कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन
संघभावना वाढीस लागण्यासाठी क्रीडा स्पर्धा महत्वाच्या – पालकमंत्री नितेश राणे
सिंधुदुर्गनगरी
महसूल विभाग हा शासनाचा कणा आहे. हा विभाग शासनाच्या अनेक महत्वाकांक्षी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करतो. वाढत्या कामांमुळे अतिरिक्त ताण-तणाव शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर असतो. आलेला ताण – तणाव कमी करण्यासाठी दररोज शारिरीक व्यायाम महत्वाचा आहे. शिवाय क्रीडा स्पर्धांमुळे संघभावना वाढीस लागत असल्याने क्रीडा स्पर्धा महत्वाच्या असल्याचे प्रतिपादन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
वेंगुर्ला येथील कॅम्प मैदानावर कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे दि १३ ते १५ फेब्रुवारी या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, आदी उपस्थित होते.
सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थित महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने राज्य गीत सादर करण्यात आले. तसेच सर्व सहभागी अधिकारी कर्मचाऱ्यांना वेंगुर्ले तहसीलदार ओंकार ओतारी यांनी क्रीडा शपथ दिली. यानंतर मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या संघांनी संचलन केले. तहसीलदार ओंकार ओतारी यांनी प्रतिनिधीत्व करत क्रीडा ज्योत पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे सुपूर्द केली. यानंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते हवेत फुगे सोडून आणि झेंडा दाखवून स्पर्धांना सुरूवात करण्यात आली.
पालकमंत्री पुढे म्हणाले, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कामाचा अधिकचा ताण आहे. कार्यालयात आल्यापासून ते काम संपेपर्यंत प्रत्येक वेळी नवनवीन आव्हानांना सामोरे जावे लागते. परीणामी मनावर प्रचंड ताण येतो. प्रशासकीय कामात यशस्वी व्हायचे असेल तर सर्वांनी स्वत:साठी एक तास देणे आवश्यक आहे. क्रीडा स्पर्धेमुळे ताण-तणावापासून आपल्याला दूर राहता येते. ताण-तणावमुक्त होण्याबरोबरच आरोग्य चांगले ठेवण्यासाठी क्रीडा स्पर्धांना अनन्यासाधारण महत्व आहे. शरीर सदृढ असल्यास कोणत्याही ताण-तणावाला सहज सामोरे जाता येते. शारिरीक व्यायामामुळे मानसिक ताण कमी होते. त्यामळे स्वत:साठी एक तास काढून व्यायाम करा. मन:शांतीसाठी योगा आणि ध्यानधारणा करा. या स्पर्धेत सांस्कृतिक कार्यक्रमही होणार असल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुप्त कलागुणांना संधी उपलब्ध होणार आहे असेही ते म्हणाले.
विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख म्हणाले, शासनाचे प्रतिनीधीत्व करणारा महसूल विभाग आहे. महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दररोज वेळ काढून विविध खेळ खेळले पाहिजेत. ही क्रीडा स्पर्धा आनंदाचा सोहळा आहे. या खेळात अनेक राष्ट्रीय खेळाडू देखील सहभागी झालेले आहेत.
जिल्हाधिकारी अनिल पाटील म्हणाले, स्पर्धा आयेाजित करण्याचे यजमानपद सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाले याचा आनंद आहे. या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत क्रिकेट, कबड्डी , धावणे यासह विविध क्रीडा स्पर्धांसह सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कल्पना साठे यांनी तर अपर जिल्हाधिकारी रवी पाटील यांनी आभार मानले.