हवेत उडवत दांडूने जोरात मारली. चिन्नी जोरात हवेतून भिरभिरून उडाली राज्या कॅच घ्यायच्या प्रयत्नात पळत पळत गेला खरा त्याचा लक्ष्य वर हवेत होतं. वर बघत बघत तो पळत होता, नेमक वाटेत शांता पाण्याची घागर घेऊन जात होती. ती आडवी आली अन राज्याची धडक शांतला लागली. शांताची पाण्याची घागर पडली आणि राज्या शांताच्या अंगावर पडला. पारावर बसलेली लोक आली अन राज्याला बडवायला

लागली. तस शांता पण लाजून चूर झालेली तिचा परकर पूर्ण भिजला होता. घोडे आणि घोडेसवार ह्यांना काही कळलंच नाही

काय झाले ते. पक्क्याने तर चावडीच्या मागच्या बोळातून पसार झाला. राज्या बसलेल्या लोकांच्या तावडीत सापडला.

घोडे अन घोडेसवार ह्यांच्या ढुंगणावर काठीने मार बसल्यावर ती उठली आणि मिळलं त्या रस्त्याने पळत सुटली. तेवढ्यात शांताची आई काठी घेऊन आली तस गाव गोळा झाले. सगळ्यांनी सुटका करून घेऊन मारुतीच्या देवळात लपून बसली. राज्या अन पक्क्या पण तिथे आले, काय झाले ते पक्क्याने सांगताच जोर जोरात हसत बसली.

शांता लग्नाला आलेली पोर दिसायला देखणी, सावळा रंग मॅट्रिक पास होऊन घरातील घरकाम करत होती. तिची आई गौरा तणतणत

काठी घेऊन आली.

मेल्यानो तुम्हाला आया बहिणी आहेत की नाहीत. माजलेत नुसते. आता दावतेच माझा हिसका असं म्हणत इकडं तिकडं मुलांना हुडकायला लागली. तेव्हड्यात बायक्का आली म्हणाली. गौरा गावची पोर हैती, लहान हाईत. खेळता खेळता असं व्हतंय. जा गुमान तूझ्या घरला आता.

मी सांगते त्यांना असं म्हटल्यावर गौरा घरी गेली. अन पडदा पडला.

तस सगळी जण मारुतीच्या देवळातन निसटली आणि सरकार वाड्याच्या पटांगणात आली.

ती जागा पूर्ण पटवर्धन सरकाराची पडीक होती. तिथे कोण पण जात नसे.

तिथलाच चिरर घोडा डाव परत चालू झाला. पक्क्याने परत चिन्नी दांडू वर घेतला आणि हवेत उंच उडवत मारला.

मगाचीच घोडी त्यावरचे घोडे स्वार परत बसलेले. असच खेळ खेळता खेळता चिन्नी उंच उडाली आणि रस्त्यावरून जाणाऱ्या एका माणसाच्या डोक्यात पडली. त्याला जोरात लागलं. तस सगळीच मुलानी घर जवळ केलं.

दुपारची जेवण झाली तस परत गल्लीत मुलं जमा झाली. सगळ्यांनी हातात हात घेत चकले. नंन्तर जो शेवट राहिला त्याला घोडा केला. आणि त्याच्यावर पळत येऊन पाठीवर दोन हात ठेवायचे आणि दोन तंगड्या फासून

त्याला ओलांडून जायचे. एकलम खाजा दुब्बी राजा तिराण भोजा चार चौकडी असा खेळ सुरु झाला ओलांडून

असं करता करता एकाला पाठीवरून ओलांडता आले नाही. दोघेही पडली

त्यातला गजाच्या नाकाला मार लागला. नाकातून रक्त येऊ लागले तसा डाव सम्पवण्यात आला.

फाल्गुनी महिना तस उन्ह सुरु झालेलं. शिमग्याचे तसेच वार्षिक परीक्षेचे वेध लागलेले. त्यावेळी शौचालये नव्हती. निसर्ग विधि उघड्यावर ओढ्या काठी किंवा गावंधरीत शेतात होतं असे. आमची सगळीच मुलं वेगवेगळ्या ठिकाणी विधिला जात. कारण कुठे कुठे शेणकुटाचा (गोवऱ्या ) हुडवा रचला आहे. ते पाहून ठेवत. जवळपास कोण आहे,नाही ह्याची पण दखल घेतला. कारण शिमग्याला तो हुडवाचं उचलायचा आमचा प्लॅन असे. प्रत्यके हुडव्यात जवळपास

हजार बाराशे शेणकूट असतात.

