You are currently viewing सौजन्यमूर्ती

सौजन्यमूर्ती

*सौजन्यमूर्ती*
(आज आप्पांच्या देवभूमीत देवगडात मा. केद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्व. आप्पांच्या जनशताब्दी वर्षाची सांगता होत आहे, त्याचे औचित्य साधून आदरणीय आप्पांना शब्दसुमनाची आदरांजली)
…. ऍड. नकुल पार्सेकर
आजच्या राजकारणाचा साज आणि बाज पाहिला, अनुभवला की एक सामान्य संवेदनशील भारतीय नागरिक म्हणून आणि भारतीय संविधानाचा व संविधानाच्या जन्मदात्याचा पुजारी म्हणून माझ्यासमोर जनतेच्या मनातले होवून गेलेले आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून जी काही मोजकीच नावे डोळ्यासमोर येतात त्यात दोन महत्त्वाचे लोकप्रतिनिधी म्हणजे आमच्या देवगडचे देवमाणूस आदरणीय स्व. आप्पासाहेब गोगटे आणि दुसरे म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचे सांगोल्याचे आमदार ज्यानी निर्विवादपणे तब्बल पंचावन्न वर्षे सांगोला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले ते स्व. गणपतराव देशमुख.
काळ बदलला, राजकारण बदलल़ं , राजकीय परिस्थिती बदलली आणि नेते, कार्यकर्तेही बदलले. आमच्या सारखे बदलू शकले नाही हा जसा आमचा दोष आणि कदाचित आप्पासाहेबा सारख्या ऋषितुल्य महानुभावांचा मिळालेला थोडाफार दुर्मीळ सहवास, त्यांचे आचार, विचार आणि संस्कारांचाही परिणाम.
आप्पाचे शताब्दी वर्ष, या निमित्ताने व्यक्त व्हाव म्हणून हा छोटासा पण मनापासून केलेला प्रयत्न.
आपल्या आयुष्यातील सुमारे पन्नास वर्षांहून जास्त काळ ज्यानी सेवाभावी वृत्तीने जनकल्याणासाठी समर्पित केला त्या आप्पाच्या मला मिळालेला सहवासातील अनेक आठवणी आहेत. मी भारतीय मजदूर संघाचे काम करत असताना विविध कामगार संघटनांच्या वार्षिक अधिवेशनाला आप्पा वेळात वेळ काढून यायचे. त्यांची उपस्थित आणि अगदी साध्या सोप्या भाषेतील मार्गदर्शन आम्हा कार्यकर्त्यांना एक वेगळीच उर्जा देवून जायची.
आप्पा म्हणजे त्यांच्या सार्वजनिक जीवनातील असा ध्यास की जो सुर्यकिरणाला असतो. या सूर्यकिरणांचा प्रकाश सर्वात सहजपणे पसरत असतो. अंधार दुर करतो, दलितांना, पिडिताना उर्जा देतो. उब देतो, सावली देतो. चुकलेल्या पावलाना रस्ता दाखवतो. पण आज दुर्दैवाने चुकीच्या पावलाना रोखणारे दिपस्तंभच दिसत नाहीत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भगवा हातात घेऊन अतिशय प्रतिकुल परिस्थितीत आप्पानी आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी अविरत कष्ट घेऊन देवगडला देवभूमी बनवली त्याची गोड फळं आज देवगडच्या जनतेला चाखायला मिळत आहेत. आप्पा हे आपल्या कुटुंबापुरते कुटुंब प्रमुख नव्हते तर ते जिल्ह्याचे पालक होते. जो नेता आपल्या जनतेला पाडसाप्रमाणे सांभाळतो त्याला ही धरती कामधेनू होवून साथ देते. ही कालिदासाची वाणी आदरणीय आप्पानी आपल्या संपूर्ण आयुष्यात खरी करून दाखवली. अशा या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचा सहवास लाभल्यामुळे जीवनाची मुल्ये समजली आणि जीवनविषयक स्वतःसाठी आणि दुसऱ्यासाठी जगण्याचा व सकारात्मक विचार करण्याचा मार्ग माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला मिळाला.
