You are currently viewing सकल मराठा समाजाच्या वतीने केलेला माझा सत्कार हृदयस्पर्शी – मंत्री नितेश राणे

सकल मराठा समाजाच्या वतीने केलेला माझा सत्कार हृदयस्पर्शी – मंत्री नितेश राणे

सकल मराठा समाजाच्या वतीने केलेला माझा सत्कार हृदयस्पर्शी – मंत्री नितेश राणे

कणकवली :

राज्यात महायुतीचे सरकार आले , त्यानंतर मी मंत्री झालो. मंत्री झाल्यानंतर राज्यभरात माझे अनेक सत्कार झाले. त्या सत्कारांमध्ये सकल मराठा समाजाने केलेला सत्कार माझ्यासाठी फार महत्त्वाचा आणि हृदयस्पर्शी आहे. खूप काम करायचे आहे. समाजाच्या अपेक्षा आहेत, ते पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे, असा शब्द मी देतो. माझ्या राजकीय प्रवासात समाजातील ज्येष्ठ मंडळीचा आशीर्वाद मिळाला व माझ्या बांधवांनी सहकार्य केले , त्यांचे ऋण मी कदापी विसरणार नाही.असे प्रतिपादन मत्स्य विकास व बंदरे विकास मंत्री सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.

कणकवली येथे शिवजयंतीनिमित्त सकल मराठा समाजाच्यावतीने पालकमंत्री नितेश राणे यांचा शिवमूर्ती , शाल , श्रीफळ , पुष्पगुच्छ देवून प्रा.जी.ए.सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच मराठा समाजासाठी काम केलेल्या डॉ. चंद्रकांत राणे , प्रा. जी. ए. सावंत , एस.टी. सावंत , लवू वारंग यांचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सन्मानपत्र, शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर भाई परब ,सुशील सावंत , बॅंक संचालक समीर सावंत, सोनू सावंत , एस.एल.सकपाळ , बच्चू प्रभुगांवकर , महेश सावंत ,महेंद्र सांब्रेकर, बबलू सावंत, डॉ. मिलींद कुलकर्णी , डॉ. विद्याधर तायशेटे , पत्रकार भगवान लोके , संतोष राऊळ , दिलीप तळेकर , मनोज रावराणे , बंड्या मांजरेकर, बंडू हर्णे, अमित सावंत , सादीक कुडाळकर ,आदींसह मराठा समाजातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

मंत्री नितेश राणे म्हणाले ,माझे मंत्रीपद असेपर्यंत असंख्य लोकांच्या आयुष्यात परिवर्तन करण्याचा माझा मानस असून तेव्हा मी पदाला न्याय दिल्याचे मला समाधान असेल. मंत्री होऊन मला दोन महिने झाले आहेत. तर पालकमंत्री होवून 1 महिना झाला आहे. मला आता पूर्वीसारखा आपल्या सर्वांना वेळ देवू शकत नाही , याची मला खंत आहे. पहिले कार्यकर्ते हक्काने बोलायचे, फोन करायचे, कार्यक्रमाला जायचो, पण आता तेवढे शक्य होणार नाही. त्यामुळे मला थोडा वेळ द्या, माझ्याकडे असलेल्या खात्यांची माहिती घेतो, खात्यांमधील सिस्टीम समजून घेतो, त्यानंतर मी तुम्हाला आमदार म्हणून जशा भेटायचो, तसा भेटेन, असा विश्वास त्यांनी दिला.

सकल मराठा समाजाने आम्हा ज्येष्ठांचा केलेला सत्कार सन्मारुपी आहे . समाजाने अशाच पध्दतीने एकत्र येवून काम केल्यास पुढच्या पिढीला चांगली दिशा मिळेल. आपल्यासोबत मंत्री नितेश राणे आहेत , त्यांचे पाठबळ समाजाला आहे , त्यामुळे मराठा मंडळाचे पालकत्व आता नितेश राणे यांनी आता आपल्या हाती घ्यावे . रखडलेली कामे पूर्णत्वास नेवून समाजाला सहकार्य करावे , असे आवाहन प्रा. जी.ए.सावंत यांनी केले.

बॉक्स –

ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनामुळे मंत्री पदापर्यंत पोहोचलो –

 

मराठा समाज म्हणून आपण एकत्र आलात, माझा सत्कार करण्याचे ठरवले, हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. हा मोठेपणा मी माझ्या आयुष्यात विसरणार नाही. यापुढे असंख्य अपेक्षा माझ्याकडून आहेत , याची जाणीव मला आहे. त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन, आज या व्यासपीठावर माझा आणि समाजासाठी आयुष्य वेचणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याबद्दल मी सकल मराठा समाजाचे आभार मानतो. समाजासाठी आयुष्य वेचणाऱ्यांनासोबत माझा सत्कार झाला. मात्र, मी या सत्कारासाठी खरोखरच पात्र आहे का ? याचा विचार करून पात्र ठरण्याचा प्रयत्न करेन.समाजातील ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनामुळे माझ्या राजकीय प्रवासात आमदार व मंत्रीपदापर्यंत पोहचू शकलो , अशी भावनिक कबूली मंत्री नितेश राणे यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा