You are currently viewing माकडतापाचे दोन्ही रुग्णांवर यशस्वी उपचार

माकडतापाचे दोन्ही रुग्णांवर यशस्वी उपचार

माकडतापाचे दोन्ही रुग्णांवर यशस्वी उपचार

सिंधुदुर्गनगरी 

 माहे जानेवारी पासून सावंतवाडी तालुका अंतर्गत प्राथमिक आरोग्य  केंद्र सांगेली येथील कलंबिस्त गावात व दोडामार्ग तालुका अंतर्गत प्राथमिक आरोगय केंद्र भेडशी येथील केर गावात प्रत्येकी एक के.एफ.डी. (माकडताप) रुग्ण आढळून आले असून दोन्ही रुग्ण पूर्णःपणे बरे आहेत. या दोन्ही ठिकाणी नियमित ताप रुग्ण सर्वेक्षण चालू असून सर्वेक्षणामध्ये एकही विशेष तापाचा रुग्ण तसेच के.एफ.डी. (माकडताप) लक्षणे असलेला रुग्ण आढळून आलेला नाही. अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. स्वप्नील बोदमवाड यांनी दिली आहे.

माहे जानेवारी पासून एकूण २२० रक्त जल नमुने एन.आय.व्ही. पूणे येथे तपासणीसाठी पाठविलेले असून त्यापैकी फक्त दोन रुग्ण के.एफ.डी. (माकडताप) दूषित आढळले आहेत. जिल्ह्यातून एकूण ३४४ गोचिड तपासणीसाठी एन.आय.व्ही. पूणे येथे पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे.

कोल्हापूर चे (हिवताप) आरोग्य सेवा सहाय्यक संचालक डॉ. संजय रणवीर व जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धूरी,  जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. स्वप्नील बोदमवाड, यांनी के.एफ.डी. दूषित भागातील रुग्णभेट घेऊन दूषित भागाची पहाणी केली.

जंगलातील वन्य प्राण्यांमध्ये वेगवेगळे आजार असतात. त्यापैकी “कॅसनूर फॉरेस्ट डिसिज” (माकड ताप) हा आजार एक जीवघेणा विषाणूजन्य आजार. मोठ्या प्रमाणात झालेली जंगलतोड, माणसाचे झालेले जंगलाकडे स्थलांतर इ. कारणांमुळे अपघाताने का असेना, माकडताप आजार माणसामध्ये होताना दिसतात.

कॅसनूर फॉरेस्ट डिसिज (माकड ताप) या आजाराची १९५७ पासून शिमोगा जिल्हा (कर्नाटक) येथून सुरुवात आली. सूरुवातीला माकडांचे मृत्यू, त्यानंतर माणसामध्ये विषाणूजन्य ताप व मृत्यू अशी परिस्थिती पाहावयास मिळायची. नंतर या आजाराचा अभ्यास केल्यानंतर असे लक्षात आले की, हा विषाणूजन्य आजार दूषित गोचिड चावल्यामुळे पसरतो. माकड, उंदिर, घूशी, खारुताई तसेच ससे इ. प्राण्यांमध्ये हा विषाणू आढळून येतो. माकडामध्ये ह्या विषाणूची वाढ होते. माकडे आजारी पडतात, त्यांना शुष्कता होते. पाणी पिण्याच्या शोधात ते ओढा, नाले, तळी या ठिकाणी येतात. त्या ठिकाणी कालांतराने ते मृत पावतात. सर्वसाधारण पणे मृत माकडाचे शरीर थंड पडल्यानंतर म्हणजेच सुमारे चार तासांनी त्याच्या शरीरावरील गोचिड रक्ताच्या शोधात पालापाचोळ्यामध्ये थांबतात. त्यावेळी जर मनुष्य जंगलात काही कामानिमित्त गेल्यास त्या गोचिड चावतात व माणसांच्या शरिरात विषाणू सोडतात, पूढे ३ ते ८ दिवसांनी पुढीलप्रमाणे लक्षणे दिसायला लागतात.

आजाराची लक्षणे

* दूषित गोचिड चावल्यापासून ३ ते ८ दिवसांत लक्षणे दिसतात.

