You are currently viewing फोटो फ्रेम ! कां रडली ?

फोटो फ्रेम ! कां रडली ?

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

*फोटो फ्रेम!कां रडली?*

माझ्या घरच्या शोधतो मी वाटा
उमजत नाही, कळत नाही
विसरलो कसा मी
माझ्याच घरचा पत्ता ..
घर माझं कौलाचं
राहत मौनातच.. निशांत
फिक्या मळभाच्या प्रकाशात
लपलंय नारळाच्या झावळीत ..!

घरासमोर तुळशी वृंदावन
त्यावर दिवा लावते माझी आई
आईला हल्ली नीट दिसत नाही
तिला वाटत अजूनही
सांजवेळी ! येईल तिचं पोर
तिच्या पोराला घरचं आठवत नाही

कसं कुणास ठावूक
आईला कसं सुचतं गाणे
भोळी ती जीव गोंजारून
सारखी अंगाई गाते..!
तिला कळलचं नाही …
पोरगं तिचं मोठं झालं
पण तिच्या पोराला आईच
गाणं ऐकू येत नाही ..!

तुळशीला वंदन करूनी
माघारी फिरते माझी आई
दारासमोरच भिंतीवरच्या फोटोला
पदराने पुसत ती गाते अंगाई
आता मी आईच्या स्पर्शाने जागा झालो आई तर माझ्या पुढ्यातच
उभी होती ………….!!

मग मी माझ्या घरचा
पत्ता कां शोधतोय?
उमजत नाही कळत नाही
कां शोधतो मी माझ्याच घरचा पत्ता?
श्वासाच्या अंतरावर आई उभी
मग ही फोटो फ्रेम का रडली?…!!
आईतर पुढ्यातच उभी…

बाबा ठाकूर

प्रतिक्रिया व्यक्त करा