मराठा समाज शिष्टमंडळाने घेतली नगराध्यक्षाची भेट…
कणकवली
कणकवली शहरात महामार्ग चौपदरीकरनाच्या कामात विस्थापित होत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत मराठा समाजाच्या वतीने जो निर्णय घेईल, त्यासोबत कणकवली नगरपंचायत व कणकवली शहराचा प्रथम नागरिक म्हणून मी असेन अशी ग्वाही नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी मराठा समाज शिष्टमंडळाला दिली.
छत्रपतींच्या पुतळ्यासाठी मी यापूर्वीच जागा निश्चित करुन तेथे पुतळा स्थलांतरण करण्याबाबत निर्णय घेतला होता. मात्र त्याला विरोध होऊ लागल्याने छत्रपतींच्या बाबतीत राजकारण होऊ नये म्हणून मी थांबण्याचा निर्णय घेतला. मात्र विरोध करणाऱ्यांना जर पुतळ्याचा प्रश्न गेले वर्षभरात सोडवता येत नसेल तर कणकवलीचा प्रथम नागरिक म्हणून छत्रपतींच्या पुतळ्याची स्थलांतरण करण्याची जबाबदारी आजही मी घ्यायला तयार आहे. मी सुचवलेल्या जागेला कुणाचा विरोध असेल व अन्य ठिकाणी पर्यायी जागा उपलब्ध होत असेल तरीही माझी त्याला आडकाठी राहणार नाही. या कामासाठी माझ्याकडून लागणारे सहकार्य असणार आहे. याबाबत मराठा समाज जो निर्णय घेईल त्या निर्णया सोबत मी असणार आहे. हा प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी मी आग्रही आहे. मात्र याप्रश्नी कोणताही वाद होऊ नये अशी माझी भूमिका आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या निर्णयासोबत मी राहीन असा शब्द नगराध्यक्ष श्री नलावडे यांनी मराठा समाज बांधवांना दिला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या स्थलांतराच्या मुद्द्यावरुन मराठा समाज शिष्टमंडळाने नगराध्यक्ष समीर नलावडे यांची नगरपंचायत मध्ये भेट घेऊन चर्चा केली. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक संजय कामतेकर, ऍड. विराज भोसले, शिशिर परुळेकर, अभिजीत मुसळे, माजी नगरसेवक किशोर राणे, महेश सावंत यांच्यासह मराठा समाजाचे नेते एस. टी.सावंत, लवु वारंग, भाई परब, बच्चू प्रभुगावकर, सुशील सावंत, सखाराम सपकाळ, यश सावंत, श्री पाटील आदी उपस्थित होते. गेले तीन वर्ष हा प्रश्न प्रलंबित आहे. २६ जानेवारी रोजी याबाबत पालकमंत्र्यांची भेट घेत अंतिम निर्णय घेण्याची मागणी करण्यात येणार आहे. जर याप्रश्नी निर्णय झाला नाही तर मराठा समाजच पुढाकार घेऊन पुतळ्याच्या स्थलांतरनाचा विषय मार्गी लावेल असेही सुशिल सावंत यांनी सांगितले.