You are currently viewing मळगाव रेडकरवाडीत गव्यांकडून काजू बागायतीत धुडगुस

मळगाव रेडकरवाडीत गव्यांकडून काजू बागायतीत धुडगुस

मळगाव रेडकरवाडीत गव्यांकडून काजू बागायतीत धुडगुस

मोहरलेली काजू झाडे मुळापासून उखडून टाकली

सावंतवाडी

मळगाव रेडकरवाडी येथे सोमवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास गवळ्यांच्या मोठ्या कळपाने काजू बागायतीत अक्षरशः धुडगुस घातला. मोहरलेली शेकडो काजू झाडे अक्षरश: मुळापासून उखडून टाकली. त्याचबरोबर नाचणी चवळी वाली व अन्य भाजीपाल्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले. पहाटे सहा वाजेपर्यंत गव्यांचा हा धुडगुस सुरूच होता. अगदी घरालगत हा प्रकार घडत असल्यामुळे शेतकरी कमालीचे घाबरले होते.

रात्री १ च्या सुमारास विनायक राणे या शेतकऱ्याने अखेर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना संपर्क साधत या प्रकाराची माहिती दिली त्यानंतर वनविभागाचे दोन कर्मचारी घटनास्थळी उपस्थित झाले मात्र त्यांच्याकडे गव्यांना उस्कावण्यासाठी कोणतीही साधनसामुग्री नसल्याने त्यांना रिक्त असते परतावे लागले. या प्रकाराबाबत शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

कालच नेमळे येथे गुरे चारत असलेल्या एका शेतकऱ्यावर गव्यांनी हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर आज मध्यरात्री अगदी घरालगत येऊन गव्यांनी अक्षरशः धुडगूस घातल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली आहे. परसबागेसाठी शेतकऱ्यांनी घातलेली कुंपणे देखील गव्यांनी उध्वस्त केली आहेत.

या घटनेत दिवाकर खानोलकर, दिनेश खानोलकर, गोविंद कोचरेकर, मंगेश कोचरेकर, बाबुराव कोचरेकर यांच्या काजू बागायतीचे तर विनायक राणे व नारायण राऊळ यांच्या भाजीपाल्याचे गव्यांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.

त्यामुळे याबाबत वनविभागाने त्वरित योग्य ती कार्यवाही करावी व गव्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा तसेच शेतकऱ्यांची झालेली नुकसान भरपाई त्वरित पंचनामे करून देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा