वेळेचं गांभीर्य ओळखून समयसूचकता राखत आम.दीपक केसरकर राहिले मुंबईत…
♦सिंधुदुर्गात कोरोनाचे स्थानिक रुग्ण मिळायला चार महिन्यांचा अवधी लागला. गेले चार महिने मुंबई इतिहास असलेलेच कोरोनाग्रस्त रुग्ण जिल्ह्यात भेटत होते. स्थानिक रुग्ण न भेटल्याने प्रशासनावर तेवढा जास्त बोजा दिसत नव्हता आणि लोकल बाजारपेठ वगैरे मध्ये भीतीचे वातावरण नव्हते, त्यामुळे जिल्ह्यातील नागरिक काहीसे बिनधास्त वावरत होते.
♦गणेशोत्सव जवळ येत असल्याने गणपती सणासाठी जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांच्या नियोजनाची तयारी सुरू असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय लोकांच्या जाहीर कार्यक्रम आणि राजकीय दौऱ्यांचा जास्तच सुकाळ झाला त्याचे परिणाम म्हणजे जिल्ह्यातील दोन दबंग युवानेते लोकप्रतिनिधी हे कोरोना पॉझिटिव्ह झाले. राजकीय नेत्यांच्या वाढदिवस हा सुद्धा एक उत्सव असतो, त्यातून समाजोपयोगी कार्यक्रम राबविले जातात. रक्तदान, गरजुना साहित्य वाटप सारखे समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. परंतु कोरोनाच्या संकटात जिल्ह्यातील नागरिकांना सोशल डिस्टनसिंग, मास्क लावण्यासाठी आणि गर्दी टाळण्यासाठी प्रबोधन करता करता राजकीय नेते मात्र सर्व नियम, कायदे विसरून जातात. त्याचाच परिणाम म्हणून जिल्ह्यातील सक्रिय कोरोनाग्रस्तांची संख्या आटोक्यात येते असे वाटत असतानाच पुन्हा जिल्ह्यावर कोरोनाची गडद छाया पसरली. त्यामुळे विविध दौरे, जाहीर कार्यक्रम करणाऱ्या राजकीय लोकांमुळेच सिंधुदुर्ग जिल्हा पुन्हा अडचणीत आला म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
♦कोरोनाच्या संकटाच्या आधीपासूनच आरोग्याच्या तक्रारींमुळे सावंतवाडीतील आमदार दीपक केसरकर हे मुंबईत आहेत. देशात, जिल्ह्यात कोरोनाचे संकट आले, स्वकीयांनी कोरोनाच्या काळातही राजकारण करून मतदारसंघ काबीज करण्याचा प्रयत्न केला, विरोधकांनी केसरकरांवर टीकेचे मोहोळ उठवले, मतदारांमध्ये केसरकरांविरुद्ध गैरसमज पसरविले, केसरकरकरांनी मतदारांना वाऱ्यावर सोडले अशा अनेक अफवा, तक्रारी केल्या परंतु परिस्थितीचे गांभीर्य, आणि कोरोनाच्या संकटामुळे वेळेचे भान राखत समयसूचकता पाळत दीपक केसरकर मुंबईतच राहिले. तसेच त्यांनी जनतेला उद्देशून घरातच रहा, असे आवाहनही केले होते.
♦आम. दीपक केसरकर हे वेळेचे भान ठेवून निर्णय घेणारे म्हणून सर्वानाच परिचित आहेत. कुठल्याही निर्णयात घाई न करणे ही त्यांची वृत्ती. त्यामुळे जिल्हा प्रशासन उत्तम काम करत असताना स्वतः जिल्ह्यात, मतदारसंघात येऊन जनतेला अडचणीत न आणण्याचे त्यांचे धोरण आज बरोबर असल्याचेच दिसून येत आहे. आम.दीपक केसरकरांचा निर्णय नक्कीच जिल्ह्यातील लोकांना आज पटला असेल, कारण सामाजिक पातळीवर राजकीय लोकांपेक्षा कोरोनाच्या संकटात खरी कसोटी आहे ती जिल्हा प्रशासनाची, पोलीस प्रशासन, आणि आरोग्य विभागाची. जिल्हा प्रशासन आपल्या पातळीवर सतर्क असून जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील परिस्थिती उत्तमरीत्या हाताळत आहे. पोलीस प्रशासनाने गेल्या चार महिन्यात शिस्तीचा अतिशय उत्कृष्ट नमुना सादर केला आहे तर अगदी तुटपुंज्या मशिनरी आणि डॉक्टर सहकाऱ्यांच्या मदतीने आरोग्य विभागाने सुद्धा स्पृहणीय कार्य केले आहे.
♦या सर्व कामात राजकीय लोकांनी मात्र राजकीय महत्वाकांक्षा, भविष्यातील निवडणुका, आणि सवंग लोकप्रियतेसाठी दौरे, कार्यक्रम, मदतकार्य करून देखावे उभे केले आणि जिल्ह्यात वाढत असलेली स्थानिक कोरोनाग्रस्तांची संख्या पाहता जिल्ह्याला अडचणीत आणले म्हणायला वाव आहे. स्थानिक नेते कोरोनाग्रस्त होत असल्याने सर्वसामान्य जनतेने पाळलेले नियम राजकारण्यांनी न पाळल्याने कार्यक्रम, दौऱ्यांमध्ये गर्दीवर आवर न घातल्याने आज जिल्ह्यात वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे.
♦जिल्ह्यातील जनतेसाठी नक्कीच लोकप्रतिनिधी, नेत्यांचे काम चांगलेच असते परंतु रस्त्या रस्त्यावर आ वासून उभे राहिलेल्या संकटात समयसूचकता पाळून योग्य खबरदारी घेतल्यास निश्चितच कोरोनाच्या संकटाचा सामना करता येईल, आणि सिंधुदुर्ग जिल्हा कोरोनामुक्त होईल यात तिळमात्र शंका नाही.