* त्यामध्ये अचानक थंडी वाजून ताप येणे, डोकेदुखी त्याचप्रमाणे स्नायू दुखी, उलटी, जुलाब तसेच

   क्वचित प्रसंगी रक्तस्त्राव दिसतो.

* यामध्ये बीपी कमी होणे तसेच प्लेटलेट, तांबड्या व पांढऱ्या पेशी कमी होतात.

* १ ते २ आठवड्यात रुग्ण बरा होतो. १० ते २० टक्के लोकांना ताप बरा होऊन पुन्हा येऊ शकतो.

* तिसऱ्या आठवड्यानंतर तीव्र डोकेदुखी, मानसिक असमतोलपणा तसेच दृष्टीदोष होऊ शकतो.

* अशक्तपणा पुढे १ ते २ महिने राहतो.

जोखीमग्रस्त व्यक्ती

* जंगलात काम करणारे वन कर्मचारी, शेतकरी व शिकारी यांना या जंतुसंसर्गाचा धोका आहे.

उपचार

केएफडीमध्ये लवकरात लवकर लक्षणावर आधारित उपचार केल्यास तसेच शुष्कता दूर केल्यास, समतोल आहार घेतल्यास रुग्ण बरा होऊ शकतो. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे, ते लगेच बरे होतात. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये व जिल्हा रुग्णालय या ठिकाणी मोफत औषधोपचार उपलब्ध आहेत.

प्रतिबंधात्मक उपाय

* जंगलात जाणाऱ्या व्यक्तींनी संपुर्ण शरीर झाकेल असे कपडे वापरावेत.

* जमिनीवर बसणे अगर झोपणे टाळावे.

* जंगलातून तसेच शेतातून काम करून आल्यानंतर साबणाने तसेच गरम पाण्याने हात-पाय स्वच्छ धुणे

   किंवा गरम पाण्याने आंघोळ करावी.

* जंगलात किंवा शेतात काम करायला जाण्याअगोदर उघड्या शरीरावर डास तिरस्करणीय मलम

   (ट्यूब) लावावी किंवा डि.एम.पी. तेल लावावे परंतू चेहऱ्याला लावू नये.

* ताप येत असल्यास आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा.

* या आजारात व्यक्तींना जलशुष्कता होण्याची शक्यता असल्याने आहारात पातळ पदार्थ,

    ओ.आर.एस. द्रावण, लिंबू सरबत यांचा वापर सतत करावा.

* गोचिडींचा नायनाट करण्यासाठी मॅलेथिऑन, सायफरमेथ्रीन, क्लोरोपायरीफॉल व आयव्हरमेक्टिन

    सारख्या जंतूनाशकांचा वापर करावा.

* मृत जंगली जनावरांची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावण्याकरिता वनविभागास कळवावे. तसेच मृत माकड आढळून आल्यास ठिकाण हॉटस्पॉट म्हणून घोषित करावे व मॅलॅथिऑन पावडर ५० मी. परिसरात टाकावी. पाळीव प्राण्यांच्या संवर्धनासाठी पशुसंवर्धन विभागाचे सहकार्य घ्यावे.

या आजाराबाबत प्रचंड गैरसमजूत समाजात आहे.

१) या बाधित व्यक्ती माकडासारखी वागते. हे पूर्णपणे चुकीचे आहे. माकडचा माणसाअगोदर बळी जातो. माणसाला आजार झाल्यानंतर तो अंग खाजवतो, उड्या मारतो इ. गैरसमजूती आहेत.

२) एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला हा रोग होतो हेही चुकीचे आहे. हा आजार दूषित गोचिड चावल्यामुळे होतो. अन्य कोणत्याही मार्गाने होत नाही. उदा. माकड पाण्यात पडल्यानंतर ते पाणी पिल्यास हा आजार होत नाही. विषाणू हे गोचिडच्या शरीरात असतात. पाण्यातून या आजाराचा प्रसार होत नाही.

३) लसिकरण करणे आवश्यक आहे. ज्या भागात साथीचा प्रादुर्भाव आहे तिथे लसिकरण केले जात नाही कारण लस दिल्यानंतर रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी २ महिने लागतात. म्हणून ही लस ऑक्टोबर ते डिसेंबर या महिन्यात देतात. एक महिन्याच्या अंतराने २ डोस घेतल्यास ६५ टक्के रोगप्रतिकारक शक्ती २ महिन्यात वाढते. त्यानंतर ६ ते ८ महिन्यांनी बुस्टर डोस घेतल्यास रोगप्रतिकारक शक्ती ८५ टक्केंनी बाढते. त्यानंतर पुढील प्रत्येक वर्षी एक बुस्टर डोस घेणे आवश्यक आहे.