एक दोन हुडवा उचलला तरी आमची होळी सात आठ फूट उंच जाणारी होती. झाले

मग हे काम रात्रीच दहा नंन्तर करायच असेलतर घरी कळणार. म्हणून परीक्षा जवळ आली अभ्यासाला आमच्या घरी झोपायला जाणार असं प्रत्येकजण त्यांच्या त्यांच्या घरात सांगे. त्यामुळे कुणालाही संशय येत नसे.

आमचा लांब लचक सोपा होता सहजपने दहा पंधरा मुलं मावत होतीच. एक पान पट्टी ( गुडार – झाडीपट्टी ) हंथरली की सगळेच जण झोपत. फक्त येताना ते त्यांची वाकळ, चादर काहीतरी घेऊन येत असतं. एवढा जामा निमा पुरेसा होता.

घरातले दहा पर्यंत झोपत. आम्ही बाहेरून कडी लावत असू जेणेकरून घरात त्रास नको म्हणून. दोन दिवस अभ्यास झाला. पुढे दहा नंन्तर दोन रिकामी पोती घेउन दोन टीम करून पसार.

वेशीबाहेरची, हाळ विहीर आजूबाजूला एक टीम दुसरी टीम

पांनंदी कडे. त्यावेळी गावात लाईट पण नव्हती. आम्ही अंदाजे जाऊन शेण कूट गोळा करायचे. व कुणालाही संशय नं येता पागेतील जागेत ढीग रचायचा. असं सगळं चालू होतं. एक दिवशी गम्मत झाली. सगळेच जण चिंचोळ्याच्या विहिरी कडे गेलो. तिथे हुडवा होता. तो हुडवा खुरप्यानी फोडला तीन पोती भरली. चौथ्या पोते भरताना सागऱ्याने हात घातला अन काय ते बोंब मारत खाली निजला. काय झाले कळेना.

मग सगळी जण पोती उचलून पागेकडे आले. सागऱ्याला सायकल वरुनं आणला. आणि त्याला कट्ट्यावर बसवले तो तळमळत होता. कळा पार एकाच हाताला खांद्यापर्यंत गेल्या. मग कळले ह्याला हुडव्यात विंचू

चावला होता. घरातून पाणी आणून पाजले. रात्री गावातील डॉक्टरला उठवला आणि इंजेकशन करून आणले. मग शेवटी त्याला आमच्या घरात एक औषध होते. ते चावलेल्या ठिकाणी लावले. मग सगळी झोपली. झोपायला रात्री एक वाजला.

पुढे गावात चर्चा चालू झाली. शेणकूट गायब होतायत. जेवण ते लोक सावध झाले. तोपर्यंत आमचे टार्गेट पूर्ण झाले होते.

शेवटी शिमग्याची पौर्णिमा उजाडली. संध्याकाळी आमची रसद बाहेर काढून गल्लीतील चौकात होळी रचली. ती जवळपास चार फूट रुंद आणि सात फूट उंच होळी रचली गेली. होळी पेटवायला चार मशाली तयार झाल्या. नेहमीप्रमाणे मारुती च्या देवळात नंदादीप वर मशाली पेटवून होळी प्रज्वळीत केली. गल्लीतील सगळ्या घरातील नैवेद्य नारळ त्यात घातले गेले. रात्री धापर्यंत होळी पेटलेली. त्यात कोणी हरभर भाजले कोणी कणसं, भाजून प्रसाद म्हणून वाटू लागले.

दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी केली. काही जणाकडून पैसे पण वसूल केले. व रात्री उठून मदत केली म्हणून डॉक्टरांचे बिल पण देऊन त्याची सांगता केली.

आता मात्र सगळी जण अभ्यास करण्यात गुंतले. परीक्षा जवळ आलेली. रात्री अभ्यास दिवसा शाळा. घरातील पण कोणीच काम पण सांगत नव्हतेच.

परीक्षा चालू झाल्या, सम्पल्या.

तस बारा बैलाचं बळ आला. घरची कामे. शेतातील कामे वेळ मिळाला की पत्ते कुटणे. जर बुधवार मात्र रात्री नऊ वाजता सोपा गच्च भरु लागला. आमीन सायांनी आणि बिनाका गीत मला ऐकण्यासाठी कान आतुर होऊ लागले. त्यावेळी गावात एकमेव HMV चा रेडिओ बाहेर आणून लावत असू. ते गीत ऐकण्यात धन्यता पण होती. परीक्षा झाल्या तरी मुलं मात्र आमच्या सोप्यातच झोपत होती. त्यातला कल्याणी म्हणून एक मित्र होता तो जरा बेरकी होता.

