” वेंगुर्ल्याच्या विकास गंगेतील मैलाचा दगड, अर्थात “माझा वेंगुर्ला”…
… ॲड. नकुल पार्सेकर..
माझा, या दोन अक्षरी शब्दात काय ताकद असते हे माझा वेंगुर्ल्याने गेल्या सहा सात वर्षात दाखवून दिले. अशी एक म्हण आहे, गाव करील तर राव करू शकत नाही. हो हे खरचं आहे.
हा जिल्हा १९९७ सालात पर्यटन जिल्हा जाहीर झाला. गेल्या २७ वर्षांत मालवण येथील तारकर्ली, देवबाग आणि ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला यामुळे बहुतांशी पर्यटक हे याच तालुक्याला प्राधान्य देतात. त्यामुळे इतर सातही तालुक्यात नैसर्गिक उपलब्धता असूनही पर्यटनाच्या दृष्टीने विकसित झाले नाही. मात्र वेंगुर्ल्यातील काही समविचारी लोक एकत्र येऊन पक्षीय पादञाणे बाजूला ठेवून गेली काही वर्षे वेंगुर्ले शहरात विविध सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य, क्रिडा, शैक्षणिक आणि पर्यटन क्षेत्रात रचनात्मक काम करत आहेत ते खरोखरच कौतुकास्पद आहे. नगरपालिकेने कचरा निर्मुलन व विघटन हा लक्षवेधी प्रकल्प राबवून सातत्याने गेली तीन वर्षे राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिके मिळवलीत.. अतिशयोक्ती वाटेल पण देशाच्या इतर राज्यातील नगरपालिका, पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था या प्रकल्पाला भेट देऊन कौतुक करतात.
नाटककार स्व. मधुसूदन कालेलकर यांच्या स्मृतींना कायम स्वरूपी अभिवादन करून वेंगुर्ला नगरपरिषदेने सर्व सोयीनी परिपूर्ण असे नाट्यगृह बांधून जिल्ह्यातील सांस्कृतिक चळवळीत इतिहास घडवला. हे नाट्यगृह एवढे आधुनिक आहे की, दोन वर्षांपूर्वी अभिनेते प्रशांत दामले यांनी हे नाट्यगृह पाहिल्यावर म्हणाले, “इतके सुंदर नाट्यगृह आमच्या पुणे, मुंबईत पण नाही”.
अथांग निळ्या सागराच्या लाटांचा आवाज आणि फेसाळलेल्या सागराच्या कुशीत वसलेले हे शहर आता कात टाकत असून भविष्यात पर्यटनस्थळ म्हणून अधोरेखित होणार यात शंका नाही.
अर्थात याचे श्रेय राजकीय व्यवस्थेला आहेच, आणि कुणी दिले नाही तरी राजकीय मंडळी श्रेय घेण्यासाठी धडपडत असतात. श्रेयवादात नेहमीच अडकलेली असल्यामुळे अनेक प्रकल्पही रखडले. मात्र याला अपवाद ठरले ते वेंगुर्ले शहर आणि याचे खऱ्या अर्थाने श्रेय जाते ते माझा वेंगुर्ला सारख्या संस्थाना.
गेल्या सहा वर्षापासून माझा वेंगुर्ला च्या वतीने एका आगळ्या वेगळ्या पतंग महोत्सवाचे आयोजन केले जाते. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय पतंगबाजी करणाऱ्या पथकाना निमंञित करून वेंगुर्ला येथील श्री क्षेत्र सागरेश्वर बागायत येथे हा पतंग महोत्सव आयोजित केला जातो. सुदैवाने माझा वेंगुर्ला या संस्थेत कार्यरत असणारी अनेक मंडळी ही सुपरिचित असल्याने गेली दोन वर्षे या पतंग महोत्सवाचा आनंद मला
लुटता आला.
यावर्षी हा महोत्सव दिनांक २२ व २३ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेला आहे. हा महोत्सव यशस्वी व्हावा म्हणून माझा वेंगुर्ल्याचे पदाधिकारी श्री जनार्दन शेट्ये, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप,श्री सचिन वालावलकर, श्री मोहन होडावडेकर, कपील पोकळे, अच्युत काणेकर, राजन गावडे, संदीप परब, यासिरशहा मकानदार,संजय पुनाळेकर, खेमराज कुबल, प्रशांत आपटे शशांक मराठे, अमोल खानोलकर, गणेश अंधारी ही सर्व मंडळी झटत आहेत. माझा वेंगुर्ल्याने आपल्या कार्यातून एक वेगळी ओळख निर्माण केलेली असून.. माझ्या वेंगुर्ल्यासाठी निरपेक्ष भावनेने काम करणाऱ्या सर्व शिलेदारांचे अभिनंदन व विशेष कौतुक…
… मिया सुद्धा माझ्या मु़ंबयतल्या मिञांका घेवनं जातलयं…. पतंग उडोकं
तुम्ही पण येवा.. वेंगुर्ला तुमचाच आसा.
..