४) संपूर्ण जंगलात किटकनाशके वापरली तर चालतील का ? – ज्या ठिकाणी मृत माकडे आढळली आहेत तेथील ५० मीटर परिसरात किटकनाशके वापरावीत. किटकनाशकांचा निसर्गातील इतर वन्य जीवांवर परिणाम होऊ शकतो. अपघाताने विषबाधा होऊ शकते.

५) कंट्रोल बर्निन केले तर चालेल काय बर्निंन मध्ये जंगलातील बागांचे, वन्य जीवांचे नुकसान आहे. पुन्हा पुढील वर्षात जंगले वाढतील परंतु आजार समुळ नष्ट होणार नाही.

६) माकडे मारली तर चालतील काय ? – खरे तर माकड हा प्रथमतः त्याला आजारावर लढण्यासाठी पुढील सैनिक आहे. जंतुसंसर्ग होतो. त्याला उपचार मिळत नाहीत म्हणून मृत पावते. माकडे मारली तर त्याच्या अंगावरील गोचिड मनुष्यास चावतील व माणसामध्ये आजार व मृत्यू जास्त पाहावयास मिळेल. म्हणून दुषित गोचिड शत्रू असून माकडे आपले मित्र आहेत.

७) मृत माकड आढळल्यास काय करावे? – मृत माकड आढळल्यास सर्वप्रथम १०७७ या टोल फ्री नंबरवर संपर्क साधावा. ग्रामपंचायत, वनविभाग, पशुसंवर्धन तसेच आरोग्य विभाग यांनी एकत्र येऊन कार्यवाही करावी. २४ तासातील माकड मृत असेल त्यांचे शवविच्छेदन पशुसंवर्धन विभाग करेल. माकडाचे शरीरावरील व भोवतालचे गोचिड नमूने आरोग्य विभाग घेऊन तपासणीकरीता नॅशनल इन्स्टीटयूट ऑफ व्हायरॉलॉजी, पुणे येथे पाठवतील. मृत माकडाचे भोवताली ५० मीटर परिसरात किटकनाशकाचे डस्टिंग करावे.

८) ताप आल्यानंतर काय काळजी घ्यावी?  दुषित गोचिड चावल्यानंतर ३ ते ८ दिवसांनी तीव्र ताप येतो. ताप अंगावर काढू नये. भरपूर द्रवरुप पदार्थाचा आहारात समावेश करावा. शुष्कता होऊ देऊ नये. इतर विषाणूजन्य तापाप्रमाणेच हा ताप असून ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे ते बरे होतात. परंतु ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे, मधूमेही आहे, रक्त दाब आहे, किडणी, ह्दय तसेच यकृताचे आजार आहेत, दारुचे व्यसन आहे अशा अति जोखमींच्या व्यक्तींना अॅडमिट करावे लागते. त्यांचे मधले जवळजवळ ३ ते १५ टक्के मृत्यूचे प्रमाण आहे.

९) या आजारावर उपचार आहेत का ?  हा विषाणूजन्य आजार असलेने त्यावर उपचार नाही. तथापि रोगप्रतिकारक शक्ती वाढविल्यास व प्रतिबंधात्मक उपाय अंमलात आणल्यास हया आजाराचा धोका टळू शकतो.

१०) नवीन भागात लागण झालेनंतर मृत्यूचा धोका अधिक असतो. हे खरे आहे काय ? कारण जुन्या भागात समाजाची स्वतःची रोगप्रतिकारक ताकद तयार झालेली असलेने नवीन भागात ती तयार नसते. त्यामूळे तिथे आजाराचे व मृत्यूचे प्रमाण जास्त दिसून येते.

जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये व जिल्हा रुग्णालय या ठिकाणी मोफत औषधोपचार उपलब्ध आहेत.

 आजारांची भीती बाळगू नका …. अफवांवर विश्वासू ठेवू नका …. वन्य प्राण्यांचे संरक्षण करा…

प्रतिक्रिया व्यक्त करा