उशिरा येऊन झोपणार आणि लवकर उठून जाणार. तो एका कोपऱ्यात शेवटी झोपत असे. उठून गेला की त्याची चादर व त्याच बेडशीट तसाच टाकून जात असे. हे त्याच बरेच दिवस चालले होतं. एकेदिवशी राजाने मजा करायची ठरवली. सगळीजण

लवकरच झोपेच सोंग घेतलं. ट्यूबलाईट विझवली. दरवाजा नुसतं पुढ केला. कल्याणी लाईट बंद आहे बघून आला. त्याने दरवाज्याला कडी लावलं. खालच्या पायाच्या अंगाने सरकत आला. व जोरात अंग अंथरुणात अंग टाकून दिलं. तसा जोरात किंकाळ्या मारत उठला. तस पक्याच्या पायाजवळ लाईट बटन होते, त्यांनी लाईट लावली. सगळी हसत हसतं उठले. कल्याणीला मात्र अंथरुणात लपवलेले खडे दगड जोरात टोचली होती. नंन्तर पक्क्याने त्याला ताकीद केली, तुझं अंथरून तुझं तू काढणे. चादर घडी घालून ठेवणे.

असेच एक दिवस सगळी रात्री झोपले होते. सागऱ्या रोज सकाळी उठल्यावर म्हैस चारायला मोती तळयावर जात होता. जाता जाता पाण्याचा लोटा घेउन जात असे. एके दिवशी रात्री तो सोप्यात येऊन लवकर झोपला. आम्ही सगळी मजा म्हणून.

चुना पातळ केला, कोळसा पण पाण्यात उगाळून त्याच्या चेहऱ्यावर राक्षसचे चित्र कोरले

त्यावर सोनकांवाने लाल ठिपके पण दिले. झालं हे महाशय उठल्यावर नेहमी प्रमाणे म्हैस सोडली. आणि हातात लोटा. हे ध्यान चावडीवरुनं जाताना सगळेच लोक बघू लागले व फिदी फिदी हसू लागले. असं जवळ पास दोन तास चालले होते. त्यात आमची रात्रीची झोपणारी मुलं होती. मुद्दाम बाहेर काय चाललंय बघण्यासाठी मोती तल्यावर गेले व लांबून नजारा बघत फिदी फिदी हसतं परंतु लागले. झाले परत हे ध्यान घरी आल्यावर त्याचीच आई बघून हसू लागली. गल्लीत पण सगळे हसतं होते. शेवटी नं राहवून त्याने आरसा बघितला. गरम पाण्याने तोंड धुवून घेतले. ते तडक आमच्या घराकडे आला. पण घरात कोणीच दिसलें नाही. आम्ही परस दारी मुद्दाम बसलो. ते ध्यान परत घरी फिरले. मग आम्हाला पण हसू आवरले नाही.

दिवस उन्हाळ्याचे पाण्याचे हालं होतं होते. जो तो उठला की घागरी घेउन पाणी भरण्यासाठी जाऊ लागला. अडाचे खार पाणी खर्चाला. आणि प्यायचे पाणी

दवाखान्याच्या विहिरीचे. हा सरकारी दवाखाना पार गावापासून दीड किलोमीटर लांब. पण नाईलाज होता. गावात चहुंकडे हेच चित्र होते. पाणी भरले की अकरा वाजता न्याहरी. शिळ्या भाकरी दही चटणी काय असेल ते खाऊन, पोहायला विहीरवर. चांगले दोन तीन तास पाण्यात उड्या मारून, तिथे पण शिवाशिवीचा खेळ रंगत असे. गावातील सगळी मुलं विहिरीवर. कोण शिकणारा, कोण शिकवणारा असं चालेल असे. घरात अंघोळ केली की परत दोन बार्डी पाणी वाया जायला नको म्हणून घरात पण काही बोलत नसतं. पोहून आले की जेवण व दुपारी पत्ते कुटणे किंवा चिन्नी दांडू.

उन्ह वाढत चाललेल . उष्मा व घामाच्या धारा, घरातील उन्हाळी कामे चालूच होती.

पाणी भरणे, म्हसर चरयाला सोडणे. येताना शेतातून कडबा वैरण आणणे. दुपारी खेळ. संध्याकाळी फिरायला जाणे. चिकोडी रोडवर एक

स्वामी आलेले. वय झालेलं. अंगाने कृष व सावळे,लहान मूर्ती होती. म्हूणन त्यांना मरी बाबा म्हणत असतं. मरी म्हणजेच कानडीत लहान बाबा. भाविक त्यांना येऊन रोज नमस्कार करीत. आणि आपले गाऱ्हाणं सांगत. त्याप्रमाणे त्यांना उपाय पण स्वामी सांगत असतं. लोक त्यांना मानत असतं.

