*प्रख्यात गझलकार, गझलगुरु लेखक कवी संजय गोरडे “सौभद्र” लिखित अप्रतिम लेख*
*”जीवन अनंत आहे…”*
हल्ली दररोज कुणाच्या ना कुणाच्या आत्महत्येच्या बातम्या ऐकून आपले मन विदीर्ण होत राहते. आत्महत्येचे कदापि समर्थन केले जाऊ शकत नाही. कारण तो जीवनाचा मार्ग नव्हे. खरेतर मृत्यू आहे म्हणून आपल्या जगण्यात काहीतरी मौज आहे.
‘जिजीविषा’ आणि ‘विजीगिषा’ अर्थात जगण्याची व जिंकण्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती या दोन ईश्वरदत्त गोष्टी प्रत्येक जिवाला जन्मजात प्राप्त झालेल्या असतात. त्यामुळे जीव या पृथ्वीवर कुठेही आणि कुठल्याही परिस्थितीत जिवंत राहतो. मग ते अंतहीन ओसाड वाळवंट असो, की अमर्याद असा महासागर जीवन अनंत आहे. ते अगदी अंटार्क्टिकेतील मायनस तपमानातही तग धरून आहे. कमाल म्हणजे माणूस सोडून कोणताही प्राणी कधी आत्महत्येप्रमाणे ठरवून जीव देत नाही.
मग जिवनावर प्रेम करणाऱ्या, संवेदनशील, भिडस्त, काहीश्या स्वच्छंदी, अव्यवहारी पण आशावादी लोकांच्या मनात हे आत्महत्येसारखे टोकाचे विचार का बरं येत असावेत?
काही निर्णय चुकतात, काही व्यवहार फसतात, तरी सगळं ठीक होईल, मी सगळे ठीक करीन असा विश्वास त्यांना वाटत असतांना बेसावधपणे ते अडकत जातात या दुनियेच्या कठोर नियमांच्या कचाट्यात. कुणी एखादा निर्णय चुकला म्हणून तर कुणी खेळात, जुगारात हरला म्हणून, कुणी प्रेमात फसला म्हणून तर कुणी व्यसनाच्या नादी लागल्याने बरबाद होताना आपण पाहतो. वरवर पाहता ह्या फारच छोट्या व साध्यासुध्या गोष्टी वाटत असल्या तरी ही परिस्थिती नीट हाताळता न आल्याने हळूहळू या गोष्टी विकोपाला जातात. पुढे अवघड होत जातात सगळी गणितं. आणि या व्यवहारी दुनियेचा निष्ठूर, निर्दयी चेहरा त्यांना पहावा लागतो.
काही लोक अतिसंवेदनशील असतात, अनेकदा त्यांना पराभव स्विकारता येत नाही. दुसऱ्यांची चूक पदरात घेता येत नाही आणि स्वतःच्या चुकीलाही ते क्षमा करू शकत नाहीत. मानवी मूल्यांवर अशा लोकांची प्रचंड श्रद्धा असते. मात्र प्राप्त परिस्थितीला ते स्वत:लाच जबाबदार धरतात. पश्चाताप करतात. जागरहाटीतला कोडगेपणा त्यांच्याकडे शून्य असतो. असे काही लोक पराकोटीच्या प्रामाणिकतेतूनही आत्महत्येचे पाऊल उचलतात. अशी चांगली माणसं शेवटी ज्यांच्यावर त्यांचे निरतिशय प्रेम असते. अशा आपल्या जिवलगांनाही कायम सलणारे असह्य असे दुःखाचे घाव देऊन जातात हे मात्र अत्यंत वाईट असतं.
त्यामुळे असा कोणताही टोकाचा अविचार मनात आल्यास त्या तीव्रतम भावनेच्या भरात वाहून न जाता कुणाशी तरी बोला, निदान एखादे गाणे ऐका पण स्वत:ला कोणतीही भयानक कृती करण्यापासून केवळ काही सेकंद रोखा, म्हणजे जीवन तुम्हाला पुन्हा मिठी मारतं! अरे एक स्वप्न भंगले तर काय झाले? एक दुनिया विखुरली तर पुन्हा एक नवी दुनिया निर्माण करण्याची धमक आपल्यात आहे. मदन मोहन दानिश नावाचे शायर लिहितात की,
“ज़िंदगी से मोहब्बत करो टूट कर
मौत का काम दुश्वार करते रहो
नफ़रतों से लड़ो, प्यार करते रहो
अपने होने का इज़हार करते रहो”
संवादाची वीण उसवत चाललेल्या या काळात हक्काचा विसावा म्हणून मोजकीच पण जिवाला जीव देणारी जिव्हाळ्याची माणसं आपल्या भोवती असणं ही लाखमोलाची गोष्ट आहे. त्यासाठी आपणच पुढाकार घ्यायला हवा. कधी मनातली गोष्ट बोलण्यासाठी, तर कधी आयुष्यातील छोटे-मोठे निर्णय घेताना एकमेकांना विचारण्यासाठी, हक्काचे चार मित्र सोबत हवेतच. अनुभवांच्या या देवाणघेवाणीमुळे चुका टाळता येतात. त्यांच्या सोबतीने जिवनाच्या या प्रवासातील चढ-उतार अगदी हसत खेळत पार करता येतात.
~संजय गोरडे
7276091011