*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना*
*🌱🌱अंकुर 🌱🌱*
नजर नभाची उगा शोधते
वाट कस्तुरी मनात माझ्या
स्पर्श कोवळे तुझे लावते
लळा रेशमी मनास माझ्या ।।
असु दे नक्षत्रांचे झुंबर
चंद्रप्रकाशा उभा गवाक्षी
मी न मोजतो चराचराला
तूच उतरता माझ्या अक्षी ।।
उनाड वारा उगा फिरकतो
चहुबाजूंनी अवतीभवती
मिठीत विरलेल्या श्वासांची
बेपर्वाई तमात हसती ।।
तुझ्या मनाला विणतांना मी
चिंब भिजविली रात्र केशरी
मृदुल अंबरी रविकिरणांनी
उब उसवली नेत्रमंजरी ।।
जरा लाजल्या लाल पाकळ्या
आणि लाजले मल्मल पडदे
मुखकमलावर तुझ्या गुलाबी
आनंदाचे अंकुर सुखदे ।।
नेत्रमंजरी=नयन प्रणय
*©सर्वस्पर्शी*
©कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख.
नासिक ९८२३२१९५५०