आम्ही पण रोज संध्याकाळी फिरायला गेलो की नमस्कार करून. त्यांना सगळेच एकच प्रश्न विचारत होतो. बाबा आम्ही परीक्षेत पास होऊ का. त्यावर ते होणारच असं उत्तर देत. संध्याकाळी गार वारा सुटला की, आम्ही तो अंगावर मनसोक्त घेत असू. येताना वरच्या बस स्टॅन्ड जवळ, कोठारी यांची ऑइल मिल.

त्यात सरळ आत घुसून शेंगतेल कस काढल जात असे ते

रोज बघत होतो. शेंगदाणे पण खाऊन, आवर्जून गरम पेंड पण खात होतो. ति खायला गोड आणि तेलकट लागतं होती.

तसेच मिरज रोडला एकमेव स्लॅब असलेली इमारत होती. त्याचा जिना बाहेरून असल्यामुळे, आम्ही त्या टेरेस वर जाऊन

गार वार अंगावर घेत असूत. इमारतीत निलगिरी तेल, कांही औषधी तयार होतं असतं.

घरात आले की मग गाण्याच्या भेंड्या, गावाच्या नावच्या भेंड्या खेळत असू. उन्हाळ्यात रात्री आमच्या अंगणात चांदणी भोजन होतं असे. प्रत्येक जण घरातून ताट वाढून घेउन येत असे. नाही म्हणायला, घरातून आम्ही पाणी, लोणचे चटणी आंबील आणि ताक मधो मध आणून ठेवलेले असणार. ज्यांना जे पाहिजे ते ताटात वाढून घेत असे. अंगत पंगत चांदणी भोजन झाले की, अंगणातच सगळी झोपत होतो. त्यामुळे आम्हाला उन्हाळा जाणवत नसे.

उन्हाळ्यात शेंगाचे बी तयार करण्यासाठी शेंगा फोडायला सगळेच मित्र जमत. सकाळ पासून संध्याकाळी पर्यंत हे काम चार दिवस चालत असे.

मापट्याला पाच पैसे, त्यावेळी मिळत असे. शिवाय दुपारी भडंग आणि चहा सुद्धा. पण कोणीच मित्र मंडळी

कंटाळा करीत नसतं. घरचेच काम काम समजून ते नेटाने पार पडत असे. वर त्यांना पैसे ही मिळत असतं.

घरची शाखारणी करावी लागे. घरे ही कौलरू असल्यामुळे वर्षाला, पावसाळ्या आधीच हे काम होतं असे. बघता बघता रिझल्ट लागे. आणि सगळेच पास होतं असू. वर्षे भरभर निघून गेली. आम्ही सातवी पास झालो. आमच्या वेळी ही बोर्डाची परीक्षा असे, फायनल व्हरनाकुलर म्हणत.

1972 ला आम्ही सहावी पास झालों आणि पाण्याचे दुरभीक्ष. दुष्काळी दिवस चालू झालेले. पाऊस सतत दोन वर्षे पडला नाही. गावात दुष्काळी कामे चालू झालेली.

रोजगारसाठी लोक धडपड करीत रानो माळ भटकंती करत होते. सुखडी वाटली जाऊ लागली. शेति ओस पडलेली. बंडिंगचे काम चालू झाले. विहिरीनी तळ गाठलेला. प्यायला पाणी मिलने अवघड झालेले. पाच किलोमीटर वरुनं प्यायला पाणी आणावे लागे. घरे रिकामी पडू लागली. पीक पाणी नव्हतेच. लोक घरातील धान्य जपून वापरू लागले. दिवस रात्र लोक पाण्यासाठी भटकंती करत होती. काही विहिरीत रात्री दोन वाजता घागर भरत असे. लोक उठून रात्री दोन वाजता पाणी भरत. आमचं टोळक त्यात पुढे असे. रात्री दोन पर्यंत पत्ते कुटायचे. दोन नंन्तर विहिरीवर जाऊन पाणी भरायचे. घरी त्यासाठी सगळ्यांना

मुभा दिली जायची.

कारण परिस्थिती बिकट होती.

 

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

नसलापूर ता रायबाग बेळगांव

कॉपी राईट

प्रतिक्रिया व्यक्त करा