*आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात एक दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न*
वैभववाडी-
वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात इंटीग्रेटींग रिसर्च अँड इन्नोव्हेशन्स इन लाईफ सायसेंन्स (Integrating Research and Innovations in Life Sciences) या विषयावर वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय राष्ट्रीय परिषद संस्थेचे उपाध्यक्ष श्री विश्वनाथ रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदर राष्ट्रीय परिषद प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (PM USHA) अंतर्गत आयोजित केली होती.
या परिषदेत नामांकित शास्त्रज्ञ आणि संशोधकांनी जीवनशास्त्रातील आधुनिक संशोधन आणि नवसंशोधनाच्या विविध पैलूंवर सखोल चर्चा केली. या परिषदेत शास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि संशोधन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले संशोधन सादर केले. परिषदेमध्ये विविध वैज्ञानिक विषयांवर सखोल चर्चा झाली. या परिषदेत डॉ. बबन इंगोले मुख्य शास्त्रज्ञ (सेवानिवृत्त), सीएसआयआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, गोवा) यांनी “अत्यंत प्रतिकूल वातावरणातील जीवन” या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी सागरी जीवन, विशेषतः खोल समुद्रातील जीवसृष्टी याविषयी सविस्तर माहिती दिली. महासागराच्या ७०% भागात सरासरी ३,००० मीटरपेक्षा अधिक खोली असून, येथे सूर्यप्रकाश पोहोचत नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीत काही जीव अनोख्या शारीरिक जुळवणीमुळे टिकून राहतात. खोल समुद्रातील अद्यापही अनेक रहस्ये अज्ञात असून, भविष्यात संशोधनासाठी ही क्षेत्रे महत्त्वपूर्ण ठरतील, असे त्यांनी सांगितले.
वनस्पतींच्या सूक्ष्म रेणूंचे संपूर्ण विश्लेषण करणारे अत्याधुनिक संशोधन क्षेत्र मेटाबोलोमिक्स हे वनस्पतींच्या औषधी गुणधर्म, चयापचय प्रणाली आणि ताण सहनशक्तीच्या अभ्यासासाठी उपयुक्त ठरत आहे. मात्र, डेटा प्रमाणीकरण, अचूक वर्गीकरण आणि डेटाबेस मर्यादा यांसारखी आव्हाने अद्याप कायम आहेत. भविष्यात संगणकीय तंत्रज्ञानाच्या मदतीने हे संशोधन अधिक प्रभावी होईल, असे मत डॉ.शिंदे यांनी व्यक्त केले.
भारतात रेशीम उद्योग हा कृषीआधारित ग्रामीण व्यवसाय असून, तो जवळपास ७.८५ दशलक्ष लोकांना रोजगार उपलब्ध करून देतो. भारत आणि चीन मिळून जागतिक रेशीम उत्पादनाचा ८५% वाटा उचलतात. मात्र, भारतातील रेशीम उद्योग अद्याप असंघटित स्वरूपाचा असून, ‘उबरायझेशन’ (Uberization) संकल्पनेचा उपयोग करून तो अधिक प्रभावी करता येईल तसेच मल्बेरी (Mulberry) रोपामध्ये GABA आणि 1-DNJ यांसारखे घटक आढळतात, जे मधुमेह नियंत्रण, रक्तदाब संतुलन, कोलेस्टेरॉल कमी करणे आणि अँटी-एजिंग प्रभाव यासाठी उपयुक्त आहेत. रेशीमधून मिळणारा धागा जैवविघटनशील आणि पर्यावरणपूरक असून, त्याचा उपयोग औषधनिर्मिती, सौंदर्यप्रसाधने आणि जैव-चिकित्सेच्या क्षेत्रात वाढत आहे. त्यामुळे भविष्यात रेशीम आणि मल्बेरी संशोधनाच्या नवसंशोधनात मोठ्या संधी आहेत, असे डॉ. जाधव यांनी स्पष्ट केले.
परिषदेच्या अंतिम टप्प्यात प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी आपल्या प्रकल्पांचे सादरीकरण करून नवीन दृष्टिकोन मांडले. यावेळी उपस्थित तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि संशोधन क्षेत्रातील नव्या संधींवर प्रकाश टाकला.
ही राष्ट्रीय परिषद संशोधकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी अत्यंत माहितीपूर्ण ठरली असून, जीवनशास्त्रातील नवसंशोधनाला चालना देण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. व्ही. गवळी व्यक्त केला. यावेळी संस्थेचे खजिनदार अर्जुनराव रावराणे, कार्यालयीन अधीक्षक संजय रावराणे उपस्थित होते.