You are currently viewing वृक्ष लागवड : काळाची गरज: प्राचार्य डॉ.कमलताई रा. गवई. माजी लेडी गव्हर्नर

वृक्ष लागवड : काळाची गरज: प्राचार्य डॉ.कमलताई रा. गवई. माजी लेडी गव्हर्नर

 

प्रत्येकाला खूप जगावसं वाटतं चांगले आरोग्यदायी जीवन आपल्या वाट्याला यावं असं वाटतं. सुखी समाधानी आयुष्य प्रत्येक माणसाला हवे आहे. पण हे सारे करताना आपली काहीतरी सामाजिक बांधिलकी आहे. आपण काहीतरी स्वतः केले पाहिजे हे तो विसरतो.

आज माणसं वेळी अवेळी मृत्युमुखी पडायला लागली आहेत. हवेतील पाण्यातील वातावरणातील अन्नातील प्रदूषण वाढत चाललेले आहे. यावर जर वेळीच उपाययोजना केली नाही तर मानवी जीवन संकटात आल्याशिवाय राहणार नाही.

जल ही जीवन है. हे तर खरंच आहे. जीवन जगण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे प्राणवायू. तुमच्याजवळ सर्वकाही आहे. पैसा आहे. संपत्ती आहे. इमारती आहेत. पण प्राणवायू नसेल तर व्यर्थ आहे. कोरोनामध्ये आपण याचा पुरेपूर अनुभव घेतला आहे. कोरोनाने माणसाला माणसात आणले आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील आदर्श गाव हिवरे बाजार येथील सरपंच पद्मश्री श्री पोपटराव पवार यांचे नाव आपण सर्वांनी ऐकलेच आहे. त्यांच्या भागात अपुरा पाऊस पडतो. पण त्यांनी गेल्या काही वर्षात लाखोंनी झाडे लावून पाण्याचा हा बॅकलॉग भरून काढला आहे. आज त्यांचे हिवरे बाजार हे गाव हिवराईमुळे जगाच्या नकाशावर आले आहे. पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी आपण आजच पाऊल उचलणे गरजेचे आहे. नाहीतर आपल्या येणाऱ्या पिढीचे भवितव्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. भारताची राजधानी असलेल्या दिल्लीची गत आपण सर्वजण पाहत आहोत. तिथे सर्व काही आहे. सत्ता आहे .पैसा आहे. मोठमोठ्या गाड्या आहेत. आकाशाला गवसणी घालणाऱ्या इमारती आहेत. पण मानवी जीवनाला आवश्यक असलेला प्राणवायू मात्र कमी आहे. तिथले प्रदूषण दिवसेंदिवस वाढतात चालले आहे. लोकांना श्वास घ्यायला त्रास होत आहे. हीच गत हळूहळू सर्वच महानगरांची होणार आहे. पुढे मागे आपल्याही शहराचा व जिल्ह्याचा नंबर त्यात लागणार आहे.

यावर आवर घालण्यासाठी आपले आयुष्य आपल्या नातेवाईकांची आयुष्य आपल्या शहराचे व जिल्ह्याचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. प्रत्येकाला प्राणवायू पाहिजे. सावली पाहिजे. झाडांची फुले पाहिजेत. फळे पाहिजेत. पण त्यासाठी आपण स्वतः झाडं लावली पाहिजेत. झाडाचे संवर्धन संगोपन केले पाहिजे ही कल्पना आपण प्रत्यक्षात अमलात आणली नाही.

म्हणून आपण सर्वजण एकत्र येऊ या. आपल्या शहरापासून आपल्या जिल्ह्यापासून सुरुवात करूया. त्यासाठी शासकीय यंत्रणा सामाजिक संस्था शैक्षणिक संस्था व सर्वसामान्य माणूस एकत्र येण्याची व वृक्ष लागवड वृक्ष संवर्धन करण्यासाठी आपण प्रयत्न करूया. करोनात जशी एकजूट दाखवली तशीच एकजूट आज दाखवण्याची गरज आहे.

प्रत्येकाने किमान एक झाड लावावे व ते वाढवावे असा संकल्प केला तर आपले गाव व जिल्हा प्रदूषण मुक्त व्हायला वेळ लागणार नाही. आपल्याला प्राणवायू विकत घ्यावा लागणार नाही. आज जे जीवन आपण जगत आहोत त्यापेक्षा सुखी सुंदर प्राणवायुयुक्त जीवन आपणास जगता येईल. नुसते झाडे लावून चालणार नाही. वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन ही एक लोकचळवळ होण्याची गरज आहे. झाड आहे तर आपण आहोत. झाडे नसतील तर टप्प्यात टप्प्याने आपणही अधोगतीला लागल्याशिवाय राहणार नाही.

नुसतं झाड लावून उपयोगाचे नाही तर ते जगली पाहिजेत यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच कुठेतरी वृक्षतोड होत असेल तर ते थांबविणेही गरजेचे आहे.

वृक्ष लागवड ही कल्पना जनमानसात हृदयात कोरणे गरजेचे आहे. प्रत्येकाने ही आपली जबाबदारी आहे हे समजून समजून काम करण्याची आवश्यकता आहे. लहानपणातच बालमनात मुलांना वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन ही बाब रुजवली तर या चळवळीला गती येईल

शासन आपले कार्य करीतच आहे. पण त्यासाठी आपणही आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे .स्वातंत्र्य आपल्याला मिळाले .पण आपल्या वाट्याला आलेले जीवन सुखी समृद्ध आरोग्यमय असले पाहिजे .त्यासाठी मी गेल्या कित्येक वर्षापासून वृक्ष लागवड वृक्ष संवर्धन हा उपक्रम राबवीत आहे. त्यासाठी मी वृक्ष संवर्धन संस्थेमध्ये स्वतः काम करते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी ज्या अमरावतीच्या काँग्रेसनगरमध्ये राहते त्या माझ्या घरासमोर घराच्या आजूबाजूला भरपूर झाडे लावली आहे आणि ती वाढवली पण आहेत. पण माझ्या घरापुरते मर्यादित राहून चालणार नाही. तर माझे शहर माझा जिल्हा चांगला करण्याचा संकल्प मी केला आहे .माझ्या शहरातील माझ्या जिल्ह्यातील लोकांना मी जर जागे करू शकले आणि माझ्या जिल्ह्यातील व शहरातील लोकांना लोकांचे आरोग्य जर मी चांगले करू शकले तर त्यामध्ये मला खरा आनंद प्राप्त होणार आहे. आपण माझ्या या संकल्पमध्ये सहभागी व्हावे. आपला सहभाग नोंदवावा व तन-मन-धनाने या उपक्रमात सहभागी व्हावे अशी अपेक्षा आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा