युवकांमध्ये एक जागीच ठार तर दोन गंभीर जखमी
कुडाळ :
कुडाळ वेंगुर्ले मुख्य रस्त्यावर पिंगुळी रेल्वे ब्रिज जवळ आयशर टेम्पो व ज्युपिटर दुचाकीची समोरासमोर जोराची धडक बसून झालेल्या अपघातात नेरुर पंचशीलनगर येथील दुचाकीस्वार हरेश संतोष नेरुरकर (वय वर्ष १९) हा युवक जागीच ठार झाला. तर दूचाकीवरील प्रथमेश प्रकाश नेरुरकर (वय वर्ष २७ रा. नेहरू पंचशीलनगर, सध्या रा. नालासोपारा मुंबई) व सुमित जाधव (वय वर्ष २३ रा. नालासोपारा मुंबई) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ही घटना दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली.
आज दुपारी ज्युपिटर दुचाकी वरून हरीश नेरुरकर, प्रथमेश नेरुरकर व सुमित जाधव हे कुडाळहून पिंगुळी म्हापसेकर तिठाच्या दिशेने जात होते. पिंगुळी रेल्वे ब्रिज जवळ सदर दुचाकीची समोरून येणाऱ्या आयशर टेम्पोला जोराची धडक बसली. यात दूचाकीस्वार हरीश नेरुरकर याला गंभीर दुखापत होऊन तो जागीच ठार झाला. तर प्रथमेश नेरुरकर व सुमित जाधव गंभीर जखमी झाले. त्या दोघांना १०८ रुग्णवाहिकेतून कुडाळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथे प्राथमिक उपचार करून प्रथमेश याला बांबुळी गोवा येथे अधिक उपचारासाठी तर सुमित याला ओरोस येथील जिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले. धडक एवढी जबरदस्त होती की ज्युपिटर दुचाकीच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. कुडाळ पोलिसांनी घटना स्थळी पंचनामा केला. या घटनेने नेरुर पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
