मालवण:
मालवण येथील बहूचर्चित राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती तलवारधारी पुतळा उभारणीचा पायाभरणी समारंभ उद्या शिवजयंती दिनी म्हणजेच १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता राज्याचे मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री आणि रत्नागिरी – सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे, कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे, माजी मंत्री आणि सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थित राहणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सावंतवाडी येथील कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांनी दिली आहे.
मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती तलवारधारी पुतळा उभारणीच्या कामास वेग आला असून या पुतळ्याच्या पायाभरणी समारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. पायाभरणी समारंभ वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी उभारण्यात आलेल्या चबुतऱ्याचे पूजन नितेश राणे यांच्या हस्ते आणि माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे, आम दीपक केसरकर जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्यासह शिवप्रेमींच्या उपस्थितीत होणार आहे.
दरम्यान, या पुतळ्याच्या चबूतऱ्याचे काम पूर्ण झाले असतानाच गेले चार पाच दिवस या पुतळ्याच्या कामाचे ब्राँझ धातूने बनविलेले विविध भाग मालवणात दाखल झाले आहेत. आतापर्यंत सहा ट्रक मधून हे भाग आले असून यापुढेही नित्यनेमाने हे भाग येणार असल्याची माहिती श्री किणी यांनी दिली.