*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*
*गुलाबी थंडी*
माझा सर्वात आवडता ऋतू म्हणजे हिवाळा…! मी हिवाळ्याची आतुरतेने वाट पाहत असते…!
हिवाळा म्हणजे
गवताच्या पातीवरील दवं,
सोनेरी किरणांनी नटलेली सकाळ, पहाटेचे धुके
गरमागरम चहा नी
अंगणात खेळणारी थंडी
माझी लाडकी थंडी मस्तच.. मग ती बोचरी थंडी असो की सौम्य थंडी असो…!
“थंडी पडली गोड गुलाबी” अशी ही माझ्या आयुष्यात गोड गुलाबी थंडी बिलगून येते आणि मग या थंडीची स्वारी हवीहवीशी वाटू लागते
झोंबणाऱ्या वाऱ्यासह लाडिक चाळे करत मला मिठीत घेत म्हणते तुझी लाडकी गुलाबी थंडी..
तिच्या स्पर्शाने माझं सार अंग रोमांचित झालं अन् काया शहारली..! अक्षरश:
तिनं हुडहुडी भरवून मला गपगार केले..!
पहाटेच्या वेळी या थंडाईचा अनुभव घेणं एकदम मस्त
रिफ्रेशिंग असतं..!
गुलाबी थंडी
आल्हाद गारवा
घेडीते मज
धुंद गार हवा
बोचरी, गुलाबी थंडी अनुभवायची असेल तर मात्र त्यासाठी वीकेण्डला एखादा भटकंतीचा स्पॉट निवडायचा नी निघायचं…अंगावर शाल, स्वेटर व कानटोपी असा पेहराव करत धुक्याची दुलई “थंडी हवाँये लहराके आये”..’ असे म्हणत.. !
गुलाबी थंडी आणि मनसोक्त भटकंती…!
भल्या पहाटेची थंडी अनुभवण्याची मजा काही औरच असते..!
पहाटेच्या धुक्यात उतरलेली पहाट अनुभवणं हा अनुभव फार न्याराच असतो… तो एकदा तरी अनुभवावाच..!
पहाटेच चक्कर टाकणं सुखावणारं असतं…येणारी थंड हवेची झुळूक वेगळंच काहीतरी सांगून जाते..! त्याच वेळी पक्ष्यांचा किलबिलाट, धुक्याची दुलई असं सारं सारं अनुभवायचं असतं… संपूर्ण तनमन हरपून टाकणारा हा अनुभव खूपच हरखून टाकणारा असतो…
मस्त थंडीत भटकंती करताना धुक्याने आच्छादलेले रस्ते, दुतर्फा हिरवी दाट झाडी तिथून दूरपर्यंत जाणारी वाट आणि सोबतीला पक्ष्यांचा किलबिलाट तसच जमलेले पक्ष्यांचे थवे असं सगळं वातावरणच रमणीय.. अशा रमणीय वातावरणात अशा वेळी पाय नेतील तिथे मस्त भटकायचं आणि विविध रंगीबेरंगी पक्ष्यांचे फोटो
गवताच्या पात्यांवर आणि वेली फुलांवर बागडणारी विविधरंगी फुलपाखरं, निसर्गसौंदर्य कॅमेऱ्यात बंदिस्त करत…! अंगाला झोंबणाऱ्या गारव्याची मजाच काही औरच असते…
अशा शांत आणि फ्रेश वातावरणात फिरायला खूप मजा येते… या गारव्यातली सुहानी सफर अक्षरश: वेड लावणारी…थंडी असली तरी कोवळ्या स्वच्छ हसर्या उन्हात सोनसळलेली ती सृष्टी बघायची मौज असते
निसर्गाची ही किमया अनुभवत, पक्षांचे सुमधूर आवाज ऐकत शरीरातली सारी मरगळ झटकून टाकणारी.. अश्या धुंद वातावरणात मोकळ्या आकाशाखाली विखुरलेल्या त्या निसर्गाच्या सहवासात मनसोक्त रमावे… भटकावे…
गुलाबी थंडीत धुक्याचे गतीने वर येणारे पुंजके याशिवाय इथल्या मातीवर, झाडांच्या पानांवर पडलेलं दव.. पहाटेच्या कडाक्याच्या थंडीतून डोकं वर काढणारा सूर्यनारायण.. त्या सकाळच्या आल्हाददायी वातावरणात मस्त गरमागरम चहाचा आस्वाद अहाहा…
अहाहा..! स्वर्गीय सुखच…!
गुलाबी थंडीमध्ये विविध ठिकाणी भटकंती करण्याची मजा काही औरच असते…!
हेमंत ऋतूची थंडी गुलाबी..!
लेखिका/ कवयित्री
संगीता कुलकर्णी— ठाणे@
9870451020