You are currently viewing नाविन्यपूर्ण उपक्रमांनी आयटीआयमध्ये शिवजन्मोत्सव सजला

नाविन्यपूर्ण उपक्रमांनी आयटीआयमध्ये शिवजन्मोत्सव सजला

*कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून आदर्श जयंतीत्सव विद्यार्थ्यांनी केला साजरा*

मुंबई, दि. २१ :

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती राज्यभरातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थां(आयटीआय)मध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने जिल्हया-जिल्ह्यातील प्रत्येक संस्थेकडून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. या विविधांगी नाविन्यपूर्ण उपक्रमांमधून आपल्या राजाला वंदन करताना विद्यार्थ्यांनी आदर्श शिवजयंतीत्सव साजरा केल्याची माहिती राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. ते मुंबईत बोलत होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेतून भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना एक बलशाली, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवायचा आहे. आपल्या भारताची उद्याची पिढी बलशाली, आत्मनिर्भर, कुशल आणि समृद्ध व्हावी, यात महाराष्ट्र अग्रेसर असावे या दृष्टीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आपल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये आदर्श शिवजयंतीत्सव साजरा करण्याची संकल्पना साकारली असल्याचे मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले. महामानवांच्या आदर्श कार्यकुशलतेची आणि त्यांच्यातील प्रतिभेची जाणीव व जागृती विद्यार्थ्यांना व्हावी आणि यातून आदर्श विद्यार्थी आणि आदर्श समाजाची निर्मिती व्हावी, हाच प्रामाणिक एकमेव उद्देश या मागे असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

१९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या निमित्ताने राज्यभरातील आयटीआयमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक आयटीआयमध्ये महाराजांच्या प्रतिमेस, तसेच संस्थेच्या प्रांगणातील स्मारकास पुष्पहार अर्पण करून या आदर्श जयंतीत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याबद्दल मान्यवरांकडून उपस्थितांना मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची वकृत्व स्पर्धा, स्वच्छता मोहीम, शिवकालीन नाट्य आणि कलांचा आविष्कार असलेले सांस्कृतिक कार्यक्रम, वृक्ष भेट अशा विविधांगी नाविन्यपूर्ण उपक्रमांचा समावेश यात करण्यात आला होता. यावेळी आयटीआयमधील विद्यार्थ्यांसह प्राचार्य आणि शिक्षक या सोहळ्यात सहभागी झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा