*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य लेखक आबासाहेब घावटे लिखित अप्रतिम कथा*
*भुताची भेट*
तळ्याच्या काठाला हनुमानवाडी नावाचं गाव होतं .पाच-पन्नास घरांची वस्ती .पण अगदी टूमबाज घर. प्रत्येकान आपल्या घरासमोर लावलेली सुंदर सुंदर झाड. सिमेंट काँक्रिटचे रस्ते .गावाच्या बाजूने डोलणारी हिरवीगार शेतं. गावातूनच दिसणार तळ्याच निळं निळं पाणी. त्यामुळं गावाला फार शोभा आली होती.
गावाच्या प्रवेशद्वाराजवळच हनुमानाचे छोटस मंदिर होतं. गावातले लोक हनुमानाचे भक्त होते. त्यामुळे त्यांना तालमीचा फार नाद होता. मंदिराच्या समोरच तालीम होती. गावातली दहावीस पोरं सकाळ संध्याकाळ इथं व्यायामाला असायचची. पोरं चांगली मेहनत करायची. कुस्त्यांचा फड असला की हनुमानवाडीची दहा पाच पोर हजरच.
गावाला जवळच तळ असल्यामुळे पाणी भरपूर होतं. वर्षभर गुरांना हिरवा चारा मिळायचा. त्यामुळ लोकांनी गाई म्हशी पाळल्या होत्या. गावात दुध दुभत भरपूर होतं. शेतीला जोडधंदा म्हणून हा दुधाचा व्यवसाय लोकं करायची.ती चार पैसे पाळून होती. त्यामुळे आपली पोरं चांगली पैलवान व्हावीत यावर त्यांचा भर होता .जूने चार दोन वस्ताद होते. त्यांनी पोरांना चांगला छंद लावला होता.
त्या गावात दामू नावाचा एक गाजलेला पैलवान होता .सकाळ संध्याकाळ लिटर लिटर दूध हाणायचा. बचकन खारीक खोबर खायचा. चार-पाच भाकरीचा मुडदा पाडून ताटावरून उठायचा. व्यायामही तसाच करायचा. आजवर त्याने बरेच फड मारले होते. चांगल्या चांगल्या पैलवानाची जिरवली होती .त्याला मोठी बक्षिसही मिळाली होती. त्यामुळे अवतीभवतीच्या दहा पाच खेड्यात त्याचं नाव होतं.
दामूला त्याच्या ताकतीचा फार गर्व होता. त्याच्या इतकं ताकदवान दुसरं कुणी नाही असं त्याला वाटायचं.तो ज्वारीची तुरीची भरलेली पोती सहजच बगलेत मारून उचलायचा. गप्पा मारण्यात तो मोठा पटाईत होता. चारचौघात बसून बढाया मारायची त्याला फार सवय. घरची दहा पाच एकर जमीन होती .शिवाय दूध दुभत्यासाठी पाच सहा म्हशी पाळलेल्या. शेतात उद्योग नसला की तो म्हशी राखायला माळावर जायचा. म्हशी चरायला सोडून गुराख्यासोबत खुशाल गप्पा मारत बसायचा.
एके दिवशी गप्पा मारता मारता भुताचा विषय निघाला.दामूनं सांगायला सुरुवात केली.माझी आणि भुताची फार वेळा भेट झाली. मला बघितलं की ती थरथर कापतात .गेल्या अमुशाला एका रानग्याला लोळवलय . हाडळ तर मला बघितलं की नुसतीच चिरीचिरी आरडत पळती…. कसलं बी भूत असू द्या .आपल्या वाट्याला जात नाही.
ऐकणाऱ्या पोरांना आणि माणसांना दामूच नवल वाटलं.. प्रत्येक जण म्हणू लागला.
“ वा! माणूस असावा तर दामुसारखा “
गावातही तो लोकांना या भुताच्या गोष्टी सांगायचा .सारे त्याचे कौतुक करायचे. त्याची छाती गर्वाने फुलून यायची. हळूहळू दामूच्या पराक्रमाच्या बातम्या गावभर पसरल्या . सगळ्या गावकऱ्यांना त्याचं कौतुक वाटायला लागलं. प्रत्येक जण त्याला कुतूहलाने विचारायचा. त्यांन मोठ्या ऐटीत भुताची भेट कशी झाली ते सांगायचा . ते कसं दिसतं? .कसं बोलत?. इथपासून ते आपण कशी कुस्ती खेळून त्याला हरवलं .इथपर्यंतचा सारा इतिहास तो लोकांना खूप रंगवून सांगायचा . लोकांना नवल वाटायचं . त्यामुळं गावात त्याचा मान वाढला.
लोक त्याचा शब्द प्रमाण मानू लागले. गावात कुठलाही कार्यक्रम असो पहिला मान दामुचा . गावची जत्रा असो वा निवडणूक असो. सगळं दामूच्या मार्गदर्शनाखालीच. बघता बघता दामू गावचा कारभारी झाला.
गावची जत्रा जवळ आली होती .त्याच्यासाठी समिती नेमण्यात आली होती. त्याचा प्रमुख दामू होता. गावात काय काय कार्यक्रम घ्यायचे याचे नियोजन ठरलं .गावात नाटक आणायचं ठरलं. नाटक कंपनीने दामूला संध्याकाळी भेटायला बोलावलं. आपली मोटार सायकल घेतली व तो निघाला .गावातली एक दोघं सोबत निघाली .पण दामूनं त्यांना नकार दिला. मी भुताला भेटलेला माणूस आहे. चोराचा तर बुकनाच करीन .मला कशाला सोबत लागते असं म्हणून तो एकटाच निघाला.
संध्याकाळचे सात वाजले होते. सगळीकडे अंधार पडला होता .गाव मागं पडलं .तो गावच्या माळावर आला. रस्ता रिकामाच होता. तो पुढे बघून गाडी चालवत होता. तेवढ्यात कोणाचा तरी आवाज आला….. त्यानं कान टवकारले…. मोठमोठ्याने रडण्याचा आवाज आला…. तो घाबरला.त्याचे हात पाय लटपटू लागले . तेवढ्यात.. अंधारातून कुणीतरी येताना त्याला दिसले … मग तर तो फारच घाबरला… त्याच्याकडे बघता बघता त्याची गाडी दणकन खड्ड्यात जाऊन आदळली….आई ग …असं तो मोठ्यानं ओरडला …तेवढ्यात हा ..हा ..हा …असा हसण्याचा आवाज आला …दामू आणखीनच घाबरला .भू..भू ..भूत ..असं तो ओरडू लागला .. त्याच डोकं फुटलं .. हाताला पायाला लागलं .. तो ओरडत ओरडत कसातरी बाजूला सरकला…. तेवढ्यात ते तिथं हजर…
अंधार असल्यान त्याला काही दिसत नव्हतं. दामूला पाहून ते आणखीन मोठ्यान हसलं….. तो घाबरून पटकन उठला.गाडीच्या नटात अडकलेली विजार टराटरा फाटली ….. तो तसाच गावाच्या दिशेने भूत …भूत .. म्हणत पळत सुटला…… पळता पळता …. दगडाला ठेचकाळून तो धपकन पडला…तसंच उठून त्यानं माग बघितल ..ते मागच येत होतं .आल रय…आल रय … म्हणून तोंडाने ओरडत तो पळत होता.. गाव येईपर्यंत त्यान मगसुद्धा बघितल नाही. धापा टाकीत ..धापा टाकीत तो कसाबसा गावात गेला .
हनुमानाच्या देवळापुढ दहा पाच पोरं गप्पा मारत बसली होती . भूत …भूत …म्हणत पळत पळत येऊन तो पोराजवळ थांबला.. डोकं फुटलेलं.. हाताला पायाला लागलेलं….तो रक्तबंबाळ झालेला . त्याला पाहताच पोरं माणसं धावत आली.. तो नुसता भूत… भूत… म्हणून ओरडत होता. लोकांनी त्याला पाणी प्यायला दिलं. त्याला जरा शांत केलं… मग त्याला काय झालं ते विचारलं.तेंव्हा घाबरत घाबरत त्यानं माळावरच्या भुताची कहाणी सांगितली….तो घामाघूम झालं होता .. त्याला खूप वेदना होत होत्या . तो विवळत होता .
तेवढ्यात एकजण म्हणाला” तू तर भुतांना भेटत होता की …त्यांच्यासोबत कुस्तीही खेळत होता ना ?.. मग एवढ का भितोस?.. असं का पळून आलास? …”
“ अरे बाबा ते माझ्या ओळखीच नाही…. नवच हाय… “
त्याचं बोलणं एकूण सगळे खदा खदा हसू लागले… सगळं गावं जमलं होतं . तरुणांची चर्चा सुरु झाली . एकजण म्हणाला “चला आताच्या आता आपण जाऊ. त्या भुताचा बंदोबस्त करू नाहीतर ते गावात येऊन सगळ्या गावाला बेजार करील “
दुसरा म्हणाला ,”बरोबर हाय बब्याच..चला बघू काय करतय ते”
“चल तू बी .. “रामा
“आर नका बाबानू त्याच्या नादाला लागू .आज अमुशा हाय .माळावर त्यांची आज पालखी निघती म्हण. पाच पन्नास जन जमत्यात तिथं …”
“असल्या थोतांड गप्पा मारू नका ..चला आमच्या सोबत बघू काय ते ?” गणू
हातात काठ्या कुर्हाडी घेऊन पोरं माणसं निघाली.साऱ्या रानात बॅटऱ्या चमकू लागल्या.सगळे सोबत होते त्यामुळे दामू तसाच लंगडत लंगडत चालत होता.. बघता-बघता माळ आला … तरणी पोरं आरडत ओरडत होती . गाडी पडली होती तिथं ती सगळी आली.. तेवढ्यात मोठ्याने हसण्याचा आवाज आला….हा ..हा ..हा …
दामू म्हणाला” ते बघा कसं हसतं तेच आहे”
पोरं सावधपणे पुढे सरकली. काट्या कुराडी सरसावल्या. पुन्हा रडण्याचा आवाज आला…….
दामू म्हणाला “ बघा एवढ्या माणसाला तरी ते भेतय का ?किती धटिंगण हाय “
पोरही तालमीत खेळलेली .चांगली रगेल होती .तीही पुढे सरकली. दामू मात्र लटलट कापत होता. जिथून आवाज येत होता तिथ एकानं बॅटरी लावली. जवळ जाऊन पाहतात तो फाटकी कपडे घातलेल एक येड रस्त्यावर येऊन बसलेलं होतं…… आणि नुसत हसत होतं ….. पोरांना पाहताच ते आणखी हसू लागलं ….
त्याला पाहून पोरही पोट धरू धरू हसू लागली ……..सगळ्या माळावर जोरजोरात हशा पिकला …. तेवढ्यात एकजण म्हणाला” पैलवान येड्याला भिऊन पळून आला…अन गावाला मोठ्या गप्पा कशाला हाणतोस रं …. खोटं बोलून साऱ्या गावाला येड्यात काढलं तू “
दामूला काय बोलावं ते कळेना… तो खाली मान घालून उभा राहिला . साऱ्या लोकांसमोर दामूची फजिती झाली .. म्हणून खोटं बोलून लोकांना कधी फसवू नये .नसत्या बढाया मारू नये. नाहीतर त्या अंगलट आल्याशिवाय राहात नाहीत….आपल्याच हाताने आपली फजिती होते ..म्हणून खरं बोलावं…चांगल वागावं….
आबासाहेब घावटे ८४९/२ उपळाई रोड ,पवार प्लॉट बार्शी मो .नं .९८९०८२९७७५
