*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ. मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम लेख*
*शेगावचे श्री गजानन महाराज*
श्री गजानन महाराज—-एक दिव्य जागती ज्योत—- नि मिळणारी अनूभूती..प्रचिती.
भक्तांचे परब्रम्ह
शेगावात प्रगटले
भोळ्या भाविकांचे
दारीद्र्य,दु:ख निवटले
जागती ज्योत “श्रीं”ची
आजही अनूभूती देते
जशी निष्ठा,जसा भाव
भक्तांच्या हाकेला धांवते
शेगावचे “श्री गजानन महाराज”…भक्तांचे परब्रम्ह.. भक्तांचा तारणहार..भक्त जीवनाचा आधार..आहे. विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्रात…भारतात..नी जगातही त्यांचा किर्तीसुगंध परिमळतो आहे...अनुभवतो आहे.
प्राचीच्या बालरवीवत सुरुप
तपोबलाने तेजाळले रुप
माघ वद्य सप्तमी दिनी
प्रगटले,”श्रीं” चे अजानुबाहु
स्वरूप
भक्त रक्षणार्थ..भक्त उद्धरणार्थ..जन कल्याणार्थ.. गजानन महाराज शेगांवात प्रगटले नी शेगांव विदर्भ पंढरी की हो झाल!.त्यांच्या अद्भूत लीलांवरून हे कळून येते.भावभक्ती नाण्यावर
संतुष्ट महाराज, जिथे जिथे भोळा भाव दिसला तिथे तिथे राहिले.मग ते बंकटलालाचे घर असो की कृष्णाजीचा मळा!
लोक चमत्कृती शिवाय स्विकृती देत नाही हे जाणून त्यांनी काही चमत्कार केले.
विस्तवा वाचून चिलीम पेटविली,
चिंचवण्यातील अळ्या नाहीशा केल्या. वठला आंबा पल्लविला.
जानराव देशमुखांना पदतीर्थाने वाचविले,गणू जव-याला सुरूंग फुटत असतात कपारीत दडविले,जीव वाचवला.,पुंडलिकाची गांठ जागीच जिरवली.भाऊ कवराला फोडाच्या ठणकेतून मुक्त केले गंगाभारतीची रक्तपिती बरी केली.एक ना अनेक उदाहरणे आहेत.
समाज हिताचे भान राखत,शुष्क विहीरीस जलमय केले.जातीय सलोख्यासाठी महेताबशासोबत एकत्र जेवण केले.सर्वधर्म समभावाची शिकवण दिली.बलीशाली राष्ट्रासाठी योग अंगिकारण्याचा संदेश दिला तर देशस्वातंत्र्य चळवळीसाठी टिळकांना आशिर्वाद दिला.
प्रत्येक प्राणीमात्रात परमेश्वर आहे हा संदेश ” गण गण गणात बोते” या मंत्रातून दिला. म्हणून प्रत्येकाचा आदर करा,प्रेम करा असा बहुमोल हिताचा संदेश त्यातून दिसून येतो, हो न!
संजीवन समाधी घेतल्यानंतरही त्यांची जागती ज्योत आजही भक्तांसाठी कार्यरत आहे,हे अनेक लोकांच्या अनुभवावरून सिद्ध झाले आहे. समाधी बांधकामावरील मंजूर उंचावरून पडत असता,त्याला हात देऊन खाली सुखरूप आणले, जयपूर येथील रजपूत स्त्रीवर दगडी खांब पडला असता तिला कुठेच ईजा झाली नाही.रामचंद्र पाटील,त्याची पत्नी जानकीबाई ,यादव सुभेदार, बोरीबंदर स्टेशनवर जांजळ लक्ष्मण हरी,रतनसाचा मुलगा दिनकर,तेल्हा-याचा भाऊ कंवर या सर्वांना कुणाच्या न कुणाच्या रूपाने समाधी नंतरही महाराजांनी दर्शन दिले, तारले, रोगमुक्त केले,योग्य मार्ग दाखविला.
मी गेलो ऐसे मानू नका
भक्तीत अंतर करू नका
कदापि मजला विसरू नका
मी आहे येथेच.
हे दिलेले आश्वासन महाराज आजही पाळत आहेत. लोकांना अनुभव देत आहेत . प्राणज्योत जागृत आहे,हेच यावरून दिसून येते हो न!
श्री गजानन महाराजांचा प्रगटावतार, त्यांचे अवतार कार्य, समाधी नंतरही जागत्या ज्योतीच्या रूपाने समाजातील दोष निवारण गरीब श्रीमंत भेदभाव निर्मूलन,संकट निवारण ,
भक्तांचे, सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचे निर्दालन यासाठी आहे. जनकल्याणार्थ देशहितार्थासाठीच झाला आहे.
भक्तांना परमार्थाला लावणे,कैवल्य मार्गावर आणून सोडणे,त्यायोगे मनाची, समाजाची सुख शांती टिकविणे हेच खरे संतांचे कार्य! नी आपले महाराज हेच कार्य करीत आहेत.
भारतात विविधतेत एकता आहे , सर्वधर्मसमभाव आहे,सर्व प्राणीमात्र,मनुष्यमात्रांवर प्रेम करण्याची वृत्ती आहे,सुख शांतीने जगा नी जगू द्या ही प्रवृत्ती आहे.
भूकंप,अतिवृष्टी,परकीय आक्रमण या वेळी ती दिसून येते.नी हेच संत शिकवणीचे सारं आहे, यश आहे, असे नाही तुम्हाला वाटंत!
सौ.मंजिरी अनसिंगकर
नागपूर.
Mo.no.7020757854.