*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*शेताचा बांध…*
शेताचा हा बांध सांगतो सीमा दोन्ही शेतांची
बांधापासून इकडे माझी पलीकडे शेजाऱ्याची
बांधावरूनी वादावादी हाणामारी का होते
सीमारेषा आहे तरी ही विकोपास हो का जाते?
स्वार्थी आहे माणूस मोठा दुसऱ्याचे ते आपले हो
बांध कोरूनी घशात शेती घ्यावयाला टपले हो
रोज कोरती बांध चोरूनी जमीन आपली करती हो
हळू हळू मग शेजाऱ्याची जमीन चोरी होते हो…
बांध म्हणजे सीमारेषा वडिलोपार्जित असतो तो
नीती चालली पहा लयाला शेतकरी चोरी करतो
खून पडती मारामाऱ्या तरी बाज न येतात
परंपरेने हीच दुष्मनी पुढेच जाऊ देतात…
कोर्ट कचेऱ्या हद्दी वरूनी दोन्हीकडे बरबादी येते
कंगालाचे राज्य तरीही तारीख तारीख ती पडते
कुणीच नाही होत शहाणा गहाण शेती ती पडते
बांध कोपरा जमीन सारी मनातून रोजच रडते…
बांध राहतो जागेवरती शेतकरी दोन्ही खपती
तिरडी येते शेतामध्ये लपेटून घेते माती
राख उडूनी गेली तरीही पीळ कधी ना तो जातो
बांधा बांधा वरूनी गाणी माणूस कधीही ना गातो…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)