महाराष्ट्रातील काही समर्पित महानुभावांचे स्मरण करावयाचे झाल्यास स्व. वसंतराव भागवत, स्व. रामभाऊ म्हाळगी, स्व. तात्या नातू, स्व. राम. कापसे, स्व. शिवाजीराव गोताड, स्व. शरदभाऊ कुलकर्णी, स्व. कुसूमताई अभ्यंकर, आणि आपले आप्पासाहेब गोगटे . ज्या विचाराने १९८० मध्ये भारतरत्न अटलजींच्या साक्षीने भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली तो राष्ट्रीहिताचा विचार समाजात रुळला पाहिजे यासाठी या सर्वच मंडळीनी वैयक्तिक हिताला महत्त्व न देता कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता अपार कष्ट घेतले. सत्तेचे मिळालेले पद हे माणसे तोडण्यासाठी नाही तर जोडण्यासाठी वापरले गेले पाहिजे हा आप्पांचा आग्रह होता म्हणूनच आप्पाची आकाशवाणी भवनासमोरील आमदार निवासाची २०३ नंबरची खोली ही सदैव सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी खचा
खच भरलेली असायची. त्या काळात आतासारखा निवडणूकीत पैशाचा पाऊस पडत नव्हता. मतदारांची खरेदी होत नव्हती तरीही आप्पा सतत चारवेळा निवडून आले.
१९९५ मध्ये युती शासनाच्या काळात अनेकदा आप्पासोबत आमदार निवासात रहाण्याचा योग आला. काही आवश्यक पञव्यवहार करण्यासाठी मी आप्पाना मदत करत असे. सिंधुदुर्गातूनच नव्हे महाराष्ट्राच्या इतर भागातूनही अनेक मंडळी आप्पाकडे आपली कामे घेऊन येत असत. अशावेळी आप्पा न कंटाळता, न थकता त्याच उत्साहाने त्यांच्या समस्या ऐकून मदत करायचे. अशावेळी आपल्याकडे येणाऱ्यांचा त्यानी ना कधी पक्ष पाहिला, ना जात ना धर्म.
अनेकदा मी आप्पासोबत स्व. गोपीनाथराव मुंडे, खडसे, अण्णा डांगे अशा जेष्ठ मञ्यांच्या दालनात जायचो तेव्हा हे सर्व जेष्ठ मंत्री खुर्चीवरून उठून आप्पांचा सन्मान करायचे.
आमदार निवासातील अशी एक घटना मी माझ्या ह्रदयात कायमस्वरूपी कोरून ठेवलेली आहे. थंडीचे दिवस होते. मी आणि आप्पा दोघेच होतो. मध्यरात्री सावंतवाडीचाच कार्यकर्ता आला जो माझा पण मिञ होता. त्याने माझ्या अंगावरचं पांघरूण ओढून घेतल आणि झोपला. सकाळी मला जेव्हा जाग आली तेव्हा माझ्या अंगावर शाल होती. मी विचारणार एवढ्यात आप्पा मिश्किलपणे हसत म्हणाले, तुमच्या अंगावर पांघरूण नव्हते. बाहेर खुप थंडी होती म्हणून कपाटातील शाल तुमच्या अंगावर घातली. हे ऐकून मी पण फार सदगदित झालो.
मी जेव्हा २००४ मध्ये अटलजींच्या नावाने अटल प्रतिष्ठानची स्थापना केली तेव्हा आप्पांचे आशिर्वाद घ्यायला मी गेलो, आप्पा म्हणाले, ” अटलजीसारख्या या देशातील उतुंग नेत्याच्या नावाने संस्था स्थापन करून आपण करत असलेले काम कौतुकास्पद आहे. माझे आशिर्वाद सदैव तुमच्या पाठिशी आहेत.
आमचे परममित्र आणि माजी आमदार श्री प्रमोद जठार यांच्या पहिल्या निवडणूकीच्या प्रचारासाठी मी आप्पा बरोबर एका धनगरवाडीत गेलो होतो. त्यावेळी आप्पा आपल्याकडे येत आहेत म्हणून त्या वाडीतील अगदी तरूणापासून वृध्दापर्यतची भावन एकच होती की आपल्याला आपला देव भेटायला येत आहे. आप्पा जेव्हा आले तेव्हा आप्पानी त्यांच्याशी संवाद साधताना म्हणाले, ” मलाच जठार समजून मतदान करा. तेव्हा तेथील एक वृध्द गृहस्थ म्हणाले, “आप्पानो, मी गेली पंचवीस वर्षा तुमच्या कमळाच्या निशाणीरच शिक्को मारतय.तुम्हीच आमचे देव.
हे देवपण आप्पाना सहजासहजी प्राप्त झाले नव्हते त्यानी आपली जीवनमूल्ये जपली होती. दिवसेंदिवस वाकून नमस्कार करायला पाय शोधावे लागतात अशावेळी आठवतात ते ऋषितुल्य आप्पासाहेब. माणसांची गर्दी खुप आहे पण त्या गर्दीत मी जेव्हा हरवलेला माणूस शोधतो तेव्हा श्रध्देय आप्पांच्या रूपाने मला माणूसकीसाठीच सार आयुष्य वेचणारा माणूस आठवतो.
आदरणीय आप्पाना विनम्र अभिवादन..

प्रतिक्रिया व्यक्त करा