*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*बुडत्याचा पाय खोलात….*
दांभिकता अन् लांडीलबाडी लपता लपत नाही
माहित असते सुज्ञ जनांना कितीही बदला शाई
बुडत्याचा पायच खोलात शहाणा होतच नाही
खोदत जातो आपल्यासाठी स्वत:च तो खाई…
किती कारणे शोधा, लपवा मनात हसती जन
काय मिळते अशा कृतीने अशांत असते मन
सत्य वदावे ते आचरावे प्रश्नच संपून जाती
खोटे बोलता होते फक्त आयुष्याची माती…
किती मुलामा द्या हो वरूनी करणी काळी दिसते
एकदाच करता ती लबाडी दुनिया नेहमी हसते
विश्वासाचा बट्याबोळ नि कधी परत ना येतो
उत्तरोत्तर माणसास तो रसातळाला नेतो…
सत्य वदावे आचरावे गुरूचे आहे प्रमाण
“नाठाळाच्या माथी काठी” सांगती तुकाराम
सत्याचे का असे वावडे नवल वाटते फार
उघडणार हो सांगा कसे मग परमेशाचे दार…
नका हो फसवू स्वत:स आणि इतरेजनास रोज
मुळीच नाही चुकणार अशाने पापाचे ते भोग
सरळ रहावे किती ते सोपे आडवळणे ती कशास
दुष्कृत्याचे नडतील तुम्हाला दुर्वर्तनाचे शाप…
भ्रमात राहू नका जन हो उघडा उघडा डोळे
साधूचा ओढून चेहरा वर्तन नको हो काळे….
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
