*’छ.शिवाजी महाराजांचे विचार व कार्य जोपासण्याची गरज”- सज्जनकाका रावराणे*
वैभववाडी
महाराष्ट्राचे दैवत आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि कार्य जोपासण्याची गरज असून ते आजच्या पिढीचे आद्य कर्तव्य आहे असे विचार कार्यक्रमाचे अध्यक्ष व स्थानिक समितीचे अध्यक्ष श्री. सज्जनकाका रावराणे यांनी व्यक्त केले.
वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग, इतिहास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग आणि ग्रंथालय विभागाच्यावतीने
छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती कार्यक्रम श्री.सज्जनकाका रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दि.१९ फेब्रुवारी रोजी संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे विश्वस्त श्री. शरदचंद्र रावराणे, प्रभारी प्राचार्य डॉ.एन. व्ही. गवळी, उपप्राचार्य डॉ. एम.आय.कुंभार, कार्यालयीन अधीक्षक श्री.संजय रावराणे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डी.एस.बेटकर, इतिहास विभाग प्रमुख प्रा.एस.एन. पाटील व मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ.आर.एम.गुलदे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी कु.अपर्णा कोलते व कु.प्रणिता फोंडके या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. इतिहास विभाग प्रमुख प्रा.एस.एन.पाटील यांनी छत्रपती शिवरायांनी आपल्या ५० वर्षाच्या काळात केलेल्या कार्याचा आढावा घेतला.
छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संस्थापक तसेच ते सामाजिक एकतेचे शिल्पकार, भारतीय आरमाराचे जनक, धर्मनिरपेक्षतेचे पुजारी, अंधश्रद्धा नाकारणारे पुरोगामी व्यक्तीमत्व आणि लोक कल्याणकारी राजेशाही स्थापन करून रयतेचे राज्य निर्माण करणारे लोकशाहीचे शिल्पकार होते याबाबत मार्गदर्शन केले. शिवरायांसारख्या महापुरुषांचे दिनविशेष साजरे करताना त्यांना डोक्यावर घेण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घालावेत आणि आत्मसात करावेत असे आवाहनही त्यांनी केले. मानसशास्त्र विषयाचे प्रा. डॉ. रमेश गुलदे यांनी ही छत्रपती शिवरायांचा पराक्रम, त्यांची गुणवत्ता, त्यांचे धोरण, नीती व रयतेप्रती असणारे प्रेम याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संस्थेचे विश्वस्त श्री.शरदचंद्र रावराणे यांनी आपल्या महापुरुषांचे विचार व कार्य विद्यार्थ्यांपर्यंत पोचावे हा महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचा उद्देश असतो असे सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रभारी प्राचार्य डॉ.एन.व्ही. गवळी यांनी छत्रपती शिवरायांप्रती असणारी आपली कृतज्ञता विद्यार्थ्यांसमोर मांडली. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे नेते नसते तर आपल्या सगळ्यांचे अस्तित्वच राहीले नसते असे सांगितले.
या शिवजयंतीच्या निमित्ताने महाविद्यालयातील स्पंदन विभागाच्या वतीने शिवाजी महाराजांचे जीवनकार्य रेखाटणारे भितीपत्रक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
शेवटी शिवविचारांवर वाटचाल करणारी सामुहिक शिवशपथ घेण्यात आली.
या जयंती कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. दिनेश बेटकर यांनी केले.