कणकवली :
गोपुरी आश्रमात मुंबई येथील ‘दिव्यांग जीवन दीप प्रतिष्ठान’ या संस्थेच्या दिव्यांग अंध बांधवांसमवेत छ. शिवाजी महाराजांची ३९५ वी जयंती साजरी झाली. प्रथम दिव्यांग जीवन दीप प्रतिष्ठानचे अध्यक्ष जीवन मराठे यांनी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर छ. शिवाजी महाराजांची आरती घेण्यात आली. जयंती कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष जीवन मराठे व सचिव गिरीश पटेल यांनी मनोगत व्यक्त केले. उपस्थित दिव्यांग अंध बांधवांनी गोपुरी आश्रमामातील या उपक्रमाने आम्हाला आनंद झाला आणि प्रेरणाही मिळाली अशी भावना व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी कणकवलीतील ‘एकता दिव्यांग संस्थेचे’ अध्यक्ष सुनील सावंत, सचिन सादये, श्री कारेकर व त्यांचे सहकारी सुद्धा आवर्जून उपस्थित होते.
आज दिव्यांग जीवन दीप प्रतिष्ठानचा सातवा वर्धापन दिन होता. या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आम्हाला गोपुरी आश्रम सारख्या सेवाभावी संस्थेत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करता आली हे आमचे भाग्य समजतो अशाही भावना व्यक्त केल्या. या जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी शिवाजी महाराजांच्या विषयी उपस्थिताना माहिती सांगितली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिव विनायक उर्फ बाळू मेस्त्री, व्यवस्थापक सदाशिव राणे,सदस्य विनायक सापळे, संदीप सावंत यांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी संचालिका अर्पिता मुंबरकर उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार सचिव विनायक मेस्त्री यांनी मानले.