सावंतवाडी :
सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच थरारक एरोमॉडेलिंग शोचे आयोजन करण्यात आले आहे. हा अनोखा कार्यक्रम ९ फेब्रुवारी २०२५ रोजी सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावर होणार असून, रोटरी क्लब सावंतवाडी, रोट्रॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडी आणि सावंतवाडी नगर परिषद यांच्या वतीने हा शो आयोजित केला आहे. तर व्ही ४ इन्फानाईट बिकॉन कन्सल्टंसी एल.एल.पी हे या शोचे मुख्य प्रायोजक आहेत
या शोमध्ये अत्याधुनिक रिमोट कंट्रोल एरोमॉडेल्स, विविध प्रकारची हवाई कसरत करणारी मॉडेल विमाने, तसेच हाय-स्पीड जेट्स पाहायला मिळणार आहेत. हवाई कसरती आणि स्टंट्ससह, प्रेक्षकांना अनोखा आणि रोमांचक अनुभव मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम आणखी खास असणार आहे. स्पेशल लकी ड्रॉ च्या माध्यमातून १५ भाग्यवान विद्यार्थ्यांना विमानाची प्रतिकृती बक्षीस म्हणून दिली जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ रोमांचक एरोमॉडेलिंग शो पाहण्याची संधी मिळणार नाही, तर ते या अनोख्या आठवणींचा भागही होऊ शकतील. हवाई क्रीडाप्रेमींना हा शो नक्कीच अविस्मरणीय अनुभव देईल.
कार्यक्रम ९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ८ ते १० वाजता सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावर होणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
संपर्कासाठी – ९८९०५१२७५४ या क्रमांकावर फोन करू शकता किंवा rotaract.sawantwadi@gmail.com या ईमेलवर संपर्क साधू शकता. सिंधुदुर्गातील हवाई क्रीडाप्रेमींसाठी ही एक मोठी संधी असून, पहिल्यांदाच अशा प्रकारचा शो होत असल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. या थरारक शोसाठी मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन रोटरी क्लब,रोट्रॅक्ट क्लब सावंतवाडी, व्ही ४ इन्फानाईट बिकॉन कन्सल्टंसी एल.एल.पी आणि सावंतवाडी नगर परिषदेने केले